गेल्या आठवड्याच्या अखेरीस, चिनी लढाऊ विमानांनी, जपानच्या गस्त घालणाऱ्या लष्करी विमानांच्या अत्यंत जवळून उड्डाण केले, असे टोकियोने सांगितले. ही घटना तेव्हा घडली आहे जेव्हा, पॅसिफिक महासागरात पहिल्यांदाच दोन चिनी विमानवाहू नौका एकत्र कार्यरत असल्याचे दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले.
“या घटनेबाबत जपानने चीनकडे औपचारिक निषेध नोंदवला आहे,” असे मुख्य कॅबिनेट सचिव योशिमासा हायाशी यांनी गुरुवारी सांगितले.
गंभीर चिंता
“आम्ही याप्रकरणी चीनकडे चिंता व्यक्त केली असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरता ठाम विनंती केली आहे,” असे हायाशी सांगितले. त्यांनी 7 आणि 8 जून रोजी, घडलेल्या घटनांचा उल्लेख केला, ज्यामध्ये टोकियोच्या म्हणण्यानुसार चिनी लढाऊ विमाने जपानी विमानांच्या केवळ 45 मीटर (148 फूट) अंतरावरून उडाली.
शनिवारी, ‘शानडोंग’ या चिनी विमानवाहू युद्धनौकेवरून उडालेल्या J-15 लढाऊ विमानाने, सुमारे 40 मिनिटे जपानच्या P-3C या गस्त घालणाऱ्या विमानाचा पाठलाग केला, अशी माहिती जपानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.
रविवारी, दुसऱ्या J-15 ने त्याच प्रकारे P-3C चा 80 मिनिटे पाठलाग केला, आणि फक्त ९०० मीटर (२,९५० फूट) अंतरावरून समोरून क्रॉस केले, असेही मंत्रालयाने नमूद केले.
ही P-3C विमाने जपानच्या मॅरिटाईम सेल्फ-डिफेन्स फोर्सची असून, ओकिनावा बेटावर तैनात आहेत, जी त्यावेळी आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात देखरेख करत होती, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.
अस्वाभाविक जवळीक
“चिनी लष्करी विमानांची ही अस्वाभाविक वर्तणूक अपघाती टक्कर होण्याची शक्यता निर्माण करू शकते,” असे जपानच्या संरक्षण मंत्रालयाने बुधवारी एका निवेदनात सांगितले. त्यांनी रविवारी घेतलेल्या J-15 विमानाचे क्लोज-अप फोटो देखील प्रसिद्ध केले. या घटनांमध्ये जपानी विमानांना किंवा त्यातील कर्मचाऱ्यांना कोणतीही हानी पोहोचली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हायाशी यांनी सांगितले की, “टोकियो बीजिंगशी विविध स्तरांवर संपर्क ठेवेल आणि आपल्या हवाई हद्दींचे सतत निरीक्षण सुरू ठेवेल.”
या आठवड्याच्या सुरुवातीला, टोकियोने सांगितले की, ‘शानडोंग’ आणि ‘लिआओनिंग’ या दोन चिनी विमानवाहू नौका प्रथमच एकाचवेळी पॅसिफिक महासागरात कार्यरत असल्याचे दिसून आले, आणि याला बीजिंगकडून आपल्या सैनिकी क्षमतेचा विस्तार करण्याचा इशारा मानले आहे.
बीजिंगने, ही “नियमीत सैनिकी प्रशिक्षण कवायत” असल्याचे सांगितले आहे आणि ती कोणत्याही विशिष्ट देशाला उद्देशून नसते, असेही स्पष्ट केले आहे.
2014 मध्येही, टोकियोने असा दावा केला होता की, चिनी लष्करी विमानांनी पूर्व चीन समुद्राच्या वरील हवाई क्षेत्रात, त्यांच्या विमानांपासून केवळ 30 मीटर अंतरावरून उड्डाण केले होते आणि त्याबाबत बीजिंगकडे निषेध नोंदवण्यात आला होता.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीसह)