सोमवारी रात्री उशीरा, Pakistan च्या कराचीत आलेल्या भूकंपांनंतर, निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेत, 200 हून अधिक कैद्यांनी तुरुंगातून पळ काढल्याची, माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी दिली आहे.
मालिर जिल्ह्यातील तुरुंगातील कैद्यांना, भूकंपाच्या धक्क्यांनंतर मध्यरात्री त्यांच्या कोठड्यांतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अचानक कैद्यांनी पोलीस व तुरुंग रक्षकांवर हल्ला करून, त्यांचे शस्त्र हिसकावून घेत मुख्य दरवाजा उघडून पलायन केले, अशी माहिती सिंध प्रांताचे कायदा मंत्री झिया-उल-हसन लांजार यांनी दिली.
जखमींची नोंद
प्रांतीय पोलिस प्रमुख गुलाम नबी मेमन यांनी सांगितले की, “या चकमकीत एका कैद्याचा मृत्यू झाला असून, तीन तुरुंग रक्षक जखमी झाले. अर्धसैनिक दलांच्या तुकड्या घटनास्थळी असतानाही कैद्यांनी पळ काढण्यात यश मिळवले.”
तुरुंगासमोरच्या एका निवासी संकुलात तैनात, खासगी सुरक्षा रक्षक बख्श यांनी Reuters ला सांगितले की, “मी काही वेळ गोळीबार ऐकत होतो, आणि मग काही वेळाने कैदी सर्व दिशांनी पळत बाहेर येताना दिसले.” काही कैद्यांनी संकुलातही प्रवेश केला, मात्र पोलिसांनी त्यांना लगेच पकडले.
मंगळवारी, Reuters च्या वार्ताहराने तुरुंग परिसरात तुटलेल्या काचा, खराब झालेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि उध्वस्त झालेली कुटुंबीयांसाठीची खोली पाहिली. अनेक कैद्यांचे चिंताग्रस्त कुटुंबीय तुरुंगाबाहेर एकत्र जमले होते.
सर्वात मोठ्या तुरुंग पलायनांपैकी एक
सिंधचे कायदामंत्री लांजार यांनी, ‘ही घटना पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या तुरुंग पलायनांपैकी एक असल्याचे’ नमूद केले. मालिर तुरुंगात सुमारे 6,000 कैदी आहेत.
स्थानिक टीव्हीच्या फुटेजनुसार, अनेक कैदी रात्रभर परिसरात पळत होते, ज्यापैकी काहीजण अनवाणी होते. प्रांतीय मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी सांगितले की, सुमारे 80 पळून गेलेले कैदी पुन्हा अटक करण्यात आले आहेत.
तुरुंग अधिक्षक अर्शद शाह यांनी सांगितले की, “तुरुंगात रात्री 28 रक्षक ड्युटीवर होते आणि इतक्या मोठ्या संख्येतील कैद्यांपैकी फक्त काहीच पळण्यात यशस्वी झाले.” तुरुंगात कोणतेही सुरक्षा कॅमेरे नसल्याचीही माहिती त्यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, “अनेक कैदी मादक पदार्थांच्या व्यसनाचे शिकार असून भूकंपाच्या धक्क्यांमुळे ते भयभीत झाले होते.”
“इथे भूकंपामुळे प्रचंड घबराट पसरली होती,” असे लांजार यांनी सांगितले.
कराचीचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी, तुरुंग प्रशासनाच्या निर्णयाची चूक मान्य करत, उर्वरित पळून गेलेल्या कैद्यांना स्वतःहून शरण जाण्याचे आवाहन केले, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
“लहानसहान गुन्ह्याचे आरोप आता आतंकवादासारख्या गंभीर प्रकरणात रूपांतरित होतील,” असा इशारा शाह यांनी दिला.
टीम स्ट्रॅटन्यूज
(Reuters च्या इनपुट्ससह)