रविवारी, दमास्कसच्या ड्वेइला भागातील मार एलियास चर्चमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये किमान 20 लोकांचा मृत्यू झाला आणि 50 हून अधिकजण जखमी झाले, अशी माहिती आरोग्य प्रशासन आणि सुरक्षा सूत्रांनी दिली आहे.
डिसेंबरमध्ये इस्लामी विद्रोह्यांच्या नेतृत्वाखालील उठावानंतर, बशर अल-असद सत्तेवरून पायउतार झाल्यापासून दमास्कसमधील हा पहिलाच आत्मघातकी हल्ला होता.
इस्लामिक स्टेटचा (IS) सुसाईड बॉम्बर: सिरियन मंत्रालय
“आत्मघातकी हल्लेखोर इस्लामिक स्टेटचा सदस्य होता. त्याने चर्चमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथम गोळीबार केला आणि नंतर आपले स्फोटक जॅकेट उडवले,” असे सिरियाच्या अंतर्गत मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
एका सुरक्षा अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “या हल्ल्यात दोन जण सहभागी होते, त्यापैकी एकाने स्वतःला उडवून दिले.”
बशर अल-असदची सत्ता संपल्यानंतर, इस्लामिक स्टेटने सिरियातील चर्चवर अनेक हल्ल्याचा प्रयत्न केला होता, पण हा पहिलाच यशस्वी हल्ला ठरला, अशी माहिती रॉयटर्सला दुसऱ्या सुरक्षा अधिकाऱ्याने दिली.
सिरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, आरोग्य मंत्रालयाने या स्फोटात 52 लोक जखमी झाल्याचे सांगितले.
सिरियाच्या सिव्हिल डिफेन्स संस्थेने (व्हाइट हेल्मेट्स) प्रसारित केलेल्या फुटेजमध्ये, चर्चच्या आत रक्ताच्या डागांनी भरलेली जमीन, तुटलेली बाकं आणि पडझड झालेली भिंती दिसून आली.
सिरियाचे राष्ट्रपती अहमद अल-शरा, जे असदविरोधातील मोहिमेचे नेतृत्व करत होते आणि जानेवारीपासून संक्रमणकालीन टप्प्यासाठी सत्तेवर आले, त्यांनी वारंवार सांगितले आहे की, ‘ते अल्पसंख्यांकांचे संरक्षण करतील.’
IS चे वारंवार हल्ले
“दमास्कसमधील मार एलियास ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चवर झालेल्या, आत्मघातकी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो,” असे ग्रीसच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.
“आम्ही सिरियाच्या संक्रमण सरकारकडून या हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांवर तातडीने कारवाई करण्याची आणि ख्रिश्चन समुदायांसह सर्व धार्मिक समूहांचे संरक्षण सुनिश्चित करण्याची मागणी करतो, जेणेकरून ते भयमुक्त जीवन जगू शकतील.”
इस्लामिक स्टेटने यापूर्वीही धार्मिक अल्पसंख्याकांवर हल्ले केले होते, ज्यात 2016 मध्ये सय्यदा झैनब येथे शिया यात्रेकरूंवर झालेला मोठा बॉम्बस्फोट हा बहुचर्चित ठरला.
नुकताच झालेला हल्ला हे दर्शवतो की, आपले क्षेत्रीय नियंत्रण कोसळल्यावरही आणि वर्षानुवर्षे चाललेल्या दहशतवादविरोधी प्रयत्नांनंतरही, गट सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा फायदा घेत हल्ला करू शकतो.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)