केरळच्या किनाऱ्यावर लिबेरियन-ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्यामुळे झालेल्या प्रंडच तेल गळतीनंतर, सागरी प्रदूषण नियंत्रणासाठीची मोहीम वेगाने सुरू करण्यात आली आहे.
रविवारी पहाटे, अरबी समुद्रात लिबेरियन-ध्वजधारी मालवाहू जहाज MV MSC ELSA 3 बुडाल्यानंतर, केरळच्या किनाऱ्याजवळ मोठ्या समुद्री प्रदूषण प्रतिसाद मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. हे जहाज धोकादायक वस्तू आणि इंधन वाहून नेत असताना, अलप्पुझाच्या सुमारे 15 नॉटिकल मैल दक्षिण-पश्चिमेला बुडाले. भारतीय तटरक्षक दलाने (ICG) तात्काळ कारवाई सुरू केली.
या जहाजावर रशिया, युक्रेन, जॉर्जिया आणि फिलीपिन्स येथील एकूण 24 कर्मचारी होते, त्यांचा भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या संयुक्त प्रयत्नांनी यशस्वी बचाव करण्यात आला. त्यातील 21 जणांना तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढण्यात आलं, तर उर्वरित 3 जणांना INS सुजाता या नौदलाच्या जहाजाने वाचवले.
विझिंजमहून कोचीकडे जाणाऱ्या या जहाजाने, शनिवारी आपल्या उजव्या बाजूला तीव्र झुकायला सुरुवात केली आणि अखेरीस ते 26 अंशापर्यंत झुकले. आपत्ती सिग्नल दिल्यानंतरही रविवारी सकाळी 7.50 वाजता जहाज पूर्णपणे बुडाले. प्राथमिक अंदाजानुसार, जहाजात पाणी शिरल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता आहे.
All 24 crew members ex Liberian-flagged container Vessel MSC ELSA 3 rescued safely, 21 by @IndiaCoastGuard & 03 by @indiannavy Ship Sujata after vessel sank off #Kochi this morning. Vessel was carrying 640 containers, including 13 containing hazardous cargo and 12 with calcium… pic.twitter.com/990qmogVJR
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) May 25, 2025
प्रदूषणाची भीती वाढतेय
अपघातग्रस्त जहाजावर 640 कंटेनर होते, त्यापैकी 13 कंटेरनमध्ये धोकादायक रसायने आणि 12 मध्ये कॅल्शियम कार्बाइड होते. शिवाय, 84 मेट्रिक टन डिझेल आणि 367 मेट्रिक टन फर्नेस ऑईल साठवलेले होते.
या धोकादायक रसायनांमुळे आणि पेट्रोलियम उत्पादनांमुळे समुद्री परिसंस्थेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
जहाज बुडाल्यानंतर काही तासांतच, तटरक्षक दलाच्या डॉर्नियर विमानाने हवाई पाहणी केली, ज्यात तेलाचा महाप्रचंड थर पूर्व-दक्षिणेकडे 2 नॉट्स वेगाने वाहताना आढळला. तटरक्षक दलाने तत्काळ प्रदूषण नियंत्रण यंत्रणा सक्रिय केली. ICG शिप सक्षम, जी अशा प्रकारच्या मोहिमेसाठी सज्ज आहे, तैनात करण्यात आली. त्याचबरोबर अनेक हवाई पाहण्या सुरू करण्यात आल्या.
संकट नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न
मोठ्या लाटा आणि वाऱ्यामुळे अडथळे येत असले तरीही प्रयत्न सुरू आहेत. पाण्यावर तरंगणारे काही कंटेनर फुटलेले आहेत आणि त्यातून गळती सुरू आहे, त्यामुळे नेव्हिगेशनसाठी धोका निर्माण झाला आहे. या भागातून जाणाऱ्या जहाजांना वळसा घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दोन मोठी तटरक्षक जहाजे, (OPV) सततच्या निरीक्षणासाठी तैनात करण्यात आली आहेत. तसेच, प्रदूषण प्रतिसाद जहाज समुद्री तेल गळती थांबवण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या प्रमाणात OSD (Oil Spill Dispersant) घेऊन रवाना झाले आहे.
कायदेशीर कारवाई आणि साफसफाई सुरू
कोचीतील मर्कंटाईल मरीन विभागाने, जहाजमालक MSC कंपनीविरुद्ध प्रदूषण जबाबदारीचा इशारा दिला आहे. त्यांनी T&T Salvage या कंपनीची नियुक्ती केली आहे, जी कंटेनर परत मिळवणे, तेल काढणे आणि पर्यावरण स्वच्छता यासाठी काम करेल.
अपघाताच्या नेमक्या कारणाचा शोध
याचा नेमका कारण अद्याप स्पष्ट झालेला नाही. प्रारंभिक अंदाजानुसार रचनेतील बिघाड किंवा तांत्रिक बिघाडामुळे पाणी शिरल्याने जहाज बुडालं असावं. पर्यावरणीय धोका नियंत्रणात आल्यावर संपूर्ण चौकशी होणार आहे.
पर्यावरण तज्ज्ञ आणि सागरी अधिकारी हे संपूर्ण घटनाक्रमावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, कोस्टल इकोसिस्टमला होणारा हानी कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
टीम भारतशक्ती