लांब किनारा, उच्च धोका: अंमली पदार्थविरोधी लढ्यात गुजरात ठरतंय संघर्षबिंदू

0
गुजरात

भारताच्या अंमली पदार्थविरोधी लढ्यात एक महत्त्वाची कामगिरी बजावत, भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात अँटी-टेररिझम स्क्वॉड (ATS) यांच्या संयुक्त कारवाईत, 12 आणि 13 एप्रिल रोजी रात्री उशिरा, एका धोकादायक ऑपरेशन पार पडले, ज्यामध्ये सुमारे 300 किलो उच्च दर्जाच्या मेथअ‍ॅम्फेटामीन ड्रग जप्त करण्यात आले. या अंमली पदार्थांची अंदाजे किंमत सुमारे ₹1,800 कोटी इतकी आहे.

गुजरात ATS कडून मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र–दक्षिण गुजरात किनारपट्टीजवळ बहुउद्देशीय गस्तीसाठी तैनात असलेल्या तटरक्षक दलाच्या जहाजाला तातडीने दिशानिर्देश देण्यात आला. आंतरराष्ट्रीय सागरी सीमेच्या (IMBL) जवळ समुद्रात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका संशयित बोटीला अडवणे, हा त्यामागील उद्देश होता.

भारतीय जहाज जवळ येत असल्याचे लक्षात येताच, त्या बोटीतून अवैध ड्रग्ज समुद्रात फेकण्यात आले आणि ती बोट आंतरराष्ट्रीय जलसीमेच्या दिशेने पळून गेली.

तटरक्षक दलाने तात्काळ बोटीचा पाठलाग सुरू केला, पण ती बोट आंतरराष्ट्रीय जलसीमारेषा (IMBL) पार करून भारतीय अधिकारक्षेत्राबाहेर गेली. मात्र त्यानंतर, तटरक्षक दलाने ICG जलद गतीची एक सागरी बोट पाठवून रात्रीच्या अंधारात अत्यंत सूक्ष्म शोधमोहीम राबवली आणि समुद्रात फेकलेले ड्रग्ज यशस्वीरित्या जप्त केले. संरक्षण मंत्रालयानुसार, जप्त केलेले ड्रग्ज आता पुढील तपासासाठी पोरबंदरला आणण्यात आली आहे.

ही कारवाई तटरक्षक दल व गुजरात ATS यांच्यातील अलीकडच्या काळातील 13वी यशस्वी संयुक्त मोहीम आहे. ही घटना एक गंभीर वास्तव अधोरेखित करते, ज्यामुळे गुजरातची विशाल किनारपट्टी भारतात अंमली पदार्थांच्या प्रवेशासाठी मुख्य बिंदू बनत आहे.

गुजरातची लांब किनारपट्टी: भारताच्या अंमली पदार्थविरोधी लढ्याचा नवा संघर्षबिंदू

गुजरातची 1,640 किलोमीटर लांब किनारपट्टी, सर्व भारतीय राज्यांमध्ये – सर्वात लांब – सागरी सुरक्षा संस्थांसाठी एक कायमस्वरुपी आणि गुंतागुंतीचे आव्हान म्हणून उदयास आली आहे. विशेषतः कच्छ प्रदेशातल्या अतिदुर्गम खाड्या, ज्वारीमार्ग आणि गजबजलेल्या मच्छीमार बंदरांनी युक्त भौगोलिक रचनेमुळे, ही किनारपट्टी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांसाठी आदर्श मार्ग बनली आहे.

केवळ किनारपट्टीचे मूळ भौगोलिक क्षेत्र नव्हे तर- अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तानचा समावेश असलेल्या जगातील सर्वात कुप्रसिद्ध ड्रग्ज उत्पादक क्षेत्रांपैकी एक ‘गोल्डन क्रेसेंट’शी गुजरातची असलेली भौगोलिक जवळीकता, तिला जागतिक अंमली पदार्थ व्यापाराच्या केंद्रस्थानी  ठेवते. या भौगोलिक आणि भू-राजकीय संगमामुळे गुजरात किनारपट्टी भारताच्या ड्रगविरोधी लढ्यात एक अतिशय संवेदनशील रणभूमी ठरली आहे.

अलीकडच्या काळात झालेल्या अनेक हाय-प्रोफाईल कारवाया या तस्करी नेटवर्क्सची व्याप्ती, कुशलतेची पातळी आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा उलगडा करतात. फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या समुद्रातील ड्रग जप्तीमध्ये, 3,300 किलो अंमली पदार्थ गुजरातच्या किनाऱ्याजवळ एका इराणी मच्छीमार बोटीवरून हस्तगत करण्यात आले. ₹20,000 कोटींपेक्षा जास्त बाजारमूल्य असलेल्या या जप्तीने, केवळ तस्करीच्या प्रमाणावर प्रकाश टाकला नाही, तर अरबी समुद्रातून प्रचंड प्रमाणात मालवाहतूक करण्यासाठी परदेशी मच्छीमारांकडून होणाऱ्या बोटींच्या वाढत्या वापरालाही अधोरेखित केले.

या ऐतिहासिक जप्तीनंतर लगेचच नोव्हेंबर 2023 मध्ये, आणखी एका इराणी बोटीवरून 700 किलो मेथअ‍ॅम्फेटामीन पकडण्यात आले. या बोटीवर सीलबंद प्लास्टिक कंटेनरमध्ये पॅक केलेले ड्रग्स होते, जे समुद्रातच एका बोटीतून दुसऱ्यात हस्तांतरित करण्यात आले होते, ज्यातून तस्करीचे एक अत्याधुनिक आणि समन्वयित नेटवर्क दिसून येते. या मालाची किंमत ₹4,000 कोटींपेक्षा जास्त होती, आणि प्राथमिक तपासातून असे दिसून आले की, याचा उगम पाकिस्तान किंवा इराण येथे झाला होता आणि भारत हे त्याचे लक्ष्य होते.

एप्रिल 2024 मध्ये, पोरबंदरजवळ एका भारतीय मच्छीमार बोटीवरून 173 किलो हॅशिश जप्त करण्यात आले. यावेळी बोट भारतीय असली तरी ती पाकिस्तानस्थित टोळीच्या आदेशावर कार्यरत असल्याचे उघड झाले. यामधून तस्करीच्या पद्धतीत झालेला चिंताजनक बदल दिसून आला, आता तस्कर परदेशी नव्हे तर भारतीय नागरिक व बोटींचा वापर करत होते, जेणेकरून संशय कमी आणि सागरी गस्त यंत्रणांची दिशाभूल करता येईल.

या सर्व घटनांमागचा प्राथमिक इशारा, सप्टेंबर 2021 मध्ये, मुंद्रा बंदरावर झालेल्या 2,988 किलो हेरॉईनच्या ऐतिहासिक जप्तीने दिला होता. अफगाणिस्तानमधून ‘टॅल्कम पावडर’च्या नावाखाली पाठवलेली ही हेरॉईन इराणमार्गे भारतात आणली गेली होती, आणि बंदरावरील व्यावसायिक कंटेनर्समध्ये लपवून ठेवण्यात आली होती. ₹21,000 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या या जप्तीने भारतातील पोर्ट सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आणल्या आणि नंतर धोरणात्मक बदल व सुरक्षा यंत्रणांमध्ये वाढ करण्यात आली.

या सतत घडणाऱ्या घटनांमधून एक स्पष्ट चित्र समोर येते की: गुजरात केवळ एक मार्ग नसून, भारताच्या अंमली पदार्थविरोधी लढ्यातील अग्ररेषेवर आहे. येथील बंदरे, किनारे आणि खुली समुद्रसीमा या जागतिक तस्करी टोळ्यांसाठी चाचणीचे मैदान बनल्या आहेत. ड्रग्सचे प्रकार बदलत आहेत — मेथ, हेरॉईन, हॅशिश; माध्यमे बदलत आहेत — इराणी ट्रॉलरपासून भारतीय बोटीपर्यंत पण धोका मात्र कायम आहे आणि अधिक खोलवर रुजलेला आहे.

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की भारतीय तटरक्षक दल, गुजरात ATS आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांनी आपली नजर व गस्त वाढवली असली, तरी तस्कर नेहमी नव्या मार्गांनी पळवाटा शोधत आहेत, सीमा व्यवस्थेतील त्रुटी वापरत आहेत आणि अधिकाधिक गुंतागुंतीच्या पद्धती वापरत आहेत.

भारत आता सागरी दक्षता (maritime domain awareness) वाढवत आहे — ज्यामध्ये ड्रोन, उपग्रह ट्रॅकिंग, आणि एजन्सीमधील समन्वय या सर्वांवर भर दिला जात आहे. आणि यासाठी गुजरातमधून मिळणारा संदेश स्पष्ट आहे: जर अशी किनारपट्टी दुर्लक्षित राहिली, तर ती केवळ तस्करीसाठी मार्ग ठरणार नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेसाठीही गंभीर धोका बनू शकते.

– Ravi Shankar


Spread the love
Previous articleIranian Foreign Minister To Consult Russia On Iran-U.S. Talks
Next articleव्हिएतनामसोबत व्यापारी संबंध मजबूत करण्याचे शी जिनपिंग यांचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here