ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण-पूर्व भागात आलेल्या जीवघेण्या पुरामध्ये, 4 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शुक्रवारी, बचावकार्यादरम्यान, एका वाहनामध्ये अडकून बुडलेल्या माणसाचा मृतदेह सापडल्यानंतर, मृतांच्या आकडेवारीची पुष्टी करण्यात आली. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, संपूर्ण दक्षिण-पूर्व भागातील गावांचे प्रचंड नुकसान झाले असून, पाळीव प्राणी आणि अनेक घरे वाहून गेली आहेत.
पोलिसांनी सांगितले की, “सिडनीच्या सुमारे 550 किलोमीटर (342 मैल) उत्तर दिशेला असलेल्या, कॉफ्स हार्बरजवळ हा मृतदेह आढळून आला. आठवड्याच्या सुरुवातीला सुरू झालेल्या या पावसाळी आपत्तीनंतर अजून एक व्यक्ती बेपत्ता असून, शोधकार्य सुरू आहे.”
आपत्कालीन सेवा अधिकाऱ्यांनी सांगितले की, “सुमारे 50,000 लोक अजूनही isolated आहेत. हवामान सुधारत असले तरी, जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न अधिक वेगवान करण्यात आले आहेत.”
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पाण्याखाली घरे गेलेल्या नागरिकांनी संभाव्य धोके ओळखावेत आणि मदत पोहचेपर्यंत स्वत:ची काळजी घ्यावी, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
“जर तुमचे घर पूराच्या पाण्याने व्यापले असेल, तर त्या पाण्यात घातक पदार्थ असू शकतात. उंदीर, साप असू शकतात किंवा पाण्यात वीजेचा करंट असू शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे,” असे राज्य आपत्कालीन सेवा उपआयुक्त डॅमियन जॉन्स्टन यांनी सांगितले आहे.
पूराचे विदारक चित्र
टीव्हीवर जारी करण्यात आलेल्या व्हिडिओंमध्ये- पाण्याखाली गेलेले चौक, रस्त्यांवर पाण्यात बुडालेल्या गाड्या आणि नदीकिनाऱ्यांना आलेले पूर दिसत आहेत. न्यू साउथ वेल्समधील हंटर आणि मिड नॉर्थ कोस्ट भागात अनेक गावे पाण्याखाली गेली.
तर, पूरामुळे वाहून गेलेले मृत आणि जिवंत जनावरं किनाऱ्यावर वाहून आल्याचे, विदारक दृष्य दिसत आहे.
‘परिस्थिती भयावह’ असल्याचे म्हणत, पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी शुक्रवारी पूरग्रस्त गावांना भेट देण्याचे सांगितले.
“ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे, आम्ही पूर्णत: प्रयत्नशील आहोत,” असे अल्बानीज यांनी ट्रिपल एम न्यूकॅसल रेडिओला सांगितले.
शुक्रवारी, 100 पेक्षा अधिक शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या, तर हजारो घरांमध्ये वीज नव्हती. अनेक नद्या अजूनही धोक्याच्या पातळीवर असून, ती स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
Warragamba धरणात धोक्याची पातळी
गेल्या तीन दिवसांत, चार महिन्यांइतका पाऊस पडल्यामुळे आणि वादळी हवामानानंतर, सिडनीच्या दिशेला पावसाचे प्रमाण काहीसे हलके झाले. हवामान खात्याने सांगितले की, ‘शुक्रवारी संध्याकाळपर्यंत हे हवामान अजून सामान्य होईल अशी अपेक्षा आहे.’
Warragamba धरण, जे सिडनीच्या 80% पाणीपुरवठ्याचे स्रोत आहे, ते सध्या सुमारे 96% क्षमतेपर्यंत भरले असून, पावसामुळे लवकरच ते वाहून जाऊ शकते, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीनुसार)