डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करा: बेंजामिन नेतान्याहू

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 2025 चा ‘नोबेल शांतता पुरस्कार’ द्यावा अशी मागणी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शुक्रवारी नोबेल समितीकडे केली. गाझा संघर्षविराम करार घडवून आणण्यात ट्रम्प यांचे योगदान मोलाचे असल्याने, ते या पुरस्काराचे योग्य मानकरी असल्याचे नेतान्याहू म्हणाले.

“ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार द्या, त्यासाठी ते पात्र आहेत,” असे नेतान्याहू यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले. त्यांच्या कार्यालयाने ही पोस्ट शेअर करताना त्यासोबत एक फोटोही जोडला आहे, ज्यामध्ये नेतान्याहू ट्रम्प यांना पुरस्कार प्रदान करत आहेत. दरम्यान, हा फोटो AI द्वारे तयार केल्याची शक्यता आहे.

या वर्षातील नोबेल शांतता पुरस्कार विजेत्यांची अधिकृत घोषणा होण्याच्या काही तास आधीच, नेतान्याहू यांची ही मागणी समोर आली.

याच वर्षाच्या सुरुवातीला, नेतान्याहू यांनी नोबेल शांतता पुरस्कारासाठी औपचारिकरित्या ट्रम्प यांचे नाव सुचवले होते. त्यांनी वॉशिंग्टन भेटीदरम्यान ट्रम्प यांना नामनिर्देशनाचे पत्र देखील सादर केले होते.

दरम्यान, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा माजी अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर टीका केली. त्यांनी दावा केला की, ओबामांना 2009 मध्ये “काहीही न करण्यासाठी” आणि “देशाचे नुकसान करण्यासाठी” नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता.

व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत बोलताना, ट्रम्प म्हणाले की: “ओबामा निवडून आले आणि त्यांनी काही न करतासुद्धा त्यांना नोबेल दिले गेले. त्यावेळी त्यांनाही हे समजले नव्हते की, हा पुरस्कार त्यांना का देण्यात आलाय…”

ओबामांना 2009 मध्ये, त्यांच्या पहिल्या कार्यकाळातील आठव्या महिन्यात, “आंतरराष्ट्रीय राजनय आणि नागरी सहकार्य मजबूत करण्यासाठी केलेल्या विलक्षण प्रयत्नांबद्दल” नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला होता.

ट्रम्प यांनी ओबामा यांच्याशी, स्वतःच्या कार्याची तुलना करताना सांगितले की, “त्यांनी गाझामध्ये शांतता प्रस्थापित केली आणि आठ युद्धे थांबवली”. त्यांनी हेही स्पष्ट केले की, “ते स्वत: पुरस्कारामागे धावत नाहीयेत, पण आपल्या प्रयत्नांची दखल घेतली जावी, इतकीच त्यांची अपेक्षा आहे कारण त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत.”

ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया, इस्रायल सरकारने गाझा संघर्षविराम आणि ओलिसांची सुटका याबाबतचा पहिल्या टप्प्याचा करार झाल्याची पुष्टी दिल्यानंतर काही वेळातच आली. इजिप्तच्या कायरोमध्ये हा पहिला करार झाला असून, ट्रम्प यांनी हा त्यांच्या 20 पॉईंटर्सच्या मध्यपूर्व शांतता आराखड्याचा एक भाग असल्याचे म्हटले आहे.

इस्रायली सरकारच्या प्रवक्त्या शोष बेड्रोसियन यांनी सांगितले की, “गुरुवारी सकाळी, इजिप्तमध्ये या कराराच्या अंतिम मसुद्यावर सर्व पक्षांनी एकमताने स्वाक्षरी केली आणि सर्व जीवंत अथवा मृत ओलिसांना 72 तासांच्या आत मुक्त करण्याची अट मान्य केली.

संघर्षविरामाच्या करारातील अटींनुसार- इस्रायल आपले सैन्य गाझामधून माघारी घेईल, ओलिसांच्या बदल्यात शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांना सोडले जाईल आणि गाझामध्ये, संयुक्त राष्ट्रांनी दुष्काळ घोषित केलेल्या भागात, मोठ्या प्रमाणावर मानवतावादी मदत पोहोचवण्यास परवानगी दिली जाईल.

‘संघर्षविरामाच्या अटींच्या अनुषंगाने टप्प्याटप्प्याने माघार घेण्याची तयारी सुरू झाली आहे,’ असे इस्रायली संरक्षण दल (IDF) ने सांगितले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleOver 30 Nations to Join India-Led UN Peacekeeping Chiefs’ Conclave 2025 in New Delhi
Next articleIndia’s Theatre Command Reform: From Rhetoric to First Steps

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here