रशियाने युक्रेनची राजधानी कीव येथे अनेक ठिकाणी ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केल्यामुळे किमान चार जणांचा मृत्यू झाला आणि 20 जण जखमी झाले, असे शुक्रवारच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
वृत्तानुसार, कीवने रशियाच्या आत असलेल्या एअरफील्डवर धाडसी हल्ले केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून युक्रेनवर रशियन ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा झाला आहे.
युक्रेन रशियन हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न करत असताना कीवमधील इमारतींचे पडणारे ढिगारे आणि ड्रोन हल्ल्यांमुळे आगी लागल्याच्या नोंदी झाल्याचे कीव शहर लष्करी प्रशासनाचे प्रमुख, टायमूर तकाचेन्को यांनी सीएनएनला सांगितले.
कीवच्या सोलोम्यान्स्की जिल्ह्यातील एका उंच इमारतीचे नुकसान झाल्याचे सांगत, तकाचेन्को यांनी रशियाने ड्रोनच्या मदतीने निवासी भागात हल्ला केल्याचा आरोप केला.
विखुरलेला दारूगोळा
दरम्यान, लाखो खाणी आणि न फुटलेले दारूगोळ्यांचे साठे सध्या युक्रेनमध्ये विखुरलेले आहेत. यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर हा सर्वात जास्त दूषित देश बनला आहे, असे युक्रेनमधील संयुक्त राष्ट्रांच्या खाण कृती सेवा (UNMAS) सल्लागार पॉल हेस्लॉप यांनी सांगितले.
UNMAS चा अंदाज आहे की युक्रेनमधील 20 टक्क्यांपेक्षा – किंवा 1 लाख 39 हजार चौरस किलोमीटर – पेक्षा जास्त जमीन – खाणी किंवा न फुटलेल्या दारूगोळ्यांच्या साठ्यांमुळे दूषित आहे.
सहा दशलक्षाहून अधिक लोक दूषित भागात किंवा त्याच्या आसपास राहतात आणि न फुटलेल्या दारूगोळ्यांच्या साठ्यांमुळे 800 हून अधिक लोकांचे बळी गेल्याची नोंद झाली आहे. हे खरे प्रदूषण आहे.
परंतु हेस्लॉप यांनी नमूद केले की प्रत्यक्षात दूषित असलेल्या प्रत्येक चौरस किलोमीटरसाठी 100 किमीचा भाग असा आहे जो प्रत्यक्षात प्रदूषित नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की रहिवाशांना वाटते की ते सुरक्षितपणे जमिनीवर परत येऊ शकतात. हे न फुटलेल्या शस्त्रास्त्रांचे “कथित प्रदूषण” आहे.
UNMAS 1 लाख 39 हजार चौरस किलोमीटर संभाव्य दूषित जमिनीपैकी कोणती सुरक्षित आहे हे ओळखण्याचे काम करत आहे.
35 हजार चौरस किलोमीटर सुरक्षित घोषित
दोन वर्षांपूर्वी, UNMAS ने अंदाज लावला होता की युक्रेनमधील 1 लाख 74 हजार चौरस किलोमीटर क्षेत्र प्रदूषित होते. तेव्हापासून, 35 हजार चौरस किलोमीटर क्षेत्र सुरक्षित घोषित करण्यात आले आहे, ज्यामुळे रहिवासी त्यांच्या समुदायात परत जाऊ शकतात.
दूषित जमीन निर्मूलन करण्याची प्रक्रिया – एकतर न फुटलेले बॉम्ब तिथून काढून टाकून किंवा क्षेत्र स्कॅन करून ते सुरक्षित घोषित करून – शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी विशेषतः महत्वाची आहे.
युद्ध सुरू झाल्यापासून, युक्रेनच्या कृषी क्षेत्राला 83.9 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले आहे, ज्याचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतजमीन न फुटलेल्या दारूगोळ्यामुळे दूषित झाली आहे.
अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) व्हाउचर आणि बियाणे वितरणासह विविध कार्यक्रमांद्वारे 2 लाख 50 हजारांहून अधिक कुटुंबांना मदत केली आहे. त्यांनी शेत जमीन साफ करण्यासाठी आणि ती परत वापरण्याजोगी करण्यासाठी UNMAS सोबत जवळून काम केले आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)