अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, मंगळवारी सोशल मीडियाद्वारे केलेल्या विधानात सांगितले की, “इस्रायलने गाझामधील 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी आवश्यक अटींना मान्यता दिली आहे.” ट्रम्प यांच्या या विधानामुळे गाझामधील नागरिकांमध्ये नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मंगळवारी, डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट करत सांगितले की, “मध्यस्थ असलेले कतार आणि इजिप्त हे देश, हमासला एक “अंतिम” प्रस्ताव देतील.” ट्रम्प प्रतिनिधींच्या इस्रायली अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या “दीर्घ व फलदायी” बैठकीनंतर हे विधान करण्यात आले.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, यांच्यावर गाझामध्ये जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबवून कायमस्वरूपी युद्धविराम करावा, याकरता जनतेचा दबाव वाढतो आहे. मात्र त्यांच्या कट्टर उजव्या विचारसरणीच्या सत्ताधारी गटातील लोक याला तीव्र विरोध करत आहेत.
इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिडोन सार, यांनी बुधवारी ‘X’ (ट्विटर) वर लिहिले की, “बहुसंख्य सत्ताधारी गट युद्धबंदीच्या कराराला पाठिंबा देतील, जर त्यामध्ये हामासकडून गाझामध्ये पकडून ठेवलेले बंधक सोडवले जातील.”
21 महिन्यांच्या लष्करी मोहिमेनंतर, अन्न, निवारा आणि सुरक्षिततेसाठी झगडणाऱ्या गाझाच्या सामान्य नागरिकांना या घडामोडींमुळे एक आशेचा किरण मिळाला आहे.
व्यवसायिक तामेर अल-बुराई यांनी सांगितले की: “सगळ्यांना आशा आहे की, यावेळी युद्धविराम नक्कीच कार्यान्वित होईल. आता अपयशाला जागा नाही. प्रत्येक दिवस आमचे आयुष्य हिरावून घेतो आहे. आम्ही अत्यंत कठीण काळ अनुभवत आहोत. लोकांना युद्धाचा शेवट हवा आहे, उपासमार आणि अवहेलना संपायला हवी आहे.”
दरम्यान, ट्रम्प यांच्या विधानावर इस्रायल किंवा हामासकडून कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेला नाही.
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार: “इस्रायलने 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी आवश्यक अटींना मान्यता दिली आहे. या काळात आपण युद्ध पूर्णपणे थांबवण्यासाठी सर्व पक्षांशी समन्वय साधू.”
इराणचा दुवा
ट्रम्प यांना असे वाटते की, इराणमधील अणु-उपक्रमांवर अमेरिकन व इस्रायली हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा वापर करून हामासवर दबाव आणता येईल. हामास हा इराण समर्थित गट असल्याने याचा परिणाम होऊ शकेल.
इस्रायलच्या नेतृत्वालाही वाटते की, मागील महिन्यातील 12 दिवसांच्या युद्धामुळे इराण कमकुवत झाला आहे, त्यामुळे इतर अरब देश इस्रायलशी संबंध प्रस्थापित करण्याची संधी शोधू शकतात.
हामासच्या एका अधिकाऱ्याने, ट्रम्प यांच्या विधानावर तातडीची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, गटाशी जवळीक असलेल्या एका स्रोताने सांगितले की, हामासचे नेते या प्रस्तावावर चर्चा करतील आणि मध्यस्थांकडून स्पष्टीकरण मागतील.
मे महिन्याच्या अखेरीस हामासने सांगितले होते की, अमेरिकेच्या पाठबळ असलेल्या युद्धविरामाच्या प्रस्तावामध्ये काही बदलांची आवश्यकता आहे. ट्रम्प यांचे दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी त्या वेळचा प्रस्ताव “पूर्णतः अस्वीकार्य” असल्याचे म्हटले होते.
त्या प्रस्तावात 60 दिवसांच्या युद्धविरामासोबत, हामासकडून अर्ध्या ओलिसांना सोडणे, पॅलेस्टिनी कैद्यांची अदलाबदल करणे आणि नंतर उरलेल्या ओलिसांना सोडणे याबाबत नमूद होते. त्यानंतर युद्ध संपवण्यासाठी अंतिम करार केला जाणार होता.
इस्रायली विरोधी पक्षनेते यायर लॅपिड यांनी बुधवारी ‘X’ वर लिहिले की, ‘जर सत्ताधारी गटातील कट्टर मंत्री कराराला विरोध करतात, तर त्यांचा पक्ष सरकारला संसदेत विश्वासदर्शक ठरावावरील पराभवापासून वाचवण्यासाठी पाठिंबा देईल, म्हणजेच सरकार कोसळू नये याची काळजी घेतली जाईल.’
गाझा आरोग्य खात्याच्या माहितीनुसार, इस्रायली हल्ल्यांमध्ये उत्तर व दक्षिण भागांतील वेगवेगळ्या ठिकाणी किमान २० पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले. मंगळवारी उशिरा इस्रायल सैन्याने आणखी स्थलांतराचे आदेश दिले.
रॉयटर्सच्या प्रश्नांना उत्तर देताना, इस्रायलच्या लष्करी सैन्य प्रवक्त्यांनी सांगितले की, “त्यांच्या कारवायांचा उद्देश हामासच्या लष्करी क्षमतेचा नाश करणे आणि सामान्य नागरिकांचे नुकसान टाळणे हा आहे.” मात्र, विशिष्ट घटनांवर त्यांनी कोणतीही टिप्पणी केली नाही.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)