संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, यांनी बुधवारी नवी दिल्लीत मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी दोन्ही राष्ट्रांमधील संरक्षण तसेच सुरक्षा संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या द्विपक्षीय सहकार्याचा व्यापक आढावा घेतला आणि भारत-मालदीव यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारी पुढे नेण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.
सिंग यांनी मालदीवच्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमानुसार, त्यांची संरक्षण क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने, प्लॅटफॉर्म आणि उपकरणांच्या तरतुदीसह पाठिंबा देण्याच्या भारताच्या तयारीचा पुनरुच्चार केला. ही मदत भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरण आणि ‘SAGAR’ (सर्व क्षेत्रातील सुरक्षा आणि प्रगती) च्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.
शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेत बोलताना सिंग यांनी, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या नुकत्याच झालेल्या भारत भेटीदरम्यान त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेची आठवण करुन दिली, ज्यामध्ये प्रशिक्षण, संयुक्त सराव आणि उपकरणे पुरवणे यासह संरक्षण क्षेत्रातील क्षमता वाढीसाठी मालदीवला भारताकडून समर्थनावर देण्यावर भर दिला गेला होता. सिंग म्हणाले, की “भारत देश नियमीत प्रशिक्षण, संयुक्त सराव आणि संरक्षण साहित्याच्या पुरवठ्याद्वारे मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलाच्या क्षमता वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे”
मौमून यांनी मालदीवचा विश्वासू “प्रथम प्रतिसादकर्ता” म्हणून भारताच्या भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि मालदीवच्या संरक्षण पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण तसेच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची कबुली दिली. चर्चेदरम्यान, मालदीव सरकारच्या विनंतीनुसार भारताने संरक्षण उपकरणांचा पुरवठा त्यांच्याकडे सुपूर्द केला.
मौमून यांचा भारतातील हा पहिला अधिकृत दौरा असून, द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या उच्च-स्तरीय सहभागांच्या मालिकेचा एक भाग आहे. ते आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात, मुंबई आणि गोवा राज्यांना भेटी देतील. गेल्याच आठवड्यात, मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला खलील यांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी व्यापक चर्चा केली होती. तर ऑक्टोबरमध्ये यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी भारताला भेट दिली होती.
भारत-मालदीव संबंधांमधील आव्हाने
राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी अलीकडेच, मालदीवमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्करी सैन्याने, माघार घेण्याची मागणी केल्यानंतर, भारत आणि मालदीव संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. भारतीय जवानांना हिंद महासागर द्वीपसमूहातील दोन भारतीय लष्करी तळांची देखरेख आणि संचालन करण्याचे काम सोपवण्यात आले होते. मात्र मुइझू यांच्या मागणीनंतर, त्यांची बदली भारतीय नागरी कर्मचाऱ्यांमध्ये करण्यात आली, ज्यामुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला.
मुइझ्झू, ज्यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये, राष्ट्राध्यक्षाचा पदभार स्वीकारला आणि जे त्यांच्या चीन समर्थनात्मक भूमिकेसाठी ओळखले जातात, त्यांनी पदाची शपथ घेतल्याच्या काही तासातच, भारताचे सैन्य मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र असे असूनही, दोन्ही राष्ट्रांनी हिंदी महासागर क्षेत्राच्या सुरक्षेसाठी, भागीदारीचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करून, आपापसातील सुरक्षा संबंध कायम दृढ ठेवण्याचा त्यांचा मानस बोलून दाखवला.