युक्रेनमधील युद्ध सुरू ठेवण्यासाठी रशिया वेळेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप करत राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी युद्धाबाबत चर्चा केल्यानंतर पुढच्याच दिवशी बोलताना झेलेन्स्की म्हणाले की, हा संघर्ष वाटाघाटीद्वारे संपवला पाहिजे परंतु त्यासाठी टेबलावर स्पष्ट आणि वास्तववादी प्रस्ताव असले पाहिजेत.
शांतता प्रक्रियेबद्दल फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशी बोलणे झाल्याचे सांगणारे झेलेन्स्की यांनी रशियावर दबाव वाढवण्यासाठी अधिक आंतरराष्ट्रीय निर्बंध घालण्याची मागणीही केली.
“युद्ध आणि कब्जा सुरू ठेवण्यासाठी रशिया वेळेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करत आहे हे स्पष्ट आहे,” असे झेलेन्स्की यांनी टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर लिहिले.
“रशियाने वेगळ्या पद्धतीने वागण्यासाठी दबाव आणणे गरजेचे असून त्यासाठी आम्ही भागीदारांसोबत काम करत आहोत. निर्बंध महत्त्वाचे आहेत आणि युद्धातील गुन्हेगार म्हणून त्यांना अधिक मूर्त करणाऱ्या प्रत्येकाचा मी आभारी आहे.”
ट्रम्प म्हणाले की रशिया आणि युक्रेन ताबडतोब युद्धबंदीसाठी वाटाघाटी सुरू करतील, परंतु क्रेमलिनच्या मते या प्रक्रियेला वेळ लागेल आणि युरोपसोबत हातमिळवणी करत मॉस्कोवर दबाव आणण्याच्या दृष्टीने नवीन निर्बंध लावण्यासाठी आपण त्यांच्या सोबत जाण्यास तयार नसल्याचे संकेत अमेरिकन अध्यक्षांनी दिले आहेत.
ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की त्यांनी ही योजना झेलेन्स्की तसेच युरोपियन युनियन, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि फिनलंडच्या नेत्यांसोबत झालेल्या एका ग्रुप कॉलमध्ये सांगितली आहे.
“आम्हाला यात काही शंका नाही की युद्ध वाटाघाटीच्या टेबलावरच संपले पाहिजे,” झेलेन्स्की टेलिग्रामवर म्हणाले.
“टेबलवर स्पष्ट आणि वास्तववादी प्रस्ताव असले पाहिजेत. युक्रेन कोणत्याही प्रभावी वाटाघाटीच्या स्वरूपासाठी तयार आहे. आणि जर रशिया अवास्तव अटी मांडत राहिला आणि संभाव्य निकालांना कमकुवत करत राहिला तर त्याचे कठोर परिणाम भोगावे लागतील.”
पुतीन, ज्यांचे सैन्य युक्रेनच्या एक पंचमांश भागावर नियंत्रण मिळवत आगेकूच करत आहे, ते युद्ध संपवण्याच्या त्यांच्या अटींवर ठाम राहिले आहेते. रशियाने दावा केलेल्या चार युक्रेनियन प्रदेशांमधून युक्रेनचे सैन्य मागे घेण्याचा त्यांचा आग्रह आहे.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)