संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) अखत्यारितील हैदराबादस्थित संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने ध्वनीपेक्षा पाचपट अधिक वेगाने (हायपरसॉनिक) मारा करू शकणार्या शस्त्रास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. डीआरडीएलने हैदराबाद इथे नव्याने उभारलेल्या अत्याधुनिक स्क्रॅमजेट कनेक्ट चाचणी सुविधेत एक हजार सेकंदांपेक्षा जास्त कालावधीसाठी सक्रिय शीतकरण प्रणाली असलेल्या स्क्रॅमजेट सबस्केल कम्बस्टरची जमिनीवर दीर्घकाळ चाचणी केली.
सुपरसॉनिक ज्वलन करण्यास सक्षम हवा-श्वास इंजिनद्वारे चालणारी हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे, मॅक 5 पेक्षा (6 हजार100 किमी/तासापेक्षा जास्त) जास्त वेगाने विस्तारित कालावधीसाठी टिकून राहू शकतात. DRDO चे यश केवळ स्क्रॅमजेट ज्वलन यंत्राच्या दीर्घकालीन कामगिरीला मान्यता देत नाही तर त्याच्या अत्याधुनिक जमिनीवरील चाचणी सुविधेची परिचालन सज्जता देखील दर्शवते.
या चाचणीचे यश हे DRDOच्या प्रयोगशाळा, तसेच संबंधित उद्योग क्षेत्र आणि शैक्षणिक संस्था या सर्वांच्याच एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे आणि यामुळे देशाच्या हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमासाठी एक मजबूत पाया तयार होण्याचा मार्गही प्रशस्त झाला आहे.
India takes a major leap in #HypersonicTech!
DRDL, a Hyderabad based lab under @DRDO_India, successfully completed 1000+ sec ground test of Active Cooled Scramjet Combustor at its new #Scramjet Connect Test Facility. This paves the way for flight-worthy #HypersonicCruiseMissile… pic.twitter.com/9NwvvheehD
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) April 25, 2025
या उल्लेखनीय यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO, उद्योग क्षेत्रातले भागीदार आणि शैक्षणिक संस्थांचे अभिनंदन केले आहे. देशाला हायपरसॉनिक शस्त्र तंत्रज्ञानासारखे महत्वाचे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी केंद्र सरकारच्या दृढ संकल्पाचे प्रतिबिंब या यशातून उमटले असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अंतर्भावासह एक हजार सेकंदांपेक्षा जास्त काळ सुपरसॉनिक ज्वलनाच्या या यशस्वी प्रात्यक्षिकासाठी DRDO चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी देखील संस्थेच्या क्षेपणास्त्रे आणि सामरिक प्रणाली विभागाचे महासंचालक यू. राजा बाबू, DRDO चे संचालक डॉ. जी. ए. श्रीनिवास मूर्ती आणि संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.
टीम भारतशक्ती