‘समुद्र पहेरेदार’: सागरी प्रदूषणाबाबत ‘आसियान’शी सहकार्य
दि. २६ मार्च: सागरी प्रदूषणाबाबत आग्नेय आशियायी देशांशी (आसियान) सहकार्य करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून भारतीय तटरक्षक दलाचे ‘आयसीजीएस समुद्र पहेरेदार’ हे सागरी प्रदूषण नियंत्रक जहाज फिलिपिन्समधील मनीला बे येथे दाखल झाले आहे. आसियान भागातील सागरी प्रदूषण रोखण्यासाठी या देशांबरोबर एकत्र प्रयत्न करणे व भारतीय तटरक्षक दलाची सागरी प्रदूषणाचा सामना करण्याची क्षमता दर्शविणे हा या मागचा उद्देश आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे.
आग्नेय आशियायी देश वाढत्या सागरी प्रदूषणाचा सामना करीत आहेत. त्यांना हे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य करण्याच्या उद्देशाने भारताने या देशांना भेटी देऊन त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी हा प्रकल्प सुरु केला होता. या अंतर्गत ‘आयसीजीएस समुद्र पहेरेदार’ हे सागरी प्रदूषण नियंत्रक जहाज फिलिपिन्समधील मनीला बे येथे दाखल झाले आहे. ‘आयसीजीएस समुद्र पहेरेदार’ २५ मार्च ते १२ एप्रिलदरम्यान फिलिपिन्सबरोबरच, हो ची मिन्ह (व्हिएतनाम) व मुआरा (ब्रुनेई) या देशानाही भेट देणार आहे. गेल्या वर्षी या उपक्रमांतर्गत तटरक्षकदलाच्या या जहाजाने आसियान भागातील कंबोडिया, मलेशिया, सिंगापूर, थायलंड व इंडोनेशियाला भेट दिली होती. या जहाजावर प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक विशेष उपकरणे बसविली असून, एक चेतक हेलिकॉप्टरही जहाजावर तैनात करण्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण, तेलगळती रोखणे व त्यामुळे झालेले प्रदूषण नियंत्रणात आणणे, ही कामे या जहाजाच्यामाध्यमातून करण्यात येतात. या भेटीदरम्यान संबंधित देशांच्या तटरक्षकदलाला प्रदूषण नियंत्रणाचे प्रशिक्षण, विविध उपकरणांचे प्रात्यक्षिक व प्रदर्शन या जहाजाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या भेटीमुळे फिलिपिन्स व व्हिएतनामचे तटरक्षकदल व ब्रुनेईचे सागरी संस्था यांच्याबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्यास मदत होणार आहे. भारताच्या तटरक्षकदलाने सागरी सुरक्षा आणि सागरी सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने फिलिपिन्स व व्हिएतनामच्या तटरक्षकदलाशी परस्पर सहकार्य करारही केला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सागरी पर्यावरणरक्षण व सुरक्षेबाबत भारतीय तटरक्षकदलाचे घनिष्ट संबंध निर्माण झाले आहेत. या भेटीतही व्यावसायिक माहितीचे आदानप्रदान, उभय देशांच्या जहाजांना भेटी, संयुक्त कवायती, क्षमतावृद्धी कार्यक्रम आदी बाबींचा समावेश आहे. त्याचबरोबर सरकारच्या ‘पुनीत सागर अभियानां’तर्गत राष्ट्रीय छात्रसेनेचे (एनसीसी) २५ छात्रही या मोहिमेत सहभागी झाले आहेत. त्यांना या निमित्ताने सहभागी देशांबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य व समन्वय कसा राखला जातो, याचे प्रशिक्षण मिळणार आहे. या मोहिमेत तटरक्षकदलाबरोबरच, सहभागी संस्थांचे स्वयंसेवक, भारताचे स्थानिक दूतावास व उच्चायोगातील कर्मचारी, स्थानिक युवक संघटना किनारपट्टी स्वच्छता व इतर प्रदूषण नियंत्रक बाबीत सहभागी होणार आहेत.
‘आयसीजीएस समुद्र पहेरेदार’बद्दल थोडेसे
‘आयसीजीएस समुद्र पहेरेदार’ हे तटरक्षकदलाचे जहाज भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील विशाखापट्टणम येथे तैनात असते. तटरक्षकदलाचे उपमहानिरीक्षक सुधीर रवीन्द्रन हे या जहाजाचे नेतृत्त्व करतात. आपल्या कार्यकाळात ‘आयसीजीएस समुद्र पहेरेदार’ ने सागरी प्रदूषण नियंत्रण, आंतरराष्ट्रीय सागरी सीमा व विशेष आर्थिक क्षेत्राची टेहेळणी, सागरी शोध व बचावकार्य, अशा तटरक्षकदलाच्या विविध मोहिमांत सहभाग नोंदविला आहे.
विनय चाटी
स्त्रोत: पीआयबी