‘पाकिस्तान आणि भारत, हे दोन्ही देश आपल्या सीमेवरील सैन्याची संख्या पुन्हा संघर्षपूर्व पातळीवर आणण्याच्या जवळ आहेत,’ असे, पाकिस्तानच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
भारत नियंत्रित काश्मीरमधील पहलगामध्ये, 22 एप्रिल रोजी झालेल्या एका भ्याड दहशतवादी हल्ल्यात, 26 पर्यटक मारले गेले. या हल्ल्यासाठी नवी दिल्लीने पाकिस्तान समर्थित “दहशतवाद्यांना” जबाबदार धरले, तर इस्लामाबादने हे आरोप फेटाळले.
पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून, भारताने 7 मे रोजी, सीमेपलीकडील “दहशतवादी तळांवर” क्षेपणास्त्रे डागली. पाकिस्ताननेही त्यांच्या बाजूने हल्ले केले आणि या तणावपूर्व पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी सीमारेषेवरील आपले सैन्य वाढवले.
पाकिस्तानचे संयुक्त लष्करी प्रमुख जनरल साहिर शमशाद मिर्झा, यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “आता दोन्ही देशांच्या सैन्यदलांनी सीमेवर सैन्यकपात सुरू केली आहे.” ते म्हणाले की, “आपण जवळपास 22 एप्रिलपूर्वीच्या स्थितीपर्यंत पोहोचलो आहोत.” मिर्झा, हे या संघर्षानंतर सार्वजनिकरित्या बोलणारे सर्वोच्च वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकारी आहेत.
भारताच्या संरक्षण मंत्रालयाने आणि भारतीय लष्करप्रमुखांच्या कार्यालयाने, मिर्झा यांच्या या वक्तव्यावर अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
सिंगापूरमध्ये ‘शांगरिला संवाद’ परिषदेसाठी आलेल्या मिर्झा यांनी सांगितले की, “या संघर्षात अण्वस्त्र वापरण्याचा कोणताही विचार नव्हता, तरीही परिस्थिती अत्यंत धोकादायक होती.”
“या वेळी तरी काही घडले नाही, पण तुम्ही कोणत्याही धोरणात्मक चुकीला नाकारू शकत नाही, कारण संकटाच्या वेळी प्रत्येकाची मनस्थिती वेगळी असते,” असे ते म्हणाले.
मिर्झा यांनी सांगितले की, “यावेळी लढाई फक्त वादग्रस्त काश्मीरपुरती मर्यादित नव्हती, तर दोन्ही देशांनी मुख्य भूमीतील लष्करी ठिकाणांवरही हल्ले केले, त्यामुळे भविष्यात संघर्ष वाढण्याचा धोका अधिक झाला आहे.”
या महिन्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला की, “भारतावर पुन्हा हल्ला झाला, तर भारत सीमेपलीकडील “दहशतवादी तळांवर” पुन्हा निशाणा साधेल.”
धोकादायक प्रवृत्ती
1947 मध्ये, ब्रिटिश भारताच्या विभाजनानंतर निर्माण झालेल्या भारत आणि पाकिस्तानने, आतापर्यंत आपापसांत तीन मोठी युद्धे केली असून, त्यापैकी दोन काश्मीर प्रश्नावरुन झाली होती. तसेच दोघांमध्ये अनेक लष्करी चकमकीही झाल्या आहेत.
भारताचा दावा आहे की, 1989 पासून सुरू झालेल्या काश्मीरमधील बंडखोरीला पाकिस्तान जबाबदार आहे, ज्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर पाकिस्तान म्हणतो की, तो केवळ नैतिक, राजकीय आणि मुत्सद्दी धोरणांना समर्थन देतो.
“नुकत्याच झालेल्या या संघर्षामुळे, दोन अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमधील संघर्षाची मर्यादा आणखी कमी झाली आहे… भविष्यात हे फक्त वादग्रस्त प्रदेशापुरते मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण भारत आणि संपूर्ण पाकिस्तानमध्ये हा संघर्ष पसरू शकतो,” मिर्झा म्हणाले. “ही एक अत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे.”
रॉयटर्सने याआधी दिलेल्या अहवालानुसार, यावेळच्या संघर्षाचा जलद शेवट हा अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे आणि भारत, पाकिस्तान यांच्यातील गुप्त मुत्सद्देगिरीमुळे शक्य झाला. मात्र भारताने कोणत्याही तृतीय पक्षाच्या भूमिकेला नकार दिला असून, भारत आणि पाकिस्तानमधील कोणताही संवाद हा द्विपक्षीयच असावा, असा आग्रह धरला आहे.
मात्र मिर्झा यांनी, इशारा दिला आहे की, “भविष्यात आंतरराष्ट्रीय मध्यस्थी कठीण होऊ शकते, कारण दोन्ही देशांमध्ये संकट व्यवस्थापन यंत्रणा नाहीत.”
“भविष्यात आंतरराष्ट्रीय समुदायाकडे हस्तक्षेप करण्यासाठीची वेळ खूपच कमी असेल, आणि मी असे म्हणेन की, त्या वेळेचा वापर होण्याआधीच नाश आणि विध्वंस घडून गेलेला असेल,” ते म्हणाले.
“पाकिस्तान भारतासोबत संवादासाठी तयार आहे,” त्यांनी असेही नमूद केले. मात्र सध्या, दोन्ही देशांमध्ये लष्करी संचालनालयाच्या प्रमुखांदरम्यान झालेल्या एका आपत्कालीन हॉटलाइन कॉल आणि सीमावर्ती पातळीवरील काही हॉटलाइन कॉलशिवाय कोणताही अन्य संवाद झालेला नाही.
दरम्यान, भारताने आपल्या भूमिकेत कोणता बदलही केलेला नाही.
“संवाद झाला तर तो केवळ दहशतवाद आणि (पाक-अधिकृत काश्मीर) या विषयांवरच होईल,” असे भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. “जर पाकिस्तान खरोखरच संवाद साधण्यास इच्छुक असेल, तर त्याने दहशतवाद्यांना भारताच्या हवाली करावे, जेणेकरून न्याय होऊ शकेल,” असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)