सोमवारी होणाऱ्या शांतता चर्चेच्या पूर्वसंध्येला, युक्रेन आणि रशियामध्ये प्रचंड प्रमाणात झालेले ड्रोनयुद्ध, प्रवासी रेल्वेवर पाडण्यात आलेला रशियन महामार्ग पूल आणि सायबेरियामधील अणु-सक्षम बॉम्बफेकी विमानांवर धाडसी हल्ला झाल्याने हा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.
या शांतता चर्चेला युक्रेन उपस्थित राहील की नाही याविषयी अनेक दिवस सुरू असलेल्या अनिश्चिततेनंतर, युक्रेनचे संरक्षण मंत्री रुस्तम उमरोव्ह सोमवारी इस्तंबूलमध्ये थेट शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीत रशियन अधिकाऱ्यांना भेटतील असा खुलासा राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी केला.
आठवड्याभरापूर्वी झालेल्या चर्चेच्या पहिल्या फेरीत युद्धातील कैद्यांची आतापर्यंतची सर्वात मोठी देवाणघेवाण झाली. मात्र युद्ध कसे थांबवायचे यावर कोणतेही एकमत झाले नाही.
उलट शांतता चर्चेदरम्यान, बऱ्याच वेळेला युद्ध झाल्याचे दिसून आले.
7 ठार 69 जखमी
रशियाच्या शेजारील युक्रेनच्या ब्रायन्स्क प्रदेशातील महामार्ग पूल 388 लोकांना घेऊन मॉस्कोला जाणाऱ्या प्रवासी रेल्वेगाडीवर कोसळल्यामुळे किमान सात जणांचा मृत्यू झाला आणि 69 जण जखमी झाले. अद्याप या हल्ल्याची कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही.
युक्रेनच्या एका गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले की, युक्रेनने रविवारी सायबेरियातील एका लष्करी तळावर रशियाच्या आण्विक क्षमतेच्या लांब पल्ल्याच्या बॉम्बफेकी विमानांवर हल्ला केला. युद्धसीमेवरून 4300 किमीपेक्षा (2670 मैल) लांब अंतरावर उभ्या असलेल्या या विमानांवर करण्यात आलेला हा हल्ला म्हणजे युक्रेनने रशियाच्या एवढ्या आत शिरून केलेला आतापर्यंतचा पहिलाच हल्ला आहे.
ऑपरेशन स्पायडर वेब
युक्रेनच्या देशांतर्गत गुप्तचर सेवा, एसबीयूने, “ऑपरेशन स्पायडर वेब” असे सांकेतिक नाव असलेला हा हल्ला केल्याचे मान्य केले असून या हल्ल्याची योजना दीड वर्षांहून अधिक काळापासून आखण्यात येत होती.
गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले की या कारवाईत लाकडी शेडच्या छतावर स्फोटकांनी भरलेले ड्रोन लपवून ते हवाई तळांवर नेण्यात आलेल्या ट्रकमध्ये लोड करण्यात आले होते.
एकूण 41 रशियन युद्ध विमानांवर हल्ला करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. एसबीयूने 7 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचा अंदाज लावला असून रशियाने त्याच्या मुख्य हवाई तळांवरील 34 टक्के सामरिक क्रूझ क्षेपणास्त्र वाहक गमावले असल्याचे सांगितले.
झेलेन्स्की यांनी “अतिशय उत्तम परिणाम” साधल्राबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या हल्ल्यात 117 ड्रोन वापरल्याचे नमूद करण्यात आले आहे.
“आणि युक्रेनने स्वतंत्रपणे निर्माण केलेला परिणाम,” त्यांनी लिहिले. “ही आमची सर्वात लांब पल्ल्याची कारवाई आहे.”
विमानांना आग लागल्याची रशियाची कबुली
युक्रेनच्या एका सरकारी अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की युक्रेनने अमेरिकेला या हल्ल्याची आगाऊ सूचना दिलेली नव्हती.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर कबूल केले की युक्रेनने रविवारी पाच प्रदेशांमधील रशियन लष्करी हवाई तळांवर ड्रोन हल्ले केले आहेत.
उत्तरेकडील मुर्मन्स्क आणि सायबेरियातील इर्कुत्स्क – या दोन प्रदेशांव्यतिरिक्त सर्व ठिकाणी हवाई हल्ले परतवून लावण्यात आले – जिथे “हवाई तळांच्या जवळच्या भागातून FPV ड्रोन सोडल्याने अनेक विमानांना आग लागली.”
कोणतीही जीवितहानी न होता आग विझवण्यात आली. हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे, असे मंत्रालयाने सांगितले.
युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की, रशियाने रात्री युक्रेनवर 472 ड्रोन डागले, जे आतापर्यंतच्या युद्धातील एका रात्रीत डागण्यात आलेले सर्वाधिक ड्रोन आहेत. रशियाने सात क्षेपणास्त्रे देखील डागली होती, असे हवाई दलाने म्हटले आहे.
53 हल्ले रोखले
रशियाने म्हटले आहे की ते युक्रेनच्या सुमी प्रदेशात आतपर्यंत पोहोचले आहेत. ओपन सोर्सच्या माध्यमातून मिळालेल्या युक्रेनियन नकाशांवरून रशियाने मे महिन्यात 450 चौरस किमी युक्रेनियन जमीन ताब्यात घेतल्याचे दिसून आले आहे, गेल्या किमान सहा महिन्यांतील ही सर्वात जलद मासिक प्रगती आहे.
ट्रम्प यांची धमकी
ट्रम्प यांचे राजदूत कीथ केलॉग यांच्या मते, दोन्ही बाजू तुर्कीमध्ये शांतता अटींसाठी त्यांच्या काय कल्पना आहेत याची रूपरेषा स्पष्ट करण्यासंबंधीचे त्यांचे दस्तऐवज सादर करतील. अर्थात तीन वर्षांच्या तीव्र युद्धानंतर, मॉस्को आणि कीव एकमेकांपासून खूप दूर गेले आहेत ही गोष्ट स्पष्ट आहे.
तास या वृत्तसंस्थेने राष्ट्रपतींचे सल्लागार व्लादिमीर मेडिन्स्की यांच्या हवाल्याने रशियाला युक्रेनकडून तोडगा काढण्याबाबत एक निवेदन प्राप्त झाल्याचे वृत्त दिले आहे. मेडिन्स्की हे वाटाघाटी करण्यासाठी रशियाकडून उपस्थित राहतील.
झेलेन्स्की यांची अनेक दिवसांपासून तक्रार आहे की रशियाने त्यांच्या प्रस्तावांवर एक निवेदन देण्यात अयशस्वी ठरले आहे.
लावरोव-रुबियो चर्चा
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी तुर्कीमध्ये होणारी संभाव्य चर्चा आणि तोडगा काढण्याच्या शक्यतांबद्दल चर्चा केली, असे लावरोव यांच्या मंत्रालयाने सांगितले.
रशिया समर्थित फुटीरतावादी आणि युक्रेनियन सैन्य यांच्यात पूर्व युक्रेनमध्ये आठ वर्षे चाललेल्या लढाईनंतर पुतीन यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये हजारो सैनिकांना युक्रेनवर आक्रमण करण्याचे आदेश दिले. 2022 पासून सुरू असलेल्या या युद्धात 12 लाखांहून अधिक लोक मारले गेले किंवा जखमी झाले आहेत असे अमेरिकेचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये, पुतीन यांनी युद्धाच्या तात्काळ समाप्त व्हावे यासाठी त्यांच्या सुरुवातीच्या अटी मांडल्या: युक्रेनने आपल्या नाटो महत्त्वाकांक्षा सोडून द्याव्यात आणि रशियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या चार युक्रेनियन प्रदेशांच्या प्रदेशातून आपले सैन्य मागे घ्यावे.
रॉयटर्सने पाहिलेल्या युक्रेनियन कागदपत्रांवरून कायमस्वरूपी शांततेसाठी प्रस्तावित रोडमॅपसह, करार झाल्यानंतर युक्रेनच्या लष्करी ताकदीवर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. तसेच मॉस्कोच्या सैन्याने ताब्यात घेतलेल्या युक्रेनच्या काही भागांवर रशियन सार्वभौमत्वाची आंतरराष्ट्रीय मान्यता आणि युक्रेनसाठी नुकसानभरपाई दिली जाणार नाही.
कागदपत्रांमध्ये असेही म्हटले आहे की सध्याची आघाडी ही प्रदेशाबाबतच्या वाटाघाटींसाठी प्रारंभिक बिंदू असेल.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)