“परदेशी दहशतवाद्यांपासून” आणि इतर सुरक्षा धोक्यांपासून देशाचे रक्षण करण्यासाठी बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यापासून बंदी घालण्याच्या घोषणेवर स्वाक्षरी केली. हा निर्णय घेण्याची आवश्यकता होती असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, इक्वेटोरियल गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन हे ते 12 प्रभावित देश आहेत.
बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या सात इतर देशांमधील नागरिकांचा प्रवेश अंशतः प्रतिबंधित असेल. या निर्बंधांचे वृत्त सर्वप्रथम सीबीएस न्यूजने दिले होते.
आणखी देशांचा समावेश होण्याची शक्यता
“आम्ही आमच्या देशात अशा लोकांना प्रवेश करू देणार नाही जे आम्हाला नुकसान पोहोचवू इच्छितात,” असे ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. त्यांनी सांगितले की यादीत सुधारणा केली जाऊ शकते आणि नवीन देशांचा त्यात समावेश केला जाऊ शकतो.
हा निर्णय 9 जून 2028 रोजी अमेरिकेच्या मध्यरात्री 12.01 (04.01 GMT) वाजल्यापासून लागू होईल.
ट्रम्प म्हणाले की सर्वात कठोर निर्बंध असलेल्या देशांमध्ये “मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा समावेश आहे,” व्हिसा सुरक्षेत सहकार्य करण्यात ते अपयशी ठरले असून प्रवाशांची ओळख पडताळणी करण्यासाठी असक्षम आहेत, गुन्हेगारी इतिहासाची त्यांच्याकडे असणाऱ्या नोंदी अपुऱ्या आहे. याशिवाय युनायटेड स्टेट्समध्ये व्हिसा ओव्हरस्टेचे उच्च दर आहेत.”
“अमेरिकेत प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची सुरक्षितपणे आणि विश्वासार्हतेने तपासणी तसेच छाननी करता येणार नाही अशा कोणत्याही देशातून आपण खुले स्थलांतर करू शकत नाही,” असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
सोमालियाकडून तत्काळ प्रतिसाद
“सोमालिया अमेरिकेशी असलेल्या आपल्या दीर्घकालीन संबंधांना महत्त्व देतो आणि उपस्थित केलेल्या चिंता दूर करण्यासाठी संवाद साधण्यास तयार आहे,” असे अमेरिकेतील सोमाली राजदूत दाहिर हसन अब्दी यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
आपल्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी सात बहुसंख्याक मुस्लिम देशांमधील प्रवाशांवर बंदी घालण्याची घोषणा केली होती, हे धोरणे 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवण्यापूर्वी त्यावर अनेकदा पुनरावलोकन करण्यात आले होते.
ट्रम्प यांच्यानंतर सत्तेवर आलेले डेमोक्रॅट माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 2021 मध्ये ही बंदी रद्द केली आणि ती “आपल्या राष्ट्रीय विवेकावर डाग” असल्याचे म्हटले.
इमिग्रेशन क्रॅकडाउनचा भाग
ट्रम्प यांचे हे आदेश म्हणजे त्यांनी दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला सुरू केलेल्या इमिग्रेशन क्रॅकडाउनचा एक भाग आहे. गाझा पट्टी, लिबिया, सोमालिया, सीरिया, येमेन आणि “आपल्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या इतर कोणत्याही ठिकाणच्या लोकांवर” निर्बंध घालण्याचे वचन देत, ऑक्टोबर 2023 च्या भाषणात त्यांनी आपली योजना जाहीर केली होती.
ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी एक कार्यकारी आदेश जारी केला ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे धोके शोधण्यासाठी अमेरिकेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही परदेशी नागरिकांची सुरक्षा तपासणी अधिक कडक पद्धतीने करणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते. त्या आदेशाने अनेक कॅबिनेट सदस्यांना अशा देशांची यादी सादर करण्याचे निर्देश दिले ज्यांचा प्रवास अंशतः किंवा पूर्णपणे स्थगित केला जावा कारण त्यांची “छाननी आणि तपासाची माहिती खूप कमी आहे.”
ट्रम्प प्रशासन डझनभर देशांमधील नागरिकांवर प्रवास निर्बंध घालण्याचा विचार करत असल्याचे वृत्त रॉयटर्सने मार्चमध्येच दिले होते.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)