पंतप्रधान नरेंद्र मोदी, पुढील आठवड्यात सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान, यांचे निमंत्रण स्विकारत सौदी दौर्यावर जाणार आहेत. 22 ते 23 एप्रिल दरम्यान हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
2016 आणि 2019 नंतर, पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा सौदी अरेबियाला भेट देतील.
“सप्टेंबर 2023 मध्ये क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी केलेला भारताचा राजकीय दौरा, G-20 शिखर परिषदेतील सहभाग आणि भारत-सौदी अरेबिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप काउन्सिलच्या पहिल्या बैठकीच्या सह-अध्यक्षपदानंतर, पीएम मोदींचा हा दौरा होत आहे,” असे भारत सरकारने जारी केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
भारत-सौदी अरेबिया भागीदारी
भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात दीर्घकालीन सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यापार संबंधांची पार्श्वभूमी आहे. दोन्ही देशांत जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
दोन्ही देश रणनीतिक भागीदार म्हणून – राजकीय, संरक्षण, सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि नागरी अशा विविध क्षेत्रांत, सशक्त द्विपक्षीय भूमिका बजावत आहेत.
गेल्या दशकात भारत-सौदी संबंध अधिक दृढ व दीर्घकालीन भागीदारीत रूपांतरित झाले आहेत. यात संरक्षण सहकार्य, गुंतवणूक व उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चांमध्ये विशेष वाढ झाली आहे.
पंतप्रधान मोदींचा हा दौरा, सौदी अरेबियाशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांना भारत किती महत्त्व देतो याचे प्रतिक आहे.
“हा दौरा आमच्या बहुआयामी भागीदारीला अधिक सखोल करण्याची संधी असेल, तसेच विविध प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर परस्पर चर्चा करण्यासाठी एक मंच मिळेल,” असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात नमूद केले आहे.
भारत आणि सौदी अरेबियामध्ये राजनैतिक संबंध 1947 साली प्रस्थापित झाले होते.
दिल्ली जाहीरनामा
सौदी अरेबियाचे राजा अब्दुल्ला, यांनी जानेवारी 2006 मध्ये केलेला ऐतिहासिक भारत दौरा एक महत्त्वाचा टप्पा ठरला, ज्यामध्ये ‘दिल्ली जाहीरनाम्यावर’ स्वाक्षरी करण्यात आली.
त्यानंतर 2010 मध्ये, भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सौदी दौर्यात, ‘रियाध जाहीरनामा’ अंतिम झाला आणि दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध रणनीतिक भागीदारीमध्ये परिवर्तित झाले.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या, एप्रिल 2016 मधील रियाध दौऱ्याने राजकीय, आर्थिक, सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्याला गती दिली. या दौऱ्यात सौदीच्या राजाने पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान ‘किंग अब्दुलअझिझ सॅश’ प्रदान केला.
क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, यांचा फेब्रुवारी 2019 मधील भारत दौरा, द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. या दौऱ्यात सौदी अरेबिया भारतात अंदाजे 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा झाली. गुंतवणूक, पर्यटन, गृहबांधणी, ऑडिओ-व्हिज्युअल कार्यक्रमांचे आदानप्रदान आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) मध्ये सौदीच्या सहभागाबाबत सहा करार झाले.
मोदींनी ऑक्टोबर 2019 मध्ये, पुन्हा एकदा रियाधचा दौरा केला. या दौऱ्यात स्टॅटेजिक पार्टनरशिप काउन्सिल अॅग्रीमेंटवर स्वाक्षरी करण्यात आली, ज्यामुळे भारत-सौदी संबंधांचा उच्चस्तरीय मार्ग निश्चित करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये 12 करार झाले ज्यात- ऊर्जा, सुरक्षा, संरक्षण उत्पादन, नागरी विमान वाहतूक, वैद्यकीय उत्पादने, धोरणात्मक पेट्रोलियम साठे, लघु व मध्यम उद्योग, राजनैतिक प्रशिक्षण इत्यादींचा समावेश होता. तसेच, पंतप्रधानांनी 3rd Future Investment Initiative Summit मध्ये मुख्य भाषण दिले.
क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी, 9 ते 11 सप्टेंबर 2023 दरम्यान भारताला भेट दिली. यावेळी त्यांनी G20 शिखर परिषदेत भाग घेतला आणि भारत-सौदी अरेबिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिलच्या पहिल्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले.
या दौऱ्यात ऊर्जा, बँकिंग, गुंतवणूक, उत्पादन, अभिलेखीय सहकार्य, भ्रष्टाचारविरोधी उपाययोजना आणि जलक्षरण या क्षेत्रांमध्ये मिळून 8 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. अलीकडील काही वर्षांत, विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय उच्चस्तरीय संपर्क घडून आले आहेत.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)