ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण-पूर्व भागात आलेल्या विनाशकारी पुरानंतर, शनिवारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली टीमने स्वच्छता मोहीमेला सुरुवात केली. या पुरात 5 जणांचा मृत्यू झाला असून, 10 हजारांहून अधिक मालमत्ता पाण्याखाली गेल्यामुळे त्याचे पूर्णत: नुकसान झाले आहे.
न्यू साउथ वेल्सच्या आपत्कालीन सेवा विभागाने सांगितले की, “राज्यातील मिड-नॉर्थ कोस्ट भागात नुकसान मूल्यांकन सुरू आहे. याठिकाणी या आठवड्यात आलेल्या पुरामुळे गावांचे संपर्क तुटले, जनावरं वाहून गेली आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.”
परिस्थिती सुधारतेय
“सुरुवातीच्या अंदाजानुसार, विक्रमी पुरानंतर किमान 10,000 मालमत्तांचे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे,” असे सेवा विभागाने म्हटले आहे. शुक्रवारपासून पुरग्रस्त भागांमध्ये परिस्थिती सुधारत असल्याचेही त्यांनी सांगितले.
NSW SES चे प्रमुख अधीक्षक पॉल मॅक्वीन ESM म्हणाले की, “अजूनही इथली धोकादायक परिस्थिती आहे जिथे पायाभूत सुविधांवर आणि मालमत्तांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे. पाणी पूर्णपणे ओसरत नाही तोपर्यंत आणि लोक सुरक्षितपणे त्यांच्या घरांमध्ये प्रवेश करू शकत नाहीत आणि त्यामुळे परिस्थीती नियंत्रणात येईपर्यंत त्यांना परतण्याची परवानगी देता येणार नाही.”
“वापर सुरु करण्याआधी, घरे आणि व्यवसाय स्थळांची तपासणी पात्र इलेक्ट्रिशियनकडून होणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी सांगितले.
राज्य आपत्कालीन सेवा आयुक्त- माईक वासिंग यांनी सिडनीतील पत्रकार परिषदेत सांगितले की, “शेकडो पूरग्रस्त रहिवासी अजूनही स्थलांतर केंद्रात आहेत. काल रात्री एकूण 52 पूर बचाव मोहिमा पार पडल्या.”
मृतांचा आकडा वाढला असून, पाचवा मृतदेह जो एका 80 वर्षीय व्यक्तीचा आहे, तो पाण्याखाली गेलेल्या एका मलब्यात आढळून आला. संपूर्ण शहर पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहे.
“तुम्ही एकटे नाही” — पंतप्रधान अल्बानीज यांचे आश्वासन
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, यांना बिकट परिस्थितीमुळे शुक्रवारचा पूरग्रस्त भागाचा दौरा रद्द करावा लागला. त्यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत सांगितले, “जीवितहानीची बातमी ऐकून फार वाईट वाटले.”
“तुम्ही एकटे नाही, असा संदेश मी मिड-नॉर्थ कोस्टवरील पूरग्रस्त ऑस्ट्रेलियन नागरिकांना देऊ इच्छितो,” असे त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) द्वारे पोस्ट करत सांगतिले.
“या दुःखद प्रसंगी आम्ही नुकसानग्रस्त नागरिकांच्या आणि मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत,” असेही त्यांनी निवेदनात म्हटले.
My message to Australians impacted by the devastating floods on the Mid North Coast is this – you are not alone.
We’ve now activated disaster assistance across 19 local government areas, including new support for Armidale, Muswellbrook and Walcha.
In addition, applications for… pic.twitter.com/YJJ79sduul
— Anthony Albanese (@AlboMP) May 23, 2025
गेल्या काही दिवसांपासून, सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ही पूरस्थिती उद्भवली. पुरामुळे नागरी वस्त्यांचे, मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, काही ठिकाणी गाड्या, घरे पूर्णपणे पाण्यात बुडाल्याचे पाहायला मिळाले. पुरामुळे सुमारे 50 हजार लोक आयसोलेट झाले.
ऑस्ट्रेलियात अलीकडच्या काळात अतिवृष्टी, दुष्काळ आणि वणव्यांच्या घटनांनतर, 2021 पासून वारंवार पूराचा कहर पाहायला मिळाला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, ही हवामानातील बदलामुळे (climate change) उद्भवलेली परिस्थिती आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(Reuters च्या माहितीसह)