ट्रम्प-मस्क वाद सुरू असताना, व्हाईट हाऊसकडून SpaceX करारांची तपासणी

0

या महिन्याच्या सुरुवातीला, व्हाईट हाऊसने संरक्षण विभाग आणि NASA ला, SpaceX सोबत केलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या करारांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले, अशी माहिती या प्रकरणाशी परिचित असलेल्या चार सूत्रांनी दिली आहे. हा निर्णय, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश एलॉन मस्क यांच्यातील वाढत्या सार्वजनिक वादाच्या पार्श्वभूमीवर घेतला गेला आहे.

या वादामुळे सुरू झालेल्या एका तपासाअंतर्गत, प्रशासनाने संबंधित संस्था आणि विभागांना मस्क यांचे करार बारकाईने तपासण्यास सांगितले आहे, जेणेकरून त्यांच्या कंपन्यांवर संभाव्य कारवाई करण्यासाठी प्रशासन तयार राहू शकेल. गुरुवारी मिळालेल्या माहितीनुसार, मस्क यांच्या SpaceX या अंतराळ उपग्रह निर्मिती कंपनीची भूमिका, अमेरिकेच्या नवीन क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीतून कमी केली जावी का, यावर पेंटागॉनचे अधिकारी सध्या विचार करत आहेत.

अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की, व्हाईट हाऊस SpaceX ला मिळालेल्या सुमारे $22 अब्ज (अमेरिकन डॉलर) इतक्या शासकीय करारांपैकी कोणताही रद्द करण्याचा विचार करत आहे का. परंतु हा तपास दाखवतो की ट्रम्प प्रशासन मस्क यांच्याशी झालेल्या वादादरम्यान ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीप्रमाणे मस्क यांच्या कंपन्यांशी असलेले व्यवहार आणि अनुदाने रद्द करण्याचा विचार करत आहे. “आम्ही सर्व गोष्टींची तपासणी करू,” असे ट्रम्प यांनी 6 जून रोजी, पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कठोर पुनरावलोकन प्रक्रिया

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने, मस्क यांच्या व्यवसायांबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यास नकार दिला, परंतु त्यांनी एवढे सांगितले की “ट्रम्प प्रशासन सर्व निविदा व करारांवर कडक पुनरावलोकन प्रक्रिया राबवत आहे.” NASA च्या प्रवक्त्याने एका स्वतंत्र निवेदनात सांगितले की, “अंतराळाशी संबंधित अध्यक्षांच्या उद्दिष्टांची पूर्तता व्हावी यासाठी आम्ही आमच्या उद्योग भागीदारांबरोबर काम करत राहू.”

SpaceX किंवा संरक्षण विभागातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी या विषयावर भाष्य करण्यास प्रतिसाद दिला नाही.

संबंधित सूत्रांनी सांगितले की, “या करारांची तपासणी, प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याची क्षमता मिळावी या दृष्टीने केली जात आहे, जर डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांच्याविरोधात काही निर्णय घ्यायचा ठरवला तर..” मस्क हे अलीकडेपर्यंत ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार होते आणि सरकारी खर्च बचत विभागाचे (Department of Government Efficiency – DOGE) प्रमुख होते. हा तपास “राजकीय अस्त्र” आहे, असे एका सूत्राने म्हटले.

अमेरिकन सरकार, विद्यमान करार कायदेशीरदृष्ट्या किंवा व्यवहार्यदृष्ट्या रद्द करू शकेल का, हे अजून स्पष्ट नाही. मात्र, ही शक्यता प्रशासनातील राजकीय पूर्वग्रह किंवा व्यक्तिगत संताप यामुळे सरकारी निधी, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक हितावर विपरीत परिणाम होऊ शकतो, याबाबत शासनतज्ज्ञांच्या चिंता अधोरेखित करते.

राजकीय तपासणी

“मस्क यांच्या करारांवर आता तशीच राजकीय, व्यक्तिनिष्ठ तपासणी होऊ शकते, जशी त्यांनी आणि त्यांच्या DOGE टीमने हजारो इतर करारांवर लादली होती – ही बाब विरोधाभासी आहे,” असे वॉशिंग्टनस्थित Project on Government Oversight या देखरेख संस्थेचे करार तज्ज्ञ आणि महावकील स्कॉट अमे (Scott Amey) यांनी सांगितले.
“कोणताही निर्णय दोन व्यक्तींच्या अहंकारावर आधारित नसून, तो सार्वजनिक आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या सर्वोत्तम हितासाठी असायला हवा,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही वर्षांपासून एलॉन मस्क यांची कंपनी SpaceX ही अमेरिकन सरकारसाठी अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाची भागीदार बनली आहे. त्यांनी उपग्रह आणि इतर अंतराळ मालवाहतूक सुरू केली असून, ट्रम्प यांच्या “Golden Dome” क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीतही SpaceX ला महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

अलीकडच्या काळात मस्क यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर केलेली टीका मागे घेण्याचा प्रयत्न केला आहे. ते ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याची मागणी करत होते आणि त्यांना एका गुन्हेगाराशी (लैंगिक अपराधी) जोडले होते.
या वक्तव्यांमुळे मस्क आणि सरकारमधील तणाव समोर आला, तसेच SpaceX वर सरकार किती अवलंबून आहे हेही अधोरेखित झाले.

आपले मत परत घेण्याआधी, मस्क यांनी SpaceX ची ‘ड्रॅगन’ अंतराळयान प्रणाली बंद करण्याची धमकी दिली होती.
या अंतराळयानाद्वारे – NASA बरोबरच्या अंदाजे $5 अब्ज डॉलरच्या कराराअंतर्गत – आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station) अमेरिकन अंतराळवीरांना नेणे आणि परत आणणे शक्य आहे. सध्या हीच एकमेव अमेरिकी प्रणाली आहे जी ही कामगिरी करू शकते.

SpaceX सध्या National Reconnaissance Office (अमेरिकेची गुप्तचर संस्था) बरोबरच्या एक गुप्त कराराअंतर्गत शेकडो गुप्त उपग्रहांचे जाळे तयार करत आहे. हा करार SpaceX साठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला, ज्याद्वारे कंपनीने अमेरिकी संरक्षण आणि गुप्तचर यंत्रणांशी अधिक दृढ संबंध निर्माण केले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleगलवान संघर्षाची पाच वर्षे : भारताच्या रणनीतिक धाडसाचे प्रत्यंतर
Next articleIndo Defence Expo 2025: संरक्षण क्षेत्राच्या वाढीला KSSL देत आहे चालना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here