जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वाढविण्याच्या शर्यतीमध्ये, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्या अधिक मोठी व शक्तिशाली लँग्वेज मॉडेल्स तयार करण्यावर भर देत आहेत. मात्र भारतातील, IIT-मद्रास आणि Ziroh Labs यांचा याबाबतची दृष्टिकोन काहीसा वेगळा आहे. “आम्ही एक असे मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत, जे आकर्षक असण्यापेक्षा अधिक उपयुक्त असेल,” असे आयआयटी मद्रासचे संचालक प्रा. व्ही. कामाकोटी यांनी सांगितले.
स्ट्रॅटन्यूज ग्लोबलचे (StratNews Global) अनिल पद्मनाभन यांच्याशी झालेल्या सखोल संवादात, प्रा. कामाकोटी यांनी त्यांच्या AI विकासाच्या दृष्टिकोनाचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, “छोटी लँग्वेज मॉडेल्स (SLMs) दैनंदिन उपयोगासाठी तयार केली जात आहेत आणि खास करुन ती Kompact AI या देशी AI प्लॅटफॉर्मवर कार्य करण्यासाठी डिझाइन केली गेली आहेत. हे प्लॅटफॉर्म GPU न वापरता केवळ CPU द्वारे inference (गणना) सक्षम करतात, ज्यामुळे खर्च आणि उर्जा दोन्हीचा वापर कमी होतो.
छोटे मॉडेल्स, मोठा परिणाम
भारताची AI क्षेत्रात सुरु असलेली वाटचाल, इतर यशस्वी डिजिटल सार्वजनिक सेवांशी साधर्म्य राखते. जसे की UPI (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस). 2016 मध्ये UPI ने केवळ काही हजार व्यवहार प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. मात्र, आज ही प्रणाली दररोज कोट्यवधी लहान व्यवहार, ज्यातील बरेचसे ₹200 पेक्षाही कमी किमतीचे आहेत, ते अगदी सहज पार पाडते. याच पद्धतीने, Kompact AI आणि त्यावर आधारित छोटी लँग्वेज मॉडेल्स ही AI ला सार्वजनिक सेवा म्हणून वापरण्यायोग्य व विश्वासार्ह बनवण्याच्या उद्देशाने विकसित केली जात आहेत, केवळ प्रभावी दिसण्यासाठी नाही.
“आमचे उद्दिष्ट असे AI तयार करणे आहे जे आमच्यासाठी उपयुक्त आहे, केवळ आकर्षक नाही,” असे कामाकोटी म्हणाले. “ही छोटी लँग्वेज मॉडेल्स दैनंदिन वापरासाठी अधिक अचूकपणे कार्य करत आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे ती GPU शिवाय देखील चालवली जाऊ शकतात.”
बंगळूरु-आधारित स्टार्टअप आणि IIT मद्रास यांच्या सहकार्याने विकसित केलेले कॉम्पॅक्ट AI मॉडेल, AI इकोसिस्टममधील एक गंभीर समस्या सोडवते, ती म्हणजे उच्च ऊर्जेचा वापर आणि पायाभूत सुविधेचा खर्च. जीपीयू-केंद्रित अनुमानाची आवश्यकता नसताना AI मॉडेल्सना कार्य करण्याची परवानगी देऊन, कॉम्पॅक्ट AI लक्षणीयरीत्या विजेचा वापर कमी करते आणि सुलभता वाढवते.
ही नवकल्पना DeepSeek किंवा ChatGPT सारख्या मोठ्या मॉडेल्सना पराभूत करण्याच्या स्पर्धेसाठी नाही, तर तिचा मुख्य उद्देश आहे – सार्वजनिक हितासाठी एक विश्वासार्ह, जबाबदार AI प्लॅटफॉर्म तयार करणे.
प्रसिद्धीपेक्षा विश्वासाला अधिक प्राधान्य
प्रा. कामाकोटी यावर भर देतात की, विश्वासार्हता आणि अचूकता अत्यंत महत्त्वाची आहे, विशेषत: जेव्हा AI चा वापर शिक्षणामध्ये केला जातो. “तुम्ही मुलांना चुकीची माहिती देता कामा नये,” असे ते म्हणतात. ते आठवण करुन देतात की, “लार्ज लँग्वेज मॉडेल्सच्या (LLMs) पूर्वीच्या आवृत्त्यांनी जेईई ॲडव्हान्स्डच्या (JEE Advanced) प्रश्नांची कशाप्रकारे चुकीची उत्तरे दिली होती. “आकर्षक पण तथ्यावर आधारित नसलेल्या मॉडेल्सवर जास्त अवलंबून न राहण्याचा सल्ला ते देतात.
याच कारणासाठी Kompact AI हे मॉडेल, पडताळणीयोग्यता (verifiability) आणि विशिष्ट विषयांवर अचूक कार्य करण्यासाठी तयार केले आहे. हे कोणत्याही एकाच मॉडेलवर आधारित नसले तरी, हे छोटे, अचूक व लक्ष्यित भाषा मॉडेल्स केवळ CPU वर चालवण्याची सुविधा देते. त्यामुळे हे ऊर्जासक्षम आहे आणि भारतासारख्या देशात, जिथे पायाभूत सुविधा व खर्च मोठी अडचण असते, हे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
IIT मद्रास आणि Ziroh Labs यांच्यातील सहकार्य ही उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील वाढती भागीदारी दर्शवते.
“आमच्या इनक्युबेटरमध्ये सध्या 104 स्टार्टअप्स आहेत, या भागीदारींमुळे शैक्षणिक संशोधन प्रत्यक्ष समाजोपयोगी उत्पादनांमध्ये रूपांतरित होत आहे,” असे प्रा. कामकोटी सांगतात.
भारतात उदयास येत असलेली AI इकोसिस्टम, ही सार्वजनिक हिताचा विचार करते, ज्यात तात्पुरत्या प्रसिद्धीऐवजी दीर्घकालीन उपयुक्ततेवर लक्ष केंद्रित केले जात आहे. कॉम्पॅक्ट AI कदाचित त्याच्या पाश्चात्त्य समकक्षांप्रमाणे मुख्य बातम्यांमध्ये वर्चस्व गाजवेल असे नाही, परंतु त्याचा स्थिर, वास्तूकला-आधारित दृष्टिकोन केवळ मोजक्या लोकांसाठी नव्हे, तर सर्वांसाठी व्यापकरित्या AI ला सक्षम करण्याचे सामर्थ्य बाळगतो.
by, Aishwarya Parikh