आसामच्या तेजपूर येथील बॉब खटिंग संग्रहालयाच्या ई-उद्घाटन समारंभात बोलताना सिंह म्हणाले, “हे प्रकरण सैन्य माघारीच्या पलीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न असेल; पण त्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागेल.”
संरक्षणमंत्र्यांनी आसाममधील तेजपूर येथील 4 कॉर्प्स मुख्यालयातून दूरस्थपणे (remotely) या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. मूलतः बॉब खटिंग शौर्य संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी ते तवांगला भेट देणार होते, मात्र प्रतिकूल हवामानामुळे ते तवांगला जाऊ शकले नाहीत.
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) डेपसांग आणि डेमचोक सेक्टरमधील समन्वित गस्त पुढील आठवड्यात सुरू होईल, असे वृत्त भारतशक्तीने दिले होते. डेपसांगमधील दोन्ही बाजूंच्या तात्पुरत्या बांधकामांचे साहित्य गोळा करणे आणि तोडफोड करून बांधकाम नष्ट करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर भारतीय गस्त पथक कोणत्याही वेळी पेट्रोल पॉईंट 10 ते 13 पर्यंत पोहोचू शकते. मात्र प्रतिकूल हवामानामुळे डेमचोकमधील प्रक्रियेला जास्त वेळ लागला आहे. हा विलंब आणखी काही दिवस असेल. एकदा ही संपूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर, दोन्ही देशांकडून याची संयुक्त पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर 2020 पूर्वीची एकमेकांच्या गस्त घालण्याची आणि स्थानिक मेंढपाळांसाठी चराईच्या भागात प्रवेश करण्याची प्रथा पुन्हा सुरू होईल.
पुढील टप्पा, ज्यामध्ये समन्वित गस्त सुरू करणे समाविष्ट आहे, 3 नोव्हेंबरपूर्वी सुरू होणार नाही. भारत आणि चीन यांच्यात झालेल्या करारानुसार, या समन्वित गस्तीमध्ये गस्तीची तारीख, वेळ आणि आकार याबद्दल समोरच्या पक्षाला आगाऊ माहिती प्रदान करणे समाविष्ट असेल. डेपसांगजवळील पेट्रोलिंग पॉईंट 10 ते 13 पर्यंत गस्तीचा अधिकार पुनर्संचयित करण्याची भारताची मुख्य मागणी तसेच डेमचोक जवळील सीएनएन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण, वाय जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राच्या पलीकडे, 21 ऑक्टोबर रोजी झालेल्या करारानुसार पूर्ण करण्यात आले आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पंतप्रधान मोदी ब्रिक्स परिषदेसाठी रशियातील कझान येथे रवाना होण्याच्या पूर्वसंध्येला या सैन्य माघारीच्या कराराची घोषणा केली. त्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांची राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक झाली.