इराणने शुक्रवारी जाहीर केले की, ‘इस्रायलकडून तेहरानवर झालेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या लष्करी हल्ल्यानंतर, अमेरिकेसोबतच्या अणुचर्चा आता “निरर्थक” ठरतात.’ तसेच, त्यांनी वॉशिंग्टनवर या हल्ल्याला पाठिंबा दिल्याचा आरोपही केला आहे.
शनिवारी सकाळी, Iran आणि Israel यांच्यात हवाई हल्ल्यांची देवाण-घेवाण झाली. इस्रायलने आपल्या जुन्या प्रतिस्पर्ध्यावर सर्वात मोठा लष्करी हल्ला केला होता, ज्यामागचा उद्देश होता, इराणला अण्वस्त्र निर्माण करण्यापासून रोखणे.
दिवसभर चाललेल्या इस्रायली हल्ल्यांनंतर, इराणकडून दिल्या गेलेल्या प्रत्युत्तरामुळे, संपूर्ण प्रदेशात मोठ्या संघर्षाची भीती निर्माण झाली. गाझामधील हमास आणि लेबनॉनमधील हिझ्बुल्ला यांना इस्रायलने मोठ्या प्रमाणावर कमजोर केले असले तरी, हल्ल्यांची तीव्रता पाहता भीतीचे वातावरण तयार झाले.
“समोरचा पक्ष (अमेरिका) अशा पद्धतीने वागत आहे की, अणुविषयक संवादाला काही अर्थ उरत नाही. तुम्ही एकीकडे वाटाघाटी करण्याचा दावा करू शकत नाही आणि दुसरीकडे झायनिस्ट शासनाला (इस्रायल) इराणच्या भूमीवर हल्ले करण्याची मुभाही देऊ शकत नाही,” अशी भावना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघाई यांनी, निम्न-सरकारी तस्नीम वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली.
इराणची वॉशिंग्टनच्या भूमिकेवर टीका
बाघाई यांनी सांगितले की, “इस्रायलने मुत्सद्देगिरीच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यात यश मिळवले असून अमेरिकेच्या परवानगीशिवाय हा हल्ला झालाच नसता.”
तर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, “इस्रायली हल्ले होणार हे त्यांना आधीच माहित होते, तरीही ते मानतात की अणुकार्यक्रमावर करार करण्याची संधी अजूनही आहे.”
इराणने यापूर्वीही, इस्रायलच्या हल्ल्यांत अमेरिका सहभागी असल्याचा आरोप केला होता. मात्र, वॉशिंग्टनने हे आरोप फेटाळले होते आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अधिवेशनात, तेहरानला अणुकार्यक्रमावर वाटाघाटी करणे “शहाणपणाचे” ठरेल, असे सांगितले.
अमेरिका आणि इराण यांच्यातील सहाव्या फेरीच्या अणुचर्चा रविवारी मस्कतमध्ये होणार होत्या, परंतु इस्रायली हल्ल्यांनंतर त्या होणार की नाही, हे स्पष्ट नव्हते.
इराणने इस्रायलचे अण्वस्त्रनिर्मितीचे आरोप फेटाळले असून, त्यांचा युरेनियम समृद्धीकरण कार्यक्रम फक्त नागरी हेतूसाठी असल्याचा दावा केला आहे.
इराणच्या आण्विक आणि लष्करी लक्ष्यांवर, इस्रायलने केलेल्या अभूतपूर्व लष्करी हल्ल्यांनंतर उभय देशांमधील तणावाचे आता उघडपणे संघर्षात रूपांतर झाले आहे. त्यामुळे भारताने तीव्र चिंता व्यक्त करत, तणाव त्वरित कमी करण्याचे आवाहन केले आहे.
‘टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)