दृढता, कौशल्य आणि निर्धार यांचा मेळ घालत आणि नवा इतिहास रचत, दोन महिला भारतीय नौदल अधिकाऱ्यांनी, आपली INSV Tarini वरील सागरी मोहिम यशस्वीपणे पूर्ण केली आहे. ही ऐतिहासिक जगप्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या अधिकारी आहेत- लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए, ज्यांनी आठ महिन्यांमध्ये तब्बल 50,000 किलोमीटरचा प्रवास, केवळ वाऱ्याच्या शक्तीचा वापर करत यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

गोवा येथे झालेल्या त्यांच्या आगमनामुळे, ही ‘नाविका सागर परिक्रमा’, या भारतीय नौदलाच्या सर्व महिला जागतिक प्रदक्षिणा उपक्रमाच्या, दुसऱ्या पर्वाची यशस्वी पूर्तता झाली. दोन्ही अधिकाऱ्यांनी 2 ऑक्टोबर 2024 रोजी, परिक्रमेला सुरुवात केली होती आणि ते 29 मे 2025 रोजी किनाऱ्यावर पोहोचण्याची अपेक्षा होती.
त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या सन्मानार्थ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह वैयक्तिकरित्या गोवा बंदरावर त्यांचे स्वागत करतील. हे यश या मिशनचे महत्त्व आणि भारताच्या सशस्त्र दलांतील महिलांचे वाढते स्थान दर्शवणारा एक संकेत आहे.
विविध खंडांवरील धाडसी प्रवास
17 मीटर लांब आणि 5 मीटर रुंद, अशा इंजिनविरहीत नौकेत प्रवास करताना या अधिकाऱ्यांनी, खवळलेल्या समुद्रांचा आणि अनपेक्षित हवामानाचा सामना केला, चार वेगवेळे खंड, तीन महासागर ओलांडले आणि तीन प्रमुख महासागरी टोकांजवळून प्रवास केला, ज्यामध्ये केप ल्यूविन (ऑस्ट्रेलिया), केप हॉर्न (दक्षिण अमेरिका) आणि केप ऑफ गुड होप यांचा समावेश होता. (दक्षिण आफ्रिका). त्यांच्या नौकेने कोणत्याही कालव्यातून किंवा सामुद्रधुनीतून प्रवास केला नाही, ज्यामुळे या यात्रेची शुद्धता आणि कठोरता अधोरेखित होते.
या मोहिमेतील, एक विशेष उल्लेखनीय टप्पा म्हणजे त्यांनी पॉइंट नीमो यशसस्विरित्या पार केला, जे पृथ्वीवरील सर्वात दुर्गम सागरी स्थान असून, दक्षिण पॅसिफिक महासागरात स्थित आहे. “स्पेसक्राफ्ट ग्रेवयार्ड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निर्जन भागाजवळील सर्वात जवळचे मानवी अस्तित्व बहुधा अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात असते, जे पृथ्वीपासून सुमारे 400 किमी उंचीवर प्रदक्षिणा घालते.
आठ महिन्यांच्या समुद्र प्रवासासाठी वर्षांची तयारी
प्रवास सुरू करण्यापूर्वी, लेफ्टनंट कमांडर दिलना आणि लेफ्टनंट रूपा यांनी तीन वर्षांची सलग तयारी केली. त्यांच्या प्रशिक्षणात लांब अंतरावरील नौकाविहार मोहिमा देखील होत्या, जसे की- गोवा ते मॉरिशस, रिओ डी जानेरिओ मार्गे केप टाउन, तसेच पोर्ट ब्लेअरचा प्रवास… या सर्व मोहिमा त्यांची कठीण सागरी परिस्थितींमधील सहनशक्ती आणि कौशल्य तपासण्यासाठी आयोजित केल्या होत्या.
भारतीय नौदलाने या मोहिमेसाठी स्वयंसेवकांची मागणी केली होती, आणि कठीण निवड प्रक्रियेनंतर या दोन अधिकाऱ्यांची निवड झाली. त्यांच्या प्रशिक्षणात समुद्रावर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान शिकणे आणि त्यांच्या वाऱ्याच्या शक्तीवर चालणाऱ्या INSV तारिणीच्या देखभालीचे कौशल्य आत्मसात करणे यांचा समावेश होता.
सक्षमीकरण आणि उत्कृष्टतेचे प्रतीक
INSV तारिणीची ही यात्रा, केवळ समुद्री कौशल्याची कसोटी नाही, तर ती भारताच्या संरक्षण दलांमधील जेंडर इक्वॉलिटीच्या वाढत्या प्रमाणाचे प्रतीक आहे. ही मोहिम 2017 मध्ये, पहिली नाविका सागर परिक्रमा पूर्ण करणाऱ्या सहा महिला नौदल अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानंतर उभी राहिली आहे, जी पूर्णत: नौदलाच्या महिला नेतृत्वातील भूमिकेला वाढवण्याच्या दृष्टीकोनावर आधारित आहे.
ज्या बंदरातून त्यांनी या मोहिमेची सुरुवात केली, त्याच बंदरात यशस्वीरित्या परिक्रमा पूर्ण करुन परतत, दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी संपूर्ण सागरी प्रदक्षिणेचे कठोर आंतरराष्ट्रीय निकष पूर्ण केले आहेत.
टीम भारतशक्ती