संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, यांनी 17 एप्रिल रोजी, युनायटेड किंगडमचा आपला दोन दिवसीय दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात त्यांनी, युकेचे संरक्षण विभागाचे स्थायी कनिष्ठ सचिव डेव्हिड विल्यम्स, यांच्यासोबत 24व्या भारत-यूके संरक्षण सल्लागार गट (DCG) बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले.
सिंह यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान उच्चस्तरीय भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करताना, भारत आणि ब्रिटनमधील धोरणात्मक आणि संरक्षणात्मक सहकार्य अधिक बळकट करण्याच्या सामायिक वचनबद्धतेला अधोरेखित केले. ही चर्चा व्यापक धोरणात्मक भागीदारी आणि भारत-यूके 2030 रोडमॅपच्या चौकटीत पार पडली. बदलत्या जागतिक आणि प्रादेशिक सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, या संवादामध्ये लष्करी संबंध आणि औद्योगिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला गेला.
या दौऱ्यादरम्यान, संरक्षण सचिवांनी युकेच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही सखोल चर्चा केली, ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोनथन पॉवेल यांचाही समावेश होता. तिन्ही सैन्य दलांमधील सहकार्य वाढवणे आणि दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांमधील संबंध अधिक मजबूत करणे, हा या चर्चेचा केंद्रबिंदू होता.
यूके इंडिया बिझनेस कउन्सिलच्या वतीने आयोजित, भारत-यूके संरक्षण उद्योग गोलमेज परिषदेत बोलताना, सिंह यांनी भारतात झपाट्याने विकसित होत असलेल्या संरक्षण नवप्रवर्तन प्रणालीवर प्रकाश टाकला. त्यांनी नौदल प्रणाली, मानवविरहित यंत्रणा, निगराणी, संरक्षण अंतराळ व वैमानिक क्षेत्रातील भारतीय स्टार्टअप्सचे महत्त्व अधोरेखित केले आणि यूकेच्या कंपन्यांना या उदयोन्मुख स्टार्टअप्ससोबत भागीदारी करण्याचे आवाहन केले.
“भारतीय संरक्षण स्टार्टअप्स, आज जागतिक दर्जाची आणि आर्थिकदृष्ट्या कार्यक्षम सुविधा आणि उपाययोजना पुरवत आहेत,” असे सिंह म्हणाले. त्यांनी यूकेच्या कंपन्यांना उत्तर प्रदेश व तामिळनाडूमधील डिफेन्स कॉरिडॉरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रण दिले, जेथे राज्यस्तरीय प्रोत्साहन व उत्पादनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
सिंह यांनी यावेळी हे देखील जाहीर केले की, “भारत आणि यूके संरक्षण उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या पुढील संयुक्त प्रयत्नांसाठी औद्योगिक सहकार्य रोडमॅप तयार करत आहेत.”
Defence Secy Shri Rajesh Kumar Singh co-chaired the 24th India-UK Defence Consultative Group meet with his UK counterpart David Williams in London. Both sides reviewed defence ties, focusing on enhancing defence industry collaboration & boosting the #MakeInIndia initiative,… pic.twitter.com/pUd8NHc5UW
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) April 16, 2025
यूके दौऱ्याआधी, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी, 14 आणि 15 एप्रिल दरम्यान इटलीच्या रोम शहराचा अधिकृत दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी उच्चस्तरीय धोरणात्मक चर्चांमध्ये सहभाग घेतला आणि भारत-इटली संरक्षण व सुरक्षा भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी विविध करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
टीम भारतशक्ती