‘तेजस मार्क 1A’ लढाऊ विमान आपल्या पहिल्या उड्डाणासाठी सज्ज

0

भारतीय हवाई दल (IAF) अखेर आपल्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. इंजिन पुरवठ्यातील अडचणीमुळे झालेल्या दीर्घ विलंबानंतर, स्वदेशी बनावटीचे लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) ‘तेजस मार्क 1A’ आपल्या पहिल्या उड्डाणासाठी सज्ज आहे. 17 ऑक्टोबर रोजी, नाशिक येथून हे उड्डाण नियोजीत असून, यामुळे हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या ताफ्यात नवचैतन्य प्राप्त होईल.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार असून, हे उड्डाण केवळ सेवा चाचण्यांसाठी विमांनाच्या तयारीचे संकेत देत नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादनातील बांधिलकीही अधोरेखित करते.

विलंबावर मात: इंजिनमधील अडथळे दूर होण्यास सुरूवात

अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक (GE) या कंपनीकडून F404 इंजिन्सच्या पुरवठ्यात झालेल्या विलंबामुळे, LCA मार्क 1A जेट प्रकल्पाला दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. इंजिन पुरवठ्याबाबत 2021 मध्ये करार झाला होता, मात्र हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)ला अलीकडेच यापैकी चार इंजिन्स प्राप्त झाली. दरम्यानच्या काळात उत्पादन पूर्णपणे ठप्प होते. 

आता GE ने, या आर्थिक वर्षाअखेरीपर्यंत आणखी 12 इंजिन्स पुरवण्याचे आणि पुढील वर्षीपासून दरवर्षी नियमीत 20 इंजिन्स देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून चालू असलेला इंजिन पुरवठ्यातील अडथळा आता दूर होऊ लागला आहे. सध्या HAL कडे सुमारे 10 विमाने संरचनात्मकदृष्ट्या तयार आहेत, ज्यांची उड्डाण चाचणी आणि अंतिम प्रमाणन प्रक्रिया बाकी आहे, जी पूर्ण झाल्यावर त्यांचा हवाई दलात समावेश करण्यात येईल.

पहिले उड्डाण विशेष महत्वाचे

‘तेजस मार्क 1A’ चे हे पहिले उड्डाण औपचारिक हस्तांतरण नसले तरी, हवाई दलाच्या अधिग्रहगण योजनेअंतर्गत हे पहिले ऑपरेशनल उड्डाण असेल. यापूर्वी या विमानाची क्षमता तपासण्यासाठी अनेक उड्डाण चाचण्या पार पडल्या आहेत, ज्यात स्वदेशी बनावटीची ‘अस्त्र’ बीव्हीआर क्षेपणास्त्रे (BVR missiles), ASRAAM आणि लेझर मार्गदर्शित बॉम्ब्स यांच्यासह यशस्वी चाचण्यांचा समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांदरम्यान काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या, मात्र सॉफ्टवेअर अपडेट्स आणि प्रणालीतील सुधारणा यांमुळे, आता अंतिम चाचणीसाठी मार्ग मोकळा झाला आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर विमानाच्या अधिकृत वितरणासाठी मंजुरी मिळेल.

तेजस आणि IAF ची घटती स्क्वॉड्रन क्षमता

भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानांची संख्या घटून ती केवळ 29 वर आली आहे, जी मंजुरीत 42 स्क्वॉड्रन्सच्या तुलनेत खूपच कमी आहे, त्यामुळे तेजस विमानांची निकड अधोरेखित होते. यावर्षी सप्टेंबरमध्ये, दोन मिग-21 स्क्वॉड्रन्स निवृत्त झाल्यामुळे नवीन विमाने भरती करण्याची गरज आणखी तीव्र झाली आहे.

आत्तापर्यंत, वायुसेनेने तेजसच्या मूळ प्रकाराचील दोन स्क्वॉड्रन्स सेवेत दाखल केली आहेत. 2021 मध्ये, एकूण 83 तेजस मार्क 1A विमानांसाठी (73 लढाऊ आणि 10 प्रशिक्षणार्थी) एक करार करण्यात आला होता, ज्याआधारे आणखी 4 स्क्वॉड्रन्स तयार केली जाणार आहेत. याच करारातील पहिले विमान 17 ऑक्टोबर रोजी उड्डाणासाठी सज्ज होत आहे.

याशिवाय 2023 मध्ये, संरक्षण खरेदी परिषदेने आणखी 97 तेजस मार्क 1A विमानांसाठी (68 लढाऊ आणि 29 प्रशिक्षणार्थी) मंजुरी दिली होती, ज्याला यावर्षी केंद्रीय सुरक्षा समितीने अंतिम मान्यता दिली. या ऑर्डरचे एकूण मूल्य सुमारे ₹62,370 कोटींहून अधिक असून, पुढील काही वर्षांत एकूण 11 तेजस विमाने भारतीय हवाई दलात सामील होतील.

पायाभूत सुविधा आणि भविष्यासाठी रोडमॅप

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नाशिकमध्ये तेजस मार्क 1A आणि HTT-40 प्रशिक्षण विमानांसाठी दोन नव्या उत्पादन लाईन्सचे उद्घाटन करणार आहेत. उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी आणि वेळेवर विमानांची सुपूर्तता सुनिश्चित करण्यासाठी, ही पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

तेजस मार्क 1A पाठोपाठ HAL ने तेजस मार्क 2 संबंधी काम सुरू केले आहे, हे 4.5 पिढीचे अधिक प्रगत लढाऊ जेट असेल, ज्यामध्ये सुधारित क्षमतांबरोबरच आधुनिक अॅविऑनिक्स (Avionics) प्रणालीचा समावेश असेल, जे भविष्यातील लढाऊ गरजांची पूर्तता करण्यास सक्षम असेल.

‘प्रगती दर्शक’ लक्षवेधी टप्पा

तेजस मार्क 1A चे हे नियोजित उड्डाण केवळ एक तांत्रिक प्रगती नाही, भारताच्या लढाऊ विमान कार्यक्रमासाठीचा एक प्रगती दर्शक लक्षवेधी टप्पा आहे. परदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्वामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला हा महत्वाकांक्षी कार्यक्रम, आता अखेर पूर्णत्वास येत आहे. इंजिन पुरवठ्याच्या अडचणी दूर होत असून, उत्पादन प्रक्रियेला गती मिळत आहे. यामुळे भारतीय हवाई दलाला, त्यांच्या अत्यावश्यक लढाऊ क्षमतेतील कमतरता भरून काढण्यासाठी एक भक्कम स्वदेशी पर्याय उपलब्ध होणार आहे.

मूळ लेखिका– हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleसीमेवरील लष्करी कारवाईत 58 पाकिस्तानी सैनिक ठार, अफगाणिस्तानचा दावा
Next articleगाझा परिषद: भारताचा भर सुरक्षित इस्रायल, व्यवहार्य पॅलेस्टिनी राज्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here