राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गुरुवारी सियाचीन तळ छावणीला भेट देणाऱ्या पहिल्या भारतीय महिला राष्ट्रपती आणि एकूण तिसऱ्या महिला ठरल्या. सियाचीनला तैनात सैनिकांना त्यांनी संबोधित केले. जगातील सर्वात थंड तसेच सर्वोच्च युद्धभूमी अशी ओळख असणाऱ्या सियाचीनची सेवा आणि संरक्षण करताना सैनिकांच्या शौर्य, वचनबद्धता आणि समर्पणाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. बेस कॅम्प हे सियाचीन ग्लेशिअरचे प्रवेशद्वार आहे. तर सियाचीन ग्लेशिअर ही बर्फाची 76 किलोमीटर लांबीची वेगाने वाहणारी नदी आहे.
सियाचीन ग्लेशिअर हिमालयातील पूर्व काराकोरम पर्वतरांगेत एन. जे. 9842 पॉइंटच्या ईशान्येस सुमारे 20 हजार फूट उंचीवर आहे. या ठिकाणी भारत आणि पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा संपते. जगातील सर्वात उंच लष्करी क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. त्यामुळे इथे तैनात सैनिकांना लहरी हवामान परिस्थितीसोबतच तीव्र थंडी, जोरदार वारे आणि हिमदंश यांच्याशी लढावे लागते.
President Droupadi Murmu visited Siachen Base Camp and addressed the soldiers posted there. The President said that as the supreme commander of the armed forces, she felt very proud of them and that all citizens salute their bravery. pic.twitter.com/SFsaTYEQji
— President of India (@rashtrapatibhvn) September 26, 2024
सैनिकी पोशाखात असलेल्या राष्ट्रपती बेस कॅम्पमध्ये सैनिकांना संबोधित करताना म्हणाल्या की “ऑपरेशन मेघदूतची सुरूवात झाल्यापासून, भारतीय सशस्त्र दलातील शूर सैनिक आणि अधिकाऱ्यांनी या प्रदेशाची सुरक्षा सुनिश्चित केली आहे. त्यांना तीव्र हवामानाच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. जोरदार बर्फवृष्टी आणि उणे 50 अंश तापमान यासारख्या कठीण परिस्थितीतही ते पूर्ण भक्तीभावाने आणि सतर्कतेने आघाडीवर तैनात असतात.”
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे तीनही सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर असणाऱ्या राष्ट्रपतींसोबत होते. “मातृभूमीच्या रक्षणासाठी सैनिकाने प्राणाचे बलिदान देणे हे एक विलक्षण उदाहरण आहे,” असे राष्ट्रपती पुढे म्हणाल्या. मुर्मू यांनी सियाचीन युद्ध स्मारकावर श्रद्धांजली वाहिली. लष्कराने ऑपरेशन मेघदूत सुरू केल्यापासून कारवाईत शहीद झालेल्या सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या बलिदानाच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे.
“सर्व भारतीयांना आपल्या सैनिकांच्या बलिदान आणि शौर्याची जाणीव आहे. आम्ही त्यांचा आदर करतो,” असेही राष्ट्रपतींनी उपस्थित सैनिकांना सांगितले असे राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशात असलेल्या सियाचीन तळ छावणीला भेट देणाऱ्या मुर्मू या देशाचे तिसऱ्या राष्ट्रपती ठरल्या. याआधी एप्रिल 2004 मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी तर मे 2018 मध्ये रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती असताना सियाचीन बेस कॅम्पला भेट दिली होती.
टीम भारतशक्ती