आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद्यांना संरक्षण देत असलेल्या पाकिस्तान विरोधात, भारताने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. इस्रायली वृत्तवाहिनी ‘आय24’ ला दिलेल्या एका मुलाखतीत, वरिष्ठ भारतीय राजदूत जेपी सिंग, जे सध्या इस्रायलमधील भारताचे राजदूत आहेत, त्यांनी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाईंड्सना, भारताकडे सुपूर्त करण्यास पाकिस्तानने नकार दिल्यामुळे त्यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे.
“अमेरिका जर 26/11 चा कट रचणारा भारताला देऊ शकते, तर पाकिस्तानने खरे मास्टरमाइंड्स भारताच्या हवाली का करु नयेत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी यावेळी अमेरिकेकडून भारताच्या ताब्यात देण्यात आलेल्या तहव्वूर हुसेन राणा घटनेचा संदर्भ दिला. “हाफिज सईद, लखवी, साजिद मीर यांना फक्त आमच्याकडे सोपवा, सगळं संपेल,” अशी तीव्र प्रतिक्रिया सिंग यांनी दिली.
पाकिस्तान, इराण आणि अफगाणिस्तान (PIA) डेस्कचे नेतृत्व केलेले आणि पाकिस्तानमध्ये काम केलेले ज्येष्ठ डिप्लॉमॅट सिंग यांनी स्पष्ट केले की, “भारत आता पाकिस्तानचे ‘डबल गेम्स’ सहन करणार नाही.”
पाकिस्तानने दहशतवाद्यांना संरक्षण देणे थांबवले पाहिजे
सिंग म्हणाले की, “भारताने सातत्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा भारतीय भूमीवरील हल्ल्यांशी थेट संबंध दर्शवणारे विश्वासार्ह पुरावे सादर केले आहेत, ज्यात 26/11 मुंबई हल्ला, पठाणकोट एअरबेसवरील हल्ला आणि पुलवामा आत्मघाती हल्ला यांचा समावेश आहे. तरीही, गुन्हेगार मोकळे फिरत आहेत कारण त्यांना पाकिस्तानचे संरक्षण मिळते आहे.”
“पाकिस्तानने केवळ आंतरराष्ट्रीय न्यायाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले नाही, तर या दहशतवाद्यांना फोफावण्याची मुभा दिली आहे. हाफिज सईद आणि लखवीसारखे दहशतवादी आजही राज्याच्या संरक्षणाखाली आहेत,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
“हा मानवतेवरचा हल्ला आहे”: पहलगाम हत्याकांडावर सिंग यांची प्रतिक्रिया
सिंग यांनी नुकत्याच घडलेल्या पहलगाम हत्याकांडाचा उल्लेख करत, या हल्ल्यांचा सांप्रदायिक हेतू अधोरेखित केला. 22 एप्रिल रोजी, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी लोकांचा धर्म विचारून नंतर त्यांची हत्या केली.
“हा केवळ दहशतवाद नाही, तर हा मानवतेवरचा हल्ला आहे. 26 निरपराध लोक फक्त त्यांच्या श्रद्धेमुळे मारले गेले,” असे सिंग म्हणाले
ऑपरेशन सिंदूर: थांबवले आहे, संपवलेले नाही
भारतीय सीमांवर दहशतवाद्यांविरोधातील कारवायांचा उल्लेख करत सिंग म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने दहशतवादी ठिकाणे नष्ट केली.”
“भारताने अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. पाकिस्तानने आमच्या लष्करी चौक्यांवर प्रतिउत्तर दिले तेव्हा आम्हीही त्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले,” असेही त्यांनी सांगितले.
“सीमारेषेवरील युद्धविराम सध्या टिकून आहे, पण हे लक्षात ठेवा, ऑपरेशन सिंदूर फक्त थांबवले आहे, संपवलेले नाही,” असेही सिंग यांनी स्पष्ट केले.
“रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही”
सिंग यांनी, सिंधू जल करारावरील भारताच्या भूमिकेबाबतही रोखठोक भूमिका घेतली. “हा करार 1960 मध्ये चांगल्या विश्वासाने केला गेला होता, पण पाकिस्तानने वारंवार त्याचा अपमान केला. पंतप्रधानांनी म्हटलेच आहे – रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. म्हणूनच भारताने हा करार स्थगित केला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दहशतवादाविरोधात जागतिक आघाडीची गरज
भारताच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणावर भर देत, सिंग यांनी दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवरील एकत्रित कृतीची मागणी केली. “दहशतवाद ही जागतिक समस्या आहे. भारताने दाखवून दिले आहे की, आक्रमक आणि पूर्वसावध कृती ही आता नवी नॉर्मल आहे. दहशतवादी आणि त्यांचे समर्थक यांना परिणाम भोगावेच लागतील,” असे ते म्हणाले.
“फक्त निवेदनं पुरेशी नाहीत, आता कृती घडायला हवी. पाकिस्तानला राजनैतिक सौजन्याच्या आड लपून हिंसेसाठी सुरक्षित आश्रय देण्याचा हक्क उरलेला नाही,” असा स्पष्ट संदेश सिंग यांनी दिला.
टीम भारतशक्ती