
भारताच्या संरक्षण क्षेत्रातील वाढती आत्मनिर्भरता अधोरेखित करत, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाला, ‘मेक इन इंडिया’ उपक्रमातील एक ऐतिहासिक क्षण म्हणून संबोधले.
CII वार्षिक बिझनेस समिट 2025 मध्ये बोलताना, सिंह यांनी म्हणाले की, “देशात विकसित करण्यात आलेल्या लष्करी प्रणालींमुळे सीमापारच्या धोक्यांचा सामना प्रभावीपणे करता आला.”
“आम्ही शत्रूच्या दहशतवादी तळ आणि महत्त्वाच्या लष्करी संरचना नष्ट केल्या, पण याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, आम्ही एक संदेश दिला की, भारत आता स्वतःच्या संरक्षणासाठी इतरांवर अवलंबून नाही,” असे सिंग यावेळी म्हणाले.
या मोहिमेत, भारतीय तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर संरक्षण आणि मानवरहित प्रणाली यांचा प्रभावी वापर करण्यात आला. हे दर्शवते की, भारताचे संरक्षण क्षेत्र युद्धसिद्ध, भविष्याभिमुख आणि धोरणात्मकदृष्ट्या स्वायत्त आहे.
AMCA: भारताचा पाचव्या पिढीचा लढाऊ विमान प्रकल्पाला बळकटी
राजनाथ सिंह यांनी, यावेळी Advanced Medium Combat Aircraft (AMCA) प्रकल्पाचे ‘एक्झिक्युशन मॉडेल’ सादर केला. या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमान प्रकल्पात आता खाजगी कंपन्यांनाही सामाविष्ट करुन घेण्यात येणार आहे.
“पाच स्वदेशी प्रोटोटाईप्स विकसित करून मग मालिका उत्पादन सुरू करणे, हा एक धाडसी आणि दूरदृष्टीचा निर्णय आहे. यामुळे भारत जागतिक एरोस्पेस महासत्तांमध्ये सामील होईल,” असे सिंह यांनी सांगितले.
‘भारतशक्ती’ या संस्थेच्या अहवालानुसार, AMCA प्रकल्प केवळ लष्करीच नव्हे तर, आर्थिकदृष्ट्याही मोठा बळवणारा घटक आहे. MSMEs, स्टार्टअप्स आणि संरक्षण उत्पादक कंपन्यांना यामधून मोठ्या संधी मिळतील.
PoJK: वादाचा नव्हे, वेळेचा मुद्दा
सिंह यांनी, आपल्या भाषणात पुन्हा एकदा PoJK (पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर) भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ठामपणे सांगितले.
“PoJK मधील लोकांचा भारताशी भावनिक संबंध आहे. ते स्वेच्छेने राष्ट्रीय प्रवाहात सामील होतील, हे अटळ आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“यापुढे पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा केवळ आतंकवाद आणि PoJK या दोन मुद्द्यांपुरती मर्यादित असेल,” असेही त्यांनी ठामपणे जाहीर केले.
ऐतिहासिक संरक्षण निर्यात
भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात ऐतिहासिक वाढ झाली आहे. सिंह यांनी जाहीर केले की, वार्षिक उत्पादन ₹1.4 लाख डॉलर्स कोटींवर पोहोचले असून, त्यात खाजगी क्षेत्राचा वाटा ₹32,000 कोटी डॉलर्स आहे. संरक्षण निर्यात ₹24,000 कोटींवर पोहोचली आहे, जी दहा वर्षांपूर्वीच्या ₹600-700 कोटींच्या तुलनेत प्रचंड वाढ आहे.
“भारत आता फक्त संरक्षण तंत्रज्ञानाचा ग्राहक राहिलेला नाही. आपण आता जागतिक बाजारात एक गंभीर खेळाडू आहोत,” असे सिंह यांनी सांगितले. फायटर जेट्स, क्षेपणास्त्रे, पार्ट्स आणि सेवा – भारतीय संरक्षण उत्पादने आता 100 पेक्षा अधिक देशांमध्ये जात आहेत.
नवयुगातील युद्ध तंत्रज्ञान
राजनाथ सिंह यांनी सांगितले की, “भारत आता AI-आधारित प्रणाली, सायबर सुरक्षा, मानवरहित प्लॅटफॉर्म आणि अवकाश-आधारित तंत्रज्ञान विकसित करण्यात अग्रेसर आहे.”
“भारत केवळ उत्पादन केंद्र नव्हे, तर संरक्षण संशोधन व विकासातही जागतिक नेतेपद मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सिंह यांनी 16,000 MSMEs च्या योगदानाची प्रशंसा केली, जे संरक्षण पुरवठा साखळीचा कणा आहेत. “या उद्योगांनी फक्त आत्मनिर्भरता नव्हे तर रोजगारनिर्मिती आणि नवोन्मेषही साधला आहे,” ते म्हणाले.
व्हिजन 2047: आत्मनिर्भर भारताचे स्वप्न
राजनाथ सिंह यांनी, 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने सरकार आणि उद्योग यांच्यातील सखोल सहकार्याचे आवाहन केले.
“राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक प्रगती हातात हात घालून चालतात. जर कंपन्यांचे हित जपणे तुमचे कर्म असेल, तर राष्ट्रीय हित जपणं तुमचं धर्म असायला हवे,” असे ते उद्योजकांना उद्देशून म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “Building Trust – India First” ही या समिटची मध्यवर्ती संकल्पना आहे, आणि आजच्या बदलत्या जागतिक परिप्रेक्ष्यात, विश्वास ही भारताची खरी संपत्ती आहे. ती ताकद, स्थिरता आणि आत्मनिर्भरतेच्या जोरावर मिळवलेली आहे.”
या समिटसाठी, प्रमुख मान्यवर म्हणून: नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी, वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, DRDO चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत, लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणि, CII अध्यक्ष संजीव पुरी आणि अनेक उद्योग क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.
टीम भारतशक्ती