‘तैवानचे सायबर दल चीनच्या धमक्यांना घाबरणार नाही,’ असे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले, जेव्हा बीजिंगने 20 जणांच्या अटकेसाठी बक्षीस (Hacker Arrest Bounty) जाहीर केले. हे सर्वजण तैवानचे लष्करी हॅकर असल्याचा दावा चीन करत आहे.
मंत्रालयाने ठामपणे सांगितले की, चीनच्या कायदेशीर प्रणालीला तैवानवर कोणताही अधिकार नाही आणि अशा युक्त्या त्यांच्या सायबर संरक्षण प्रयत्नांना रोखू शकणार नाहीत.
चीन लोकशाही पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या तैवानला आपलाच भूभाग मानतो आणि गेल्या पाच वर्षांपासून या बेटावर लष्करी आणि राजकीय दबाव वाढवत आहे. तैवान सरकार बीजिंगच्या सार्वभौमत्वाच्या दाव्यांना फेटाळून लावते.
चीन ‘नरम भूमिका घेणार नाही’
गेल्या आठवड्यात, चीनमधील ग्वांगझो शहराच्या सार्वजनिक सुरक्षा ब्युरोने सांगितले की, “हे हॅकर, तैवान लष्कराच्या माहिती, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक फोर्स कमांडचा भाग होते. त्यांनी त्यांची छायाचित्रे, नावे आणि तैवान ओळखपत्र क्रमांक (ID card numbers) प्रकाशित केले आणि त्यांच्या अटकेसाठी $1,000 पेक्षा जास्त बक्षीस जाहीर केले.”
बुधवारी, चीनच्या तैवान व्यवहार कार्यालयाने (Taiwan Affairs Office) सांगितले की, “सरकार या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करेल आणि कोणतीही नरमी दाखवणार नाही, त्यांच्यावर “कठोर कारवाई” करण्यासाठी कायदेशीर मार्गांचा वापर करेल.
चीन तथ्ये विकृत करत आहे: तैवान
बुधवारी उशिरा, तैवानच्या संरक्षण मंत्रालयाच्या इलेक्ट्रॉनिक फोर्स कमांडने सांगितले की, “चीन फसव्या सायबर हॅकिंग घटनांचा वापर करून तथ्ये (Facts) विकृत करत आहे आणि सीमापार बक्षीस जाहीर करत आहे.”
तैवानच्या संविधानानुसार, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला तैवानवर कोणताही कायदेशीर अधिकार नाही आणि त्यांच्या कायद्यांचा तैवानच्या नागरिकांवर “कोणताही बंधनकारक प्रभाव नाही,” असे त्यांनी एका निवेदनात स्पष्ट केले.
“चीनी कम्युनिस्ट पक्षाने त्यांच्या अंतर्गत कायदे व नियम वापरून जाणीवपूर्वक जनमताचा विपर्यास केला आहे. दीर्घकालीन अधिकारक्षेत्र तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमच्या लष्कराचे मनोबल खच्ची करण्याचा उद्देश ठेवला आहे,” असेही त्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, “इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन्स अँड इलेक्ट्रॉनिक फोर्स कमांडमधील अधिकारी आणि सैनिक या गोष्टींवर परिणाम होऊ देणार नाहीत. ते डिजिटल सीमेचे संरक्षण करत राहतील आणि माहितीच्या दृढ सुरक्षेच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षिततेची खात्री देतील.”
तैवानने, चीनवर वारंवार सायबर हल्ले केल्याचा आणि सोबतच सरकारवरील विश्वास कमी करण्यासाठी, सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप केला आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीसह)