राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये व्हाईट हाऊसकडून कपात

0

व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा आकार आणि जबाबदारी यांच्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी कपात केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डझनभर कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

युक्रेनपासून काश्मीरपर्यंतच्या बहुतेक प्रमुख भू-राजकीय मुद्द्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुपारी बडतर्फ करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अर्थात या सूत्रांना माध्यमांशी बोलण्याची परवानगी नसल्याने त्यांनी नाव न छापण्याची विनंती केली.

परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी माइक वॉल्ट्झ यांच्याकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर काही आठवड्यांनंतरच हे पाऊल उचलण्यात आले.

सूत्रांनी सांगितले की, एनएससीच्या पुनर्रचनेमुळे एजन्सीचा प्रभाव आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे एका शक्तिशाली धोरणात्मक संस्थेचे रूपांतर एका लहान संघटनेत  होईल. याशिवाय राष्ट्रपतींच्या अजेंड्याला आकार देण्यापेक्षा तो अंमलात आणण्यावर यानंतर संघटना अधिक लक्ष केंद्रित करेल.

प्रत्यक्षात, या निर्णयामुळे  परराष्ट्र विभाग, संरक्षण विभाग आणि मुत्सद्देगिरी, राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर बाबींमध्ये गुंतलेल्या इतर विभागांना आणि एजन्सींना अधिक अधिकार मिळण्याची अपेक्षा आहे.

फक्त पन्नास लोक?

प्रशासनाचे उद्दिष्ट एनएससीचा आकार काही डझन लोकांपर्यंत कमी करणे आहे. सूत्रांनुसार, एनएससीमधील अंतिम सदस्यांची संख्या सुमारे 50 लोकांपर्यंत मर्यादित राहिल अशी अपेक्षा आहे.

एनएससी ही पारंपरिकपणे राष्ट्राध्यक्षांद्वारे राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचे समन्वय साधण्यासाठी वापरली जाणारी मुख्य संस्था आहे. जगातील सर्वात अस्थिर संघर्षांबाबत अमेरिकेच्या दृष्टिकोनासंदर्भात इथले कर्मचारी अनेकदा महत्त्वाचे निर्णय घेतात, याशिवाय अमेरिकेला सुरक्षित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

डेमोक्रॅटिक अध्यक्ष जो बायडेन यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेत 300 हून अधिक कर्मचारी होते, परंतु ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ही संख्या बायडेन यांच्या एनएससीच्या आकारापेक्षा निम्म्याहून कमी झाली होती. एजन्सीमधून बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या इतर पदांवर हलवले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

आयझेनहॉवर एक्झिक्युटिव्ह ऑफिस बिल्डिंगमध्ये, जिथे एनएससीचे कार्यालय आहे, तिथे कमी करण्यात आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना रडू कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अनेक रूढीवादी लोक दीर्घकाळापासून एनएससीचा आकार कमी करण्यासाठी आग्रही आहेत. कारण यातील अनेक पदे सरकारमध्ये इतरत्र आढळणाऱ्या कामांचेच अनुकरण करणारी आहेत. डेमोक्रॅट्स आणि काही रिपब्लिकननी असा युक्तिवाद केला आहे की ही संस्था बंद केल्याने तज्ञांच्या सल्ल्यानुसार आखली जाणारी ट्रम्प यांची धोरणे आता  कमी माहितीपूर्ण असतील.

प्रतिभाशाली व्यक्तींचा अभाव

गेल्या काही महिन्यांत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला उच्च प्रतिभा असलेल्या व्यक्तींची भरती करण्यात अडचणी येत आहेत. लॅटिन अमेरिकन कारभार पाहणाऱ्या सर्वोच्च पदासारखी काही महत्त्वाची पदे कायमस्वरूपी भरली गेलेली नाहीत.

उजव्या विचारसरणीच्या लॉरा लूमर यांनी ट्रम्प यांना राष्ट्रीय सुरक्षा कर्मचाऱ्यांची यादी सादर केल्यानंतर, वर्षाच्या सुरुवातीला अनेक उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले.

मागील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार वॉल्ट्झ यांनी चुकून येमेनमध्ये होणाऱ्या बॉम्बस्फोट मोहिमेची माहिती अटलांटिक पत्रकारासोबत शेअर केल्याचे उघड झाल्याने त्यांचे मनोबल आधीच खालावले होते.

पुनर्रचनेचा एक भाग म्हणून, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे काही विभाग – ज्यांना संचालनालये म्हणून ओळखले जाते – इतर संचालनालयांसह एकत्रित केले जातील किंवा पूर्णपणे काढून टाकले जातील, असे तीन सूत्रांनी सांगितले. उर्वरित बहुतेक संचालनालयांमध्ये, फक्त काही कर्मचारी शिल्लक राहतील, असे सूत्रांनी सांगितले.

तीन सूत्रांनी सांगितले की, स्वतंत्र संस्था म्हणून काम करणे थांबवू शकणाऱ्या संचालनालयांमध्ये आफ्रिकन व्यवहार आणि नाटो सारख्या बहुपक्षीय संघटनांचे निरीक्षण करणारी संचालनालये समाविष्ट आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleAustralia floods update: मृतांचा आकडा 5 वर; 10,000 मालमत्तांचे नुकसान
Next articleजागतिक Cybercrime Crackdown मध्ये 300+ सर्व्हर बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here