बऱ्याच विलंबानंतर अखेर या महिन्यात, भारतीय लष्कराला आपला ‘बोईंग AH-64E Apache Attack Helicopters चा’ पहिला ताफा मिळणार आहे. यामुळे लष्कराच्या कॉम्बॅट एव्हिएशन क्षमतेच्या आधुनिकीकरणात एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. 2020 मध्ये, $800 दशलक्ष डॉलर्सच्या कराराअंतर्गत खरेदी केलेल्या 6 अपाचे हेलिकॉप्टर्सपैकी प्रथम 3 हेलिकॉप्टर्स, लवकरच जोधपूरमध्ये पाकिस्तानच्या सीमेजवळ तैनात केली जाणार आहेत.
या अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सचा समावेश – लष्कराच्या विमान वाहतूक शाखेच्या विस्तारासह होतो आहे, ज्यामध्ये पश्चिम आणि उत्तर सीमेवरील उच्च-धोक्याच्या क्षेत्रांवर धोरणात्मक लक्ष केंद्रित केले जात आहे.
‘अपाचे’ स्क्वॉड्रन हे जोधपूरमधील नव्याने स्थापन झालेल्या 451 आर्मी एव्हिएशन स्क्वॉड्रनअंतर्गत कार्यरत असेल, जे पश्चिम कमांडच्या अधिपत्याखाली येते.
“ही आधुनिक यंत्रणांनी सुसज्ज हेलिकॉप्टर्स, वाळवंटातील रणांगणात लष्कराची ताकद वाढवतील, विशेषतः टँक-आधारित धोक्यांवर मात करण्यात बळ देतील,” असे एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले. “या हेलिकॉप्टर्सचा समावेश म्हणजे, युद्धभूमीवर आधुनिक, बहुउपयोगी हवाई साधनांच्या आधारे लष्कराची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न आहे,” असेही ते म्हणाले.
तांत्रिक विलंबानंतर अखेर वितरण
मूळ नियोजनानुसार, अपाचे हेलिकॉप्टर्सचा पहिला ताफा फेब्रुवारी २०२४ मध्ये पोहोचणे अपेक्षित होते, मात्र अमेरिकन सरकारच्या ‘फॉरेन मिलिटरी सेल्स’ (FMS) योजनेद्वारे होणाऱ्या उत्पादन व हस्तांतरण प्रक्रियेत विलंब झाल्यामुळे, वेळापत्रक अनेकदा पुढे ढकलले गेले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, यांनी अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्याशी अलीकडे झालेल्या टेलिफोनिक संभाषणात हा मुद्दा उपस्थित केला होता.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या निवेदनानुसार, दोन्ही बाजूंनी प्रमुख संरक्षण डिलिव्हरीला वेग देणे आणि द्विपक्षीय औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर जोर दिला.
एक युद्ध-सक्षम यंत्रणा
‘अपाचे AH-64E’ हे जगातील सर्वात आधुनिक आणि घातक अटॅक करणाऱ्या हेलिकॉप्टर्सपैकी एक मानले जाते, जे अफगाणिस्तान आणि इराक यांसारख्या संघर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले गेले आहे.
हे हेलिकॉप्टर हेलफायर व स्टिंगर क्षेपणास्त्रे, एक 30 मिमी लांबीची चेनगन तसेच आधुनिक नाईट व्हिजन आणि टार्गेटिंग सेन्सर्ससह सज्ज आहे. ते कोणत्याही हवामानात युद्ध करण्यास सक्षम असून, शत्रूंच्या टँक्सवर, तळांवर आणि मानवी सैन्यावर थेट आणि अचूक हल्ले करू शकते.
“अपाचेमधील सेन्सर तंत्रज्ञानामुळे कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही ऑपरेशन पार पाडणे सहज शक्य होते. त्याची मारा करण्याची क्षमता आणि टिकाउपणा त्याला युद्धभूमीवरील बिनतोड पर्याय सिद्ध करते,” असे अपाचे प्रशिक्षण कार्यक्रमाशी संबंधित लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
अपाचे हेलिकॉप्टर्सच्या वापरासंदर्भात, 6 भारतीय लष्करी वैमानिक आणि 24 तंत्रिक तज्ज्ञांना अमेरिकेत विस्तृत प्रशिक्षण देण्यात आले आहे. ही हेलिकॉप्टर्स हैदराबादमधील टाटा बोईंग एरोस्पेस लिमिटेड सुविधेत प्रथम असेंबल करण्यात आली आणि त्यानंतर अमेरिकेत अंतिम चाचणी व समाकलनासाठी पाठवली गेली.
आधुनिकीकरणाचा टप्पा
सध्या भारतीय लष्कराचे तीन एव्हिएशन ब्रिगेड्स आहेत — मिसामारी (पूर्व कमांड), लेह (उत्तर कमांड), आणि जोधपूर (पश्चिम कमांड).
अपाचे हे लष्करासाठीचे दुसरे समर्पित अटॅक हेलिकॉप्टर असेल, याआधी स्वदेशी बनावटीच्या ‘(LCH)- Prachand‘ हेलिकॉप्टर्स लष्कराता सामाविष्ट झाली आहेत. ही लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर्स, उंच पर्वतीय रांगांमधील युद्धासाठी अत्यंत उपयुक्त आहेच, विशेषतः लडाखसारख्या भागात. तर अपाचे हेलिकॉप्टर्स वाळवंटी आणि मैदानी क्षेत्रांतील उच्च तीव्रतेच्या कारवायांसाठी अधिक उपयुक्त आहे.
“अपाचे आणि प्रचंड हे दोन्ही एकमेकांना पूरक असून, भारताच्या विविध युद्ध क्षेत्रांसाठी संतुलित क्षमतेचे प्रतिनिधित्व करतात,” असे संरक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सध्या प्रतिक्षा असलेल्या 3 अपाचे हेलिकॉप्टर्स व्यतिरिक्त, अजून 11 हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याबाबत चर्चा सुरू असून, ही प्रक्रिया एकूण 39 हेलिकॉप्टर्सच्या आवश्यकतेअंतर्गत आहे.
दरम्यान, संरक्षण संपादन परिषदेने (DAC), लष्कर आणि हवाई दलासाठी आणखी ‘156 प्रचंड हेलिकॉप्टर्स’ खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे, सध्या 15 युनिट्स मर्यादित उत्पादनात आहेत.
लष्कराच्या एव्हिएशन कोर्प्सकडे 75 ‘रुद्र’ हेलिकॉप्टर्स देखील आहेत, हे HAL च्या ALH (Advanced Light Helicopter) चे सशस्त्र प्रकार असून पाळत ठेवणे व मदतकार्यासाठी वापरले जातात.
बदलत्या रणांगणात सामरिक धार
जोधपूरमध्ये अपाचे हेलिकॉप्टर्सची तैनाती ही पाकिस्तानला थेट संकेत देणारी रणनीती आहे. या हेलिकॉप्टर्समध्ये शत्रूच्या बख्तरबंद तुकड्यांना निष्प्रभ करण्याची क्षमता असून, ती संघर्ष वाढल्यास जलद प्रतिसाद देण्याची तयारी दाखवते.
अपाचे हेलिकॉप्टर्सचा समावेश म्हणजे केवळ एक नवे शस्त्र नसून, लष्कराच्या भविष्यकालीन युद्ध धोरणातील बदलाचे प्रतीक आहे, जे धोरण अधिक वेगवान, अचूक आणि आधुनिक युद्धशैलीकडे वाटचाल करते आहे.
टीम भारतशक्ती