युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा- उर्सुला वॉन डेर लेयन यांनी, रविवारी स्पष्टपणे सांगितले की, “युक्रेनमध्ये प्रत्यक्ष युद्धबंदी घडवून आणण्यासाठी रशियावर अधिक दबाव टाकण्याची गरज आहे, आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी G7 राष्ट्रांनी रशियाविरोधातील आर्थिक निर्बंध अधिक कडक करणे आवश्यक आहे.”
कॅनडाच्या रॉकी पर्वतरांगांमध्ये जागतिक औद्योगिक महासत्ता एकत्र जमल्या असताना, युरोपियन देशांचे प्रयत्न आहेत की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे लक्ष, इस्रायल आणि इराणदरम्यान मध्य पूर्वेत सुरू झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा युक्रेनमधील युद्धाकडे वळवले जावे.
दबाव वाढवण्याची रणनीती
सध्याच्या स्थगित कूटनीतिक परिस्थितीत, युरोपियन युनियन लवकरच रशियाविरोधात नवीन निर्बंधांचे पॅकेज स्विकारणार आहे. मात्र, अमेरिका आणि ट्रम्प प्रशासनाने अजूनपर्यंत नवे निर्बंध लावण्याबाबत फारसा उत्साह दाखवलेला नाही. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, “युद्धबंदीठी प्रयत्न करत असताना हे निर्बंध अडथळा ठरू शकतात.”
वॉन डेर लेयन म्हणाल्या की, “आपल्याला रशियावर अधिक दबाव आणावा लागेल, जेणेकरून खरी युद्धबंदी साधता येईल, रशिया चर्चेच्या टेबलावर बसेल आणि युद्ध संपेल. त्यासाठी निर्बंध अत्यावश्यक आहेत.” त्यांनी हे वक्तव्य, G7 देश — ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि अमेरिका सोमवारी चर्चा सुरू करण्यापूर्वी, एका पत्रकार परिषदेत केले.
“गेल्या आठवड्यात आम्ही 18व्या निर्बंध पॅकेजचा प्रस्ताव मांडला. मी G7 Summit मधील सर्व भागीदारांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण देईन,” असेही त्यांनी सांगितले.
मध्य पूर्वेकडे सर्वांचे लक्ष
दरम्यान, मध्य पूर्वेकडे (Middle East) संपूर्ण जगाचे लक्ष वळले आहे, जिथे इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे व्यापक प्रादेशिक युद्धाचा धोका वाढला आहे. परिणामी, तेलाच्या किंमती वाढल्या असून, जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चिंता निर्माण झाली आहे.
शनिवारी, ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत बोलताना वॉन डर लायन म्हणाल्या की, “आमच्यामध्ये अशा देशांच्या सहकार्याबाबत एकमत झाले, जे जागतिक बाजारातील विशेषतः ऊर्जा बाजारातील स्थैर्य राखण्यात रुची ठेवतात.”
“आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजाराच्या संदर्भात काय परिणाम होतात, यावर आम्ही विशेष लक्ष ठेवणार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्यापार आणि संरक्षण धोरण
ट्रम्प प्रशासनासोबत सुरू असलेल्या व्यापार चर्चांबाबत लेयन यांनी सांगितले की, “9 जुलैच्या अंतिम मुदतीपूर्वी चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढणे त्यांना अधिक पसंत आहे. मात्र, जर तडजोड झाली नाही, तर युरोपियन युनियन पर्यायी उपाययोजना तयार ठेवत आहे.”
वॉन डेर लेयन यांनी रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी संवाद साधला. त्यांनी इस्रायलचा स्वसंरक्षणाचा हक्क मान्य केला, पण दीर्घकालीन स्थैर्यासाठी कूटनीतिक मार्गच सर्वोत्तम असल्याचेही अधोरेखित केले.
“इराण हा या प्रांतातील अस्थिरतेचा मुख्य स्रोत आहे आणि आमची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे, इराणकडे कधीही अण्वस्त्रे असू नयेत,” असे त्या म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, “अलीकडील घडामोडींनी हे अधोरेखित केले आहे की, युरोपातील संघर्ष आणि मध्य पूर्वेतील संघर्ष यांच्यातील परस्परसंबंध दृढ होत चालले आहेत. इराणने तयार केलेली ड्रोन व क्षेपणास्त्रे अंधाधुंदपणे युक्रेनमधील आणि इस्रायलमधील शहरांवर आघात करत आहेत.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)