ऑपरेशन सिंदूरच्या तीन आठवड्यांनंतर, भारतीय लष्कराने आपल्या धोरणात्मक नियंत्रण कक्षातील काही प्रतिमा प्रसिद्ध केल्या, ज्यामध्ये लष्करी अधिकारी ऑपरेशन सिंदूरचा लाईव्ह थरार एकत्र मॉनेटर करताना दिसत आहेत. या छायाचित्रांमधून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (PoJK) मधील, दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या अभूतपूर्व कारवाईतील निर्णयप्रक्रिया आणि थेट देखरेखीचा एक दुर्मिळ मागोवा पाहायला मिळतो आहे.
या प्रतिमा ‘बातचीत’ या लष्कराच्या अंतर्गत बुलेटिनमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या असून, त्यामध्ये भारतीय लष्कराचे वरिष्ठ नेतृत्व, पाकिस्तान्चाय नऊ हाय-प्रोफाईल दहशतवादी तळांचा विनाश थेट पाहत असल्याचे दिसत आहे.
या प्रतिमा 7 मे रोजी, पहाटे 1:05 वाजता घेतल्या गेल्या आहेत, ही तीच वेळ आहे जेव्हा पहिल्या एअर स्ट्राईक मोहिमेला सुरुवात झाली. नियंत्रण कक्षामध्ये थेट निरीक्षणासाठी तिन्ही सैन्यदलांच्या विविध फीड्स सातत्याने येत होत्या, ज्यामुळे प्रत्येक टप्प्याचे थेट मॉनिटरिंग करणे शक्य झाले.
या ऑपरेशनदरम्यान, नियंत्रण कक्षात उपस्थित असलेल्या तिन्ही दलांच्या उच्च अधिकाऱ्यांमध्ये: लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी, वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग, मुख्य संरक्षण अधिकारी जनरल अनिल चौहान, उपलष्करप्रमुख ले. जनरल एन.एस. राजा सुब्रमणी, लष्करी कारवाई संचालनालयाचे प्रमुख ले. जनरल राजीव घई, आदींचा समावेश होता.
संरक्षण दलाच्या सूत्रांनुसार, नियंत्रण कक्ष हे, SCALP या फ्रेंच निर्मित प्रिसिजन मिसाईल्सच्या थेट व्हिज्युअल फीड्स घेण्यास सक्षम होते. या मिसाईल्सद्वारे हल्ला करताना, त्यांचे थेट दृश्य, संबंधित विमानाला प्रसारित केले जात होते.
भारतीय वायुदलाने याच SCALP मिसाईल्सद्वारे शत्रूची दोन टार्गेट्स निष्प्रभ केली, तर लष्कराने ड्रोन्स आणि लोटरिंग म्युनिशन्स वापरून इतर सात ठिकाणी लक्ष्यभेद केला.
टार्गेटेड तळ
हल्ल्याच्या प्रमुख तळांमध्ये: PoJK मधील सवाई नाला, सय्यदना बिलाल, कोटली अब्बास, भिंबर आणि पाकिस्तानमधील सीमापार तळ: सरजाल, मेहमूमा, जोया यांचा समावेश होता. ही सर्व तळ लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) यांचे प्रशिक्षण केंद्र आणि लॉन्चपॅड्स होते, जे घुसखोरीसाठी वापरले जात होते.
ऑपरेशन सिंदूरची पार्श्वभूमी
ऑपरेशन सिंदूर हे, 22 एप्रिल रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगामच्या बैसरान व्हॅलीमध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून राबवण्यात आले. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म ओळखून त्यांच्यावर गोळीबार केला आणि 26 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. पहलगाममधील नरसंहारामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाम शब्दांत इशारा दिला की: “आता दहशतवादाच्या किल्ला पडलाच पाहिजे.”
ऑपरेशन सिंदूरच्या नियोजन आणि अंमलबजावणी दरम्यान, लष्कराच्या Western, South Western आणि Southern Commands मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारतीय वायुदलाच्या युनिट्ससोबत घनिष्ठ समन्वय साधला.
यामुळे सर्व लक्ष्यांवर एकाच वेळी अचूक आणि समन्वित हल्ले शक्य झाले, जे ऑपरेशनच्या यशाचं मुख्य कारण ठरलं.
ऑपरेशन दरम्यान पाकिस्तानकडून ड्रोन घुसखोरीचा प्रयत्न झाला. मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी ही कारवाई त्वरित आणि प्रभावीपणे निष्फळ ठरवली. हे शक्य झाले ते, L-70 आणि ZU-23 तोफा, OSA-AK वाहने, Akash आणि MRSAM (Medium Range Surface-to-Air Missile) सारखी क्षेपणास्त्र प्रणाली, यासारख्या सक्षम यंत्रणांमुळे. या संरक्षण व्यवस्थेने शत्रूचे सुमारे 300 ड्रोन (UAVs) यशस्वीरित्या पाडले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या लोगोमागील अधिकारी
भारतीय लष्कराने उघड केले आहे की, ऑपरेशन सिंदूरचा लोगो तयार करण्यामागे, लेफ्टनंट कर्नल हरीश गुप्ता आणि हवलदार सुरिंदर सिंग, या दोन वीर अधिकाऱ्यांची कल्पनाशक्ती होती.
पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना एक प्रतिकात्मक श्रद्धांजली म्हणून, हा लोगो अत्यंत विचारपूर्वकरित्या डिझाईन करण्यात आला. हा लोगो फक्त एक चिन्ह नसून राष्ट्रीय एकात्मता, साहस आणि निर्धाराचा द्योतक बनला आहे.
लष्कराच्या अंतर्गत बातमीपत्रात पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे की: The Resistance Front (TRF), Kashmir Tigers आणि People’s Anti-Fascist Front (PAFF), हे सर्व गट लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) यांचे छुपे अंग (proxy wings) आहेत. हे गट पाकिस्तानच्या असममित युद्धनीतीचा भाग असून, भारतात अराजकता आणि हिंसाचार पसरवण्यासाठी वापरण्यात येतात.
ऑपरेशन सिंदूरबाबात प्रकाशित केलेल्या नव्या प्रतिमा आणि तपशीलांमुळे, ऑपरेशन सिंदूर केवळ एक यशस्वी लष्करी कारवाई न राहता भारताच्या सशस्त्र दलांच्या एकतेचे, अचूकतेचे आणि प्रभावी प्रतिबंधाचे प्रतीक बनले आहे.
टीम भारतशक्ती