अमेरिकेकडून तैवानला 228 दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी सुट्या भागांची विक्री

0
लष्करी

अमेरिकेकडून तैवानला अंदाजे 228 दशलक्ष अमेरिकन डॉलर किमतीच्या सुटे भागांची विक्री केली जाणार आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सोमवारी या परदेशी लष्करी विक्रीला मंजुरी दिल्याची घोषणा केली.

या विक्रीमध्ये विमानांचे घटक परत करणे, त्यांची दुरुस्ती आणि पुनर्विक्री यांचा समावेश आहे. चीनच्या ‘ग्रे झोन’मुळे वाढणाऱ्या धोक्यांना प्रत्युत्तर म्हणून तैवानची लष्करी तयारी वाढवण्यासाठी अशी विक्रीरचना करण्यात आली आहे.

परराष्ट्र खात्याच्या म्हणण्यानुसार, सुटे भाग अमेरिकेच्या सरकारी साठ्यांमधून पुरवले जातील, ज्यामुळे तैवानच्या सशस्त्र दलांमध्ये जलद वितरण आणि एकत्रीकरण सुनिश्चित होईल. “तैवानच्या लष्कराला ही उपकरणे आपल्या सशस्त्र दलात सामावून घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही,” असे विभागाने एका निवेदनात म्हटले आहे.

दोन्ही राष्ट्रांमध्ये सध्या कोणतेही अधिकृत राजनैतिक संबंध नसतानाही अमेरिका तैवानचा सर्वात महत्त्वाचा सहकारी आणि संरक्षण उपकरणांचा पुरवठादार आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने शस्त्रास्त्र पॅकेजचे स्वागत केले, जे एका महिन्याच्या आत लागू होण्याची अपेक्षा आहे.

एका निवेदनात, तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने विविध प्रकारच्या विमानांची परिचालन सुरक्षा आणि लढण्याची तयारी कायम राखण्याच्या दृष्टीने या विक्रीच्या महत्त्वावर भर दिला.

मंत्रालयाने म्हटले आहे की, “अमेरिकेने मंजूर केलेले विमानाचे सुटे भाग आणि उपकरणे दुरुस्त करणे तसेच परत करणे यामुळे आपल्या हवाई दलाची लढाऊ सज्जता आणि सुरक्षा कायम राखण्यास मदत होईल.”

चीनच्या वारंवार होणाऱ्या लष्करी हल्ल्यांमुळे निर्माण झालेली आव्हानेही मंत्रालयाने अधोरेखित केली. “चिनी कम्युनिस्टांच्या नियमित ग्रे झोन घुसखोरीमुळे आपल्या हवाई आणि सागरी क्षेत्रातील प्रशिक्षणाची जागा तसेच प्रतिसाद वेळ संकुचित झाला आहे,” असे त्यात म्हटले आहे.

तैवान हा आपला प्रदेश असल्याचा दावा चीन करते. त्यामुळे अलिकडच्या वर्षांत तैवानवरील राजकीय आणि लष्करी दबाव वाढला आहे.

या कृतींमागे ग्रे-झोनमधील युद्ध रणनीती वाढवणे याचा समावेश आहे. या प्रकारात थेट लढाई केली जात नाही तर चीनच्या मुख्य भूमीजवळील तैवान-नियंत्रित बेटांजवळ नियमित गस्त घालणे यासारखे प्रकार केले जातात. तैवानने चीनच्या प्रादेशिक दाव्यांना ठामपणे नाकारले आहे असून अमेरिकेच्या पाठिंब्याने तैवान त्याच्या संरक्षण धोरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleयुरोपियन महासंघातील मतभेदांमुळे फ्रेंच सदस्याचा राजीनामा
Next articleWeapons provided By North Korea To Russia Affecting Frontline Says Ukraine’s Top Military Spook

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here