प्रदेशीय अधिकाऱ्यांच्या मते, रशियाने पुन्हा एकदा Ukraine वर मोठा ड्रोन हल्ला केला, ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, कीव शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच हल्ल्यादरम्यान दक्षिणेकडील ओडेसा शहरातील एका प्रसूती वॉर्डवरही निशाणा साधण्यात आला.
सोमवारी, रशियाने युक्रेनवर केलेल्या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या ड्रोन हल्ल्यानंतर, पुन्हा एकदा हे रात्रीचे हल्ले झाले. मॉस्कोने म्हटले की, ‘हे हल्ले कीवने रशियामध्ये केलेल्या धाडसी हल्ल्यांना प्रत्युत्तरात देण्यासाठी करण्यात आले आहेत.’
10 पैकी 7 जिल्ह्यांवर दीर्घकाळ सुरु राहिलेल्या या हल्ल्यांमध्ये, किमान चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती, शहर अधिकाऱ्यांनी दिली.
“अशाप्रकारच्या दहशतीने युक्रेनियन लोकांची हिम्मत मोडता येणार नाही,” असे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे प्रमुख सहकारी अँद्री येर्माक यांनी हल्ल्यानंतर टेलीग्राम पोस्टद्वारे म्हटले.
कीवसह अनेक युक्रेनियन भागांमध्ये ‘एअर रेड’चा इशारा सुमारे पाच तासांपर्यंत (स्थानीय वेळेनुसार पहाटे 5 वाजेपर्यंत) सुरु होता, अशी माहिती लष्कराने दिली.
“ही सर्वांसाठी एक अवघड रात्र होती, शत्रूने रात्रभर कीववर वारंवार ड्रोन हल्ले केले. त्यांनी नागरी पायाभूत सुविधांना व सामान्य नागरिकांना लक्ष्य केले,” असे कीवच्या लष्करी जिल्ह्याचे प्रमुख तिमूर त्काचेंको यांनी टेलीग्रामवर लिहिले.
शहर अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘या हल्ल्यांमुळे नागरी वस्ती आणि व्यापारी परिसरांमध्ये तसेच उघड्या जागांमध्ये आग लागली. साक्षीदारांनी शहरात मोठे स्फोट ऐकले व पाहिले, ज्यामुळे संपूर्ण रात्र आकाश धगधगत होते.’
टेलीग्राम चॅनेल्सवर पोस्ट केलेल्या फोटो व व्हिडिओमध्ये, कीवच्या विविध भागांमध्ये काळोखात धुराचे लोट उठताना दिसले.
रशियाच्या हल्ल्यांमध्ये वाढ
1 जून रोजी, युक्रेनने रशियातील हवाई तळांवर उभ्या असलेल्या बॉम्बर विमानांवर केलेल्या हल्ल्यानंतर, मॉस्कोने आपले हल्ले मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. त्याच दिवशी पुलांवरील स्फोटांनाही कीव जबाबदार असल्याचे रशियाचे म्हणणे आहे, ज्यात सात जण ठार झाले आणि अनेक जखमी झाले.
या हल्ल्यांदरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही बाजूंना युद्धाबाबत तोडगा काढण्याचे आवाहन केले असतानाही हे घडले. मॉस्को आणि कीव तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच पुन्हा चर्चेच्या टेबलवर आले आहेत. मात्र युद्धकैद्यांच्या अदलाबदलीशिवाय इतर कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही.
अलीकडच्या दिवसांत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या ताफ्यांव्यतिरिक्त, रशिया पूर्व युक्रेनमधील आघाडीवर जमिनीवरही आपली हालचाल वाढवत असून, मंगळवारी आणखी काही भाग काबीज केल्याचा दावा त्यांनी केला.
“दक्षिणेकडील शहर ओडेसामध्ये, मोठ्या प्रमाणात झालेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय इमारत, एक प्रसूतीगृह आणि रहिवासी इमारती लक्ष्य करण्यात आले,” असे ओडेसा प्रांताचे गव्हर्नर ओलेह कीपर यांनी सांगितले.
“या हल्ल्यात एका 59 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले, मात्र तात्काळ रुग्णालयातील अन्य रुग्ण व कर्मचारी सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले,” असे कीपर म्हणाले.
त्यांनी इमारतींच्या तुटलेल्या खिडक्या व बाह्यभागाचे नुकसान दाखवणारे काही फोटोही पोस्ट केले.
दरम्यान, दोन्ही बाजूंनी नागरिकांना लक्ष्य केल्याचे नाकारले आहे, पण या संघर्षात हजारो नागरिक ठार झाले असून त्यातील बहुतांश युक्रेनियन नागरिक आहेत.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)