“भारताची सुरक्षा कमकुवत होईल असे काहीही मालदीव करणार नाही. आम्ही विविध क्षेत्रांमध्ये इतर देशांशी सहकार्य वाढवत असताना, आमच्याकडून घडणाऱ्या कृती या प्रदेशाच्या सुरक्षा आणि स्थिरतेशी तडजोड करणार नाहीत याची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,” असे आपल्या पहिल्याच द्विपक्षीय भारत दौऱ्यावर आलेल्या मालदीवच्या राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी एका मुलाखतीत सांगितले.
भारत आणि मालदीव यांनी भूतकाळात ताणले गेलेले संबंध दृढपणे मागे टाकल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.
मुइझ्झू आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांनी “सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारी” दृष्टीकोन स्वीकारला असून यामध्ये विकास सहकार्य, व्यापार आणि आर्थिक भागीदारी, डिजिटल आणि वित्तीय उपक्रम, ऊर्जा प्रकल्प आणि बरेच काही समाविष्ट असेल.
भारत आणि मालदीवचे संबंध अनेक शतकांपासून चालत आले आहेत, असे मोदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भारत हा मालदीवचा सर्वात जवळचा शेजारी आणि जवळचा मित्र आहे. आपल्या शेजारील देशांसोबत असणाऱ्या धोरणात आणि ‘सागर’ या घेतलेल्या पुढाकारात मालदीवचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. भारताने नेहमीच मालदीवसाठी प्रथम प्रतिसादकर्त्याची भूमिका बजावली आहे,” असे ते 2004 च्या हिंद महासागरातील त्सुनामी आणि कोविडसह अलीकडील संकटांदरम्यान भारताच्या भूमिकेची आठवण करून देत म्हणाले.
मुक्त व्यापार क्षेत्रासाठी वाटाघाटी सुरू करण्यास दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. मालदीवच्या 90 टक्क्यांहून अधिक निर्यातीमध्ये भारतात शुल्कमुक्त प्रवेश असलेल्या मत्स्य उत्पादनांचा समावेश आहे. खरेतर मालदीवमध्ये अधिक भारतीय गुंतवणूक आकर्षित करण्याचा हेतू यामागे असू शकतो.
40 कोटी डॉलरच्या चलन अदलाबदलासह दोन्ही देशांमध्ये पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारताने यापूर्वी 5 कोटी डॉलरच्या कोषागार बिलाची सदस्यता घेतली होती, ज्यामुळे परकीय चलन तूट भरून निघण्यास मदत होईल. दोन्ही नेत्यांनी विमानतळाच्या रनवेचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले. याशिवाय हुलहुमले या कृत्रिम बेटावरील 700 घरांचे हस्तांतरण केले, ज्याचा उद्देश माले प्रदेशाच्या भविष्यातील औद्योगिक आणि व्यावसायिक गरजा पूर्ण करणे हा आहे.
भारतीय पर्यटकांनी परत मालदीवला यावे अशी त्या देशाची इच्छा आहे, “भारत ही मालदीवसाठी पर्यटनाचा सर्वात मोठा स्रोत आहे,” असे मुइझ्झू म्हणाले, “आम्ही अधिक भारतीय पर्यटकांचे स्वागत करू अशी मला आशा आहे.”
गेल्या वर्षी मुइझ्झू यांची भारतविरोधी नारा देत राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. स्थानिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तसेच तिथे असणाऱ्या हेलिकॉप्टर आणि डॉर्नियर विमानाची देखभाल करण्यासाठी तैनात असणाऱ्या 90 जणांचे पथकही भारताने माघारी बोलावले.
ऐश्वर्या पारीख