रोमन कॅथोलिक चर्चचे नेतृत्व करणारे पहिले लॅटिन अमेरिकन पोप फ्रान्सिस यांचे निधन झाल्याचे व्हॅटिकनने सोमवारी एका व्हिडिओ निवेदनात जाहीर केले.
त्यांच्या निधनाने अंतर्गत विभागणी आणि चर्चच्या दीर्घकालीन परंपरा सुधारण्याच्या त्यांच्या प्रयत्नांद्वारे परिभाषित केलेल्या पोपशाहीचा अंत झाला.
निधनाच्या वेळी त्यांचे वय 88 वर्ष होते आणि अलीकडेच दुहेरी न्यूमोनियाच्या गंभीर आजारातून बरे झाले होते.
कार्डिनल केव्हिन फॅरेल यांनी व्हॅटिकनच्या टीव्ही वाहिनीवर घोषणा केली, “प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी अत्यंत दुःखाने आपल्या पवित्र पिता (पोप) फ्रान्सिस यांच्या निधनाची घोषणा करत आहे.”
“आज सकाळी 7.35 वाजता रोमचे बिशप फ्रान्सिस पित्याच्या घरी परतले.”
पोप फ्रान्सिस
जॉर्ज मारियो बर्गोग्लियो 13 मार्च 2013 रोजी पोप म्हणून निवडून आले. त्यांच्या निवडीमुळे अनेक चर्च निरीक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला होता कारण ते अर्जेंटिनाचे धर्मगुरू असल्याने इतरांसाठी उपरे होते.
त्यांच्या वाट्याला आलेल्या भव्य भूमिकेतही त्यांनी साधेपणा जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पूर्वजांनी वापरलेल्या अपोस्टोलिक पॅलेसमधील अलंकृत पोप सदनिकेतही ते कधी राहायला गेले नाहीत. आपल्रा “मानसिक आरोग्यासाठी” सामुदायिक वातावरणात राहणे आपल्याला पसंत असल्याचे त्यांनी कायम सांगितले.
बाल शोषण घोटाळा आणि व्हॅटिकनच्या नोकरशाहीतील अंतर्गत कलहामुळे चर्चबद्दल लोकांच्या मनात डागाळलेली प्रतिमा त्यांना वारशाने मिळाली. त्यामुळे सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी स्पष्ट आदेशासह त्यांची निवड झाली.
परंतु जसजसे त्याची पोप म्हणून असणारी जबाबदारीची वर्षे पुढे सरकत गेली तसतसे त्यांना पुराणमतवाद्यांकडून तीव्र टीकेचा सामना करावा लागला. टीकाकारांनी त्यांच्यावर परंपरा नष्ट केल्याचा आरोप केला. 2 हजार वर्षे जुन्या चर्चला पुन्हा आकार देण्यासाठी त्यांनी आणखी बरेच काही करायला हवे होते असे वाटणाऱ्या पुरोगामी लोकांमध्येही त्यामुळे नाराजी होती.
जागतिक सुपरस्टार
अंतर्गत मतभेदांशी संघर्ष करत असताना, फ्रान्सिस एक जागतिक सुपरस्टार बनले, त्यांच्या अनेक परदेशी दौऱ्यांमध्ये त्यांनी प्रचंड गर्दीला आपल्याकडे आकर्षित करून घेतले. त्यांनी आंतरधर्मीय संवाद आणि शांततेला अथकपणे प्रोत्साहन दिले, स्थलांतरितांसारख्या उपेक्षितांची बाजू घेतली.
आधुनिक काळातील अद्वितीय, फ्रान्सिस यांच्या कार्यकाळातील बहुतांश काळासाठी व्हॅटिकनमध्ये पांढरे कपडे घातलेले दोन पुरुष होते, त्यांचे पूर्ववर्ती बेनेडिक्ट यांनी 2013 मध्ये त्यांच्या धक्कादायक राजीनाम्यानंतर होली सीमध्ये राहणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे नवीन पोपसाठी मार्ग खुला झाला होता.
पुराणमतवादी कार्याचे नायक बेनेडिक्ट यांच्या डिसेंबर 2022 मधील निधनामुळे फ्रान्सिस यांना पोपची जबाबदारी पार पाडण्यासाठी नंतर कोणाचेही मार्गदर्शन मिळाले नाही.
फ्रान्सिस यांनी सुमारे 80 टक्के कार्डिनल इलेक्टोर्सची नियुक्ती केली जे फेब्रुवारी 2025 पर्यंत पुढील पोपची निवड करतील. यामुळे परंपरावाद्यांकडून जोरदार टीका होत असूनही त्यांचा उत्तराधिकारी त्यांची पुरोगामी धोरणे सुरू ठेवण्याची शक्यता अधिक आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)