अमेरिकेच्या कोलोरॅडोतील बोल्डर येथे झालेल्या लक्ष्यित दहशतवादी हल्ल्यात अनेक लोक जखमी झाल्यानंतर रविवारी एका पुरुष संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे असे एफबीआयच्या संचालकांच्या सांगितले.
बोल्डरचे पोलिस प्रमुख स्टीफन रेडफर्न यांनी सांगितले की, गाझामध्ये असलेल्या इस्रायली ओलिसांच्या स्मरणार्थ सुरू असणाऱ्या मोर्चात झालेल्या हल्ल्याची मिळालेली माहिती “अतिशय प्राथमिक” होती. परंतु त्यांनी नमूद केले की याचा तपास करण्यासाठी पोलिसांना पाठवल्यानंतर “लोकांच्या अंगावर कॉकटेल फवारत त्यांना आग लावणाऱ्या” एका संशयिताला पकडण्यात आले.
हल्ल्याबाबत मतमतांतरे
एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी या घटनेचे वर्णन “लक्ष्यित दहशतवादी हल्ला” असे केले असले तरी, रेडफर्न यांनी यावर जोर दिला की या घटनेचे नेमके कारण काय आहे याबद्दल आता लगेच अंदाज लावणे खूप लवकर होईल.
“आम्ही सध्या याला दहशतवादी हल्ला म्हणत नाही,” असे रेडफर्न यांनी स्पष्ट केले. “बोल्डरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पर्ल स्ट्रीटवर घडलेले हे कृत्य अस्वीकार्य होते,” असेही ते म्हणाले. “मी तुम्हाला पीडितांबद्दल, त्या पीडितांच्या कुटुंबांबद्दल आणि या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रत्येकाबद्दल प्रार्थना करण्यास माझ्यासोबत सामील होण्याची विनंती करतो.”
त्यांनी सांगितले की काही जखमींच्या अंगावर भाजल्यानंतर जशा जखमा दिसतात तशा जखमा दिसत होत्या.
गोळीबारात याआधी दोघांचा मृत्यू
वॉशिंग्टन डीसीमध्ये इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांना गोळ्या मारून ठार केल्याप्रकरणी शिकागोमध्ये जन्मलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आल्यानंतर हा हल्ला झाला. अमेरिकन ज्यू कमिटीच्या – हा ज्यूविरोधींच्या विरूद्ध लढणारा आणि इस्रायलला पाठिंबा देणारा एक वकिली गट आहे – या कार्यक्रमातून बाहेर पडणाऱ्या लोकांच्या गटावर कोणीतरी गोळीबार केला.
या गोळीबारामुळे इस्रायल समर्थक आणि पॅलेस्टिनी समर्थक निदर्शकांमध्ये गाझा युद्धावरून अमेरिकेत ध्रुवीकरण झाल्याचे दिसून आले आहे.
‘अतिशय दुःखद घटना’
“गाझामध्ये अजूनही असणाऱ्या ओलिसांच्या सुटकेसंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी पर्ल स्ट्रीटवरील रन फॉर देअर लाईव्हज वॉकमध्ये सहभागी झालेल्यांवर हल्ला करण्यात आल्याचे ऐकून आम्हाला दुःख झाले आहे,” असे बोल्डरच्या ज्यू कम्युनिटीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कोलोरॅडोचे गव्हर्नर जेरेड पोलिस यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की ते परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत असून “कोणत्याही प्रकारची द्वेषपूर्ण कृत्ये अस्वीकार्य आहेत” असेही त्यांनी स्पष्ट केले.
रेडफर्न म्हणाले की संशयिताची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यांनी नमूद केले की त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांनी असेही सांगितले की जखमींमध्ये “खूप गंभीर ते किरकोळ अशा अनेक प्रकारचे रुग्ण आहेत.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)