रशियाने शनिवारी सकाळी पहाटे, युक्रेनची राजधानी कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला. या हल्ल्यामुळे शहराच्या अनेक भागांत आग लागली, ढिगाऱ्यांचा सडा पाहायला मिळाला. या हल्ल्यांत किमान 8 जण जखमी झाल्याची माहिती शहराच्या महापौरांनी दिली.
रॉयटर्सचे प्रत्यक्षदर्शी म्हणाले की, “त्यांनी कीवच्या आकाशात उडणाऱ्या ड्रोनच्या अनेक लाटा पाहिल्या आणि एकामागून एक होणाऱ्या स्फोटांचे आवाज ऐकले.”
महापौर विताली क्लिट्स्को म्हणाले की, “जखमी झालेल्या दोन रहिवाशांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली. सध्या हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय झाली आहे.”
अनेक इमारतींचे नुकसान
ऑनलाइन प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये, एका अपार्टमेंटच्या इमारतीतून धूर निघताना आणि दुसऱ्या एका इमारतीतून ज्वाळा भडकताना दिसत होती. आपत्कालीन कर्मचाऱ्यांचे बचाव कार्य वेगाने सुरू आहेत. फोटोंमध्ये आकाशात नारिंगी-लाल रंगाचा प्रकाश आणि धुराचे लोट दूरवर पसरलेले दिसत होते.
क्लिट्स्को म्हणाले की, “सोलोमिन्स्की जिल्ह्यातील एका अपार्टमेंटच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर एका ड्रोनचे तुकडे आदळले. त्या भागात एक अपार्टमेंट इमारत आणि एक निवासी नसलेली इमारत आगीत सापडली.”
कीवच्या लष्करी प्रशासनाचे प्रमुख तिमूर त्काचेंको यांनी सांगितले की, “ड्निप्रोव्ह्स्की जिल्ह्यातील एका अपार्टमेंटच्या दोन मजल्यांवर आग लागली आहे.”
अधिकाऱ्यांनी, ओबोलोन या उत्तर उपनगरातही आग लागल्याचे आणि एका मॉलवर ड्रोनचे अवशेष सापडल्याचे सांगितले. तपासादरम्यान, ड्रोनचे तुकडे वेगवेगळ्या भागांमध्ये सापडले.
धोक्याची सूचना देणारा पहिला हवाई सायरन वाजवल्यानंतर, दोन तासांपेक्षा अधिक काळा ही सतर्कता कायम होती.
शांतता चर्चा बिघडवण्याचा प्रयत्न?
हा हल्ला युक्रेनने रशियावर, विशेषतः मॉस्कोवर सुमारे 800 ड्रोटय़न हल्ले केल्यानंतर झाला आहे.
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव्ह, यांनी शुक्रवारी या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची ग्वाही दिली होती.
लावरोव्ह म्हणाले की, “युक्रेनकडून होणाऱ्या वाढत्या ड्रोन हल्ल्यांना, युरोपीय युनियन देशांच्या युक्रेनला दिलेल्या पाठिंब्याचा थेट परिणाम मानला पाहिजे.”
“आम्हाला खात्री आहे की, या देशांना त्यांच्या या कृत्यांबद्दल जबाबदार धरले जाईल,” असे लावरोव्ह म्हणाले.
“हे हल्ले, शांतता चर्चांमध्ये अडथळा आणण्याचा आणि इस्तंबूलमधील रशिया व अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये झालेल्या करारांना कमजोर करण्याचा प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)