रशियन सैन्याने युक्रेनमधील अनेक शहरांवर प्राणघातक हवाई हल्ले केले, ज्यामध्ये 367 ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. हल्ल्यांच्या टार्गेट्समध्ये कीव्हसह अनेक शहरांचा समावेश होता. हा रशिया-युक्रेन युद्धातील सर्वात मोठा हवाई हल्ला असल्याचे, अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्यात किमान 12 जण ठार झाले असून डझनभर लोक जखमी झाले आहेत. उत्तरेकडील झायटोमिर प्रदेशात झालेल्या हल्ल्यांत, तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
रशियन दहशतवादी हल्ला
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की, यांनी अमेरिकेवर आणि विशेषतः अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर, त्यांच्या कारकिर्दीत रशिया आणि त्याचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, यांच्याबाबत मृदू धोरण स्विकारल्याबद्दल टीका केली.
“अमेरिकेची आणि जागतिक समुदायाची ही शांतता पुतिनला आणखी प्रोत्साहन देत आहे,” असे त्यांनी टेलिग्रामवर लिहिले.
“प्रत्येक रशियन दहशतवादी हल्ला हा रशियावर नवीन निर्बंध लावण्यासाठी पुरेसे कारण आहे.”
पुतिन यांच्याबाबत ट्रम्प नाराज
ट्रम्प यांनी पुतिन यांच्या कारवायांवर टीका करत, पत्रकारांशी बोलताना सांगितले की: “पुतिन यांच्या कृतींवर मी समाधानी नाही. तो अनेक लोकांचा जीव घेत आहेत.”
“मी पुतिन यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. याआधी आमचे चांगले हितसंबंध देखील होते. मात्र आता ते शहरांवर क्षेपणास्त्र डागत आहेत, नरसंहार करत आहेत आणि मला हे अजिबात पटलेलं नाही,” अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.
जेव्हा त्यांना विचारले की, ते रशियावर अधिक निर्बंध लावण्याचा विचार करत आहेत का, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले, “होय, नक्कीच.”
“हे थांबले पाहिजे” – ट्रम्प
वॉशिंग्टनला परतल्यानंतर ट्रम्प यांनी, सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, “पुतिन यांना पूर्णत: वेड लागले आहे”
तसेच त्यांनी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्यावरही टीका केली. ट्रम्प म्हणाले की: “ते ज्या प्रकारे बोलतात त्याने देशाला बळ मिळत नाही, उलट त्याच्या प्रत्येक विधानामुळे समस्या निर्माण होतात. मला ते अजिबात आवडत नाही, आणि हे थांबलेच पाहिजे.”
रशियन हल्ल्याचा उद्देश: भीती आणि मृत्यू?
युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लीमेंको, यांनी सांगितले की, “या हल्ल्यात 12 जण ठार झाले असून 60 जण जखमी झाले आहेत.”
“हा नागरिकांना लक्ष्य करुन केलेला निर्दयी आणि एकत्रित हल्ला होता. शत्रूने पुन्हा एकदा दाखवून दिले, की त्यांचा हेतू भीती आणि मृत्यू पसरवण्याचा आहे,” असे त्यांनी टेलिग्रामद्वारे पोस्ट केले.
हा हल्ला, युक्रेन आणि रशियामधील कैद्यांच्या देवाणघेवाणीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याच्या पार्श्वभूमीवर झाला आहे, जिथे दोन्ही बाजूंनी प्रत्येकी 1,000 लोकांची देवाणघेवाण करण्याचे ठरले होते.
अमेरिकेचे युक्रेनमधील विशेष दूत- कीथ केलॉग यांनी, हा हल्ला 1977 च्या जिनिव्हा शांतता कराराचे उल्लंघन असल्याचे सांगितले आणि तात्काळ युद्धविरामाची मागणी केली.
युद्धविरामाचे प्रयत्न
युक्रेन आणि त्याचे युरोपीय सहयोगी, मॉस्कोवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत की, त्यांनी तात्पुरता 30 दिवसांचा युद्धविराम जाहीर करावा, जेणेकरून तीन वर्षांपासून चाललेल्या युद्धाच्या समाप्तीसाठी वाटाघाटी सुरू करता येतील.
मात्र यामध्ये अडथळा आला, कारण याच आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, रशियावर तात्काळ लढाई थांबवण्यास नकार दिल्याबद्दल अधिक निर्बंध लावण्यास नकार दिला, जे कीवला अपेक्षित होते.
युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की, रशियाने रात्रीच्या हल्ल्यात 298 ड्रोन आणि 69 क्षेपणास्त्रे डागली. यापैकी 266 ड्रोन आणि 45 क्षेपणास्त्रे पाडण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.
या हल्ल्याचा फटका, देशातील अनेक प्रादेशिक केंद्रांना बसला, ज्यामध्ये युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर खार्किव, दक्षिणेकडील मायकोलायिव आणि पश्चिमेकडील टर्नोपिल यांचा समावेश होता.
कीव्ह शहराच्या लष्करी प्रशासन प्रमुख तिमूर त्काचेंको यांनी सांगितले की, ड्रोन हल्ल्यांत 11 लोक जखमी झाले. राजधानीत कोणतीही मृत्यूची नोंद नाही, पण शहराच्या भोवतालच्या भागात 4 जण ठार झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही दोन दिवसांत दुसरी मोठी हवाई हल्ल्याची घटना होती. शुक्रवारी सायंकाळी रशियाने कीव्हवर डझनावधी ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती, जे संपूर्ण रात्री सुरू राहिले.
“दबावाशिवाय काहीही बदलणार नाही”
उत्तर-पूर्व युक्रेनमधील खार्किवचे महापौर इहोर तेरेखोव यांनी, रविवारी सकाळी सांगितले की, “ड्रोन हल्ल्यांनी शहराच्या तीन भागांवर परिणाम साधला आणि तीन लोक जखमी झाले. स्फोटांमुळे उंच इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.”
‘दक्षिणेकडील मायकोलायिवमध्ये 77 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आणि पाच लोक जखमी झाले,’ असे तेथील प्रादेशिक राज्यपालांनी सांगितले. त्यांनी एका अपार्टमेंट इमारतीचा फोटोही शेअर केला ज्यात मोठा स्फोट झाल्यामुळे भिंतीला भला मोठा भगदाड पडले होते आणि सभोवताल मलब्याने भरून गेला होता.
खमेलनित्स्की या पश्चिमेकडील भागात, जे युद्धभूमीपासून अनेकशे किलोमीटर दूर आहे, तिथे 4 लोक ठार आणि 5 जण जखमी झाल्याचे, राज्यपालांनी सांगितले.
युक्रेनचे राष्ट्रपती कार्यालयाचे प्रमुख आंद्रीय यरमाक यांनी टेलिग्रामवर लिहिले की: “दबावाशिवाय काही बदलेल असे वाटत नाही आणि रशिया व त्याचे सहयोगी अशाच हत्या करण्यासाठी पश्चिमेकडील देशांमध्ये आपली ताकद वाढवत राहतील. मॉस्कोही त्यांच्या शस्त्रास्त्रनिर्मितीची क्षमता असेपर्यंत युद्ध चालूच ठेवेल.”
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले की, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने 4 तासांच्या कालावधीत 95 युक्रेनी ड्रोन नष्ट केले.
मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले की, राजधानीकडे येणारे 12 युक्रेनी ड्रोन मार्गातच पाडण्यात आले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)