सोमवारी, एका पॅलेस्टिनी अधिकार्याने सांगितले की, “हमासने अमेरिकेच्या विशेष दूत- स्टीव्ह विटकॉफ यांनी सादर केलेल्या युद्धविराम प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे.” मात्र, एका इस्रायली अधिकाऱ्याने हा दावा फेटाळून लावत म्हटले की, “ही प्रस्तावाला अमेरिकेचे समर्थन नाही आणि इस्रायली सरकार त्यांच्या कोणत्याही अटी स्वीकारू शकत नाही असा आग्रह धरला.”
विटकॉफ यांनी स्वतः देखील स्पष्ट केले की, “हमासने त्यांचा प्रस्ताव स्विकारल्याचा दावा ‘पूर्णपणे अस्वीकार्य’ आहे आणि सध्या चर्चेत असलेला प्रस्ताव त्यांच्या मूळ प्रस्तावाशी जुळत नाही.”
70 दिवसांचा युद्धविराम, अंशतः माघार?
हमासच्या जवळील एका पॅलेस्टिनी सूत्राने रॉयटर्सला सांगितले की, युद्धविरामात प्रस्तावात पुढील गोष्टींचा समावेश आहे:
- 10 जिवंत इस्रायली बंदींची सुटका, दोन टप्प्यांत
- 70 दिवसांचा युद्धविराम
- गाझा पट्टीतून इस्रायलची अंशतः माघार
- शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका, जे दीर्घकालीन शिक्षा भोगत आहेत
मात्र, इस्रायली अधिकाऱ्याने या प्रस्तावाला फेटाळून लावत आणि म्हटले की, “कोणतेही जबाबदार सरकार अशा अटींना मान्यता देऊ शकत नाही. तसेच हा प्रस्ताव विटकॉफ यांच्याशी संबंधित असल्याचेही त्यांना नाकारले.”
नेतन्याहू यांचे वक्तव्य
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एका व्हिडिओ संदेशामध्ये म्हटले की, “मी आशा करतो की आज किंवा उद्या, मी हमासविरोधातील लढा आणि बंदींच्या सुटकेसंदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी सांगू शकेन.”
त्यांच्या कार्यालयाने या व्हिडिओबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
याआधी 18 मार्च रोजी, इस्रायलने जानेवारीत झालेला युद्धविराम संपुष्टात आणून गाझामध्ये सैनिकी मोहिम पुन्हा सुरू केली होती. त्यानंतर हमास आणि त्याच्या सहयोगी गटांनी पुन्हा रॉकेट हल्ले आणि अन्य कारवाया सुरू केल्या.
हमासचे प्रस्ताव, इस्रायलचा प्रतिसाद
हमासने म्हटले आहे की, ‘जर इस्रायलने गाझामधून पूर्णपणे माघार घेतली, तर ते सर्व उर्वरित इस्रायली बंदींना मुक्त करण्यास आणि कायमस्वरूपी युद्धविराम देण्यास तयार आहेत.’
परंतु पंतप्रधान नेतन्याहू यांनी स्पष्ट सांगितले की, “इस्रायल फक्त तात्पुरता युद्धविराम स्विकारेल, तोही बंदीच्या सुटकेच्या मोबदल्यात.”
“लढा तेव्हाच संपेल, जेव्हा हमासचा पूर्णपणे नाश केला जाईल,” असा त्यांचा ठाम निर्धार आहे.
7 ऑक्टोबर 2023 रोजी, हमासच्या नेतृत्वाखालील दहशतवाद्यांनी इस्रायलच्या दक्षिण भागात अचानक केलेल्या हल्ल्यात 1,200 लोक ठार झाले आणि 251 लोकांना गाझामध्ये बंदी बनवले गेले, अशी इस्रायली आकडेवारी सांगते.
इस्रायलच्या हवाई आणि जमिनीवरील आक्रमणात, आतापर्यंत गाझामध्ये सुमारे 54,000 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे गाझा आरोग्य प्राधिकरणाचे म्हणणे आहे.
संकटग्रस्त भागात तीव्र कुपोषणाच्या घटना वाढल्याचेही मदत संस्थांनी निदर्शनास आणले आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)