फेब्रुवारी 2022 मध्ये, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमध्ये रशियन सैन्य पाठवले, ज्यानंतर अखेर तीन वर्षांनी रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडील लुहान्स्क प्रांतावर संपूर्ण नियंत्रण मिळवल्याची घोषणा केली आहे. रशियाच्या सरकारी टीव्ही चॅनलवर, त्या प्रांतात रशियाने नेमलेल्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
लुहान्स्क, हा सुमारे 26,700 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला प्रदेश आहे, जो 2014 मध्ये क्रिमिया अधिग्रहणानंतर रशियाच्या स्थिर नियंत्रणाखाली गेलेला पहिला युक्रेनियन प्रांत ठरला आहे.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी, सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर केले होते की, लुहान्स्क तसेच अंशतः नियंत्रित डोनेट्स्क, खेरसोन आणि झापोरीझ्झिया हे प्रांत आता रशियाचा भाग आहेत. मात्र, युरोपियन देशांनी या कृतीला बेकायदेशीर ठरवले असून, जगातील बहुतांश देशांनी यास मान्यता नाकारली आहे.
“लुहान्स्क पीपल्स रिपब्लिकचे संपूर्ण क्षेत्र मुक्त झाले आहे, अगदी 100%,” असे लियोनिद पासेचनिक यांनी रशियन राज्य वाहिनीला सांगितले. पासेचनिक हे मूळचे सोव्हिएत युक्रेनमधील असून, आता रशियाच्या नेमणुकीत लुहान्स्कचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.
या घोषणेनंतर रशियन संरक्षण मंत्रालयाकडून, अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी वा प्रतिक्रिया मिळालेली नाही. युक्रेननेही यावर तत्काळ प्रतिक्रिया दिली नाही.
युक्रेन सरकारने स्पष्ट केले आहे की, ‘लुहान्स्क आणि इतर प्रांतांवरील रशियाचे दावे अनधिकृत व बेकायदेशीर आहेत. कीव्हने रशियन सार्वभौमत्व मान्य न करण्याची शपथ घेतली आहे.’
दुसरीकडे, रशियाने या प्रदेशांना रशियाचा भाग घोषित केले असून, त्यांना रशियाच्या अणु सुरक्षा कवचाखाली आणले आहे आणि ते क्षेत्र कधीही परत देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
इतिहास पाहता, लुहान्स्क पूर्वी रशियन साम्राज्याचा भाग होता, परंतु रशियन क्रांतीनंतर त्याचा ताबा बदलला. 1920 मध्ये रेड आर्मीने हा भाग ताब्यात घेतला आणि 1922 मध्ये तो युक्रेनी सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताकाचा भाग म्हणून सोव्हिएत युनियनमध्ये समाविष्ट झाला.
डोनेट्स्कप्रमाणेच, लुहान्स्क हा देखील त्या संघर्षाचे केंद्रबिंदू ठरला आहे, जो 2014 मध्ये सुरु झाला होता. त्या वेळी युक्रेनमध्ये प्रो-रशियन राष्ट्राध्यक्ष हटवण्यात आले आणि रशियाने क्रिमिया बळकावला. त्यानंतर लुहान्स्क व डोनेट्स्कमध्ये रशियन समर्थक वेगळावादी सैन्य आणि युक्रेनियन सैन्य यांच्यात लढाई सुरू झाली.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)