मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याचे अमेरिकेकडून प्रत्यार्पण केल्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले आहे.
राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि रिसर्च अँड ॲनालिसिस विंगच्या (आरएडब्ल्यू) चमूसमवेत पाकिस्तानी वंशाच्या कॅनडियन नागरिक असलेल्या राणाला संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नवी दिल्लीत आणण्यात आले. तिथे त्याला औपचारिकरित्या अटक करण्यात आली आणि रात्री उशीरा दिल्लीच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
रोमानिया मार्गे अमेरिकेतून दिल्लीत आणले
तपासाचे नेतृत्व करणाऱ्या एनआयएने प्रत्यार्पणाचे वर्णन अनेक वर्षांपासूनच्या सातत्यपूर्ण आणि एकत्रित प्रयत्नांचा परिणाम असे केले आहे.
चार्टर्ड गल्फस्ट्रीम जी550 व्यावसायिक विमानाने राणाला भारतात आणण्यात आले. कडक सुरक्षेमध्ये नवी दिल्लीत पोहोचण्यापूर्वी मियामीहून रोमानियाच्या बुखारेस्ट येथे काही काळ विमान थांबून नंतर पुढे रवाना झाले.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान बुधवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 2.15 वाजता मियामीहून निघाले. ते संध्याकाळी बुखारेस्ट येथे उतरले आणि तेथे सुमारे 11 तास थांबल्यानंतर गुरुवारी पहाटे विमानाचा पुन्हा प्रवास सुरू झाला आणि अखेरीस संध्याकाळी ते दिल्लीला पोहोचले.
लांब पल्ला गाठण्याची क्षमता आणि किमान प्रवासी नेण्यासाठी ओळखले जाणारे हे विमान सुरक्षित आणि कार्यक्षम हस्तांतरण सुनिश्चित करण्यासाठी निवडले गेले.
प्रदीर्घ सुरू असणारी प्रत्यार्पण प्रक्रिया
राणाचे प्रत्यार्पण अमेरिकेच्या न्यायालयातील प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर झाले आहे. कॅलिफोर्नियाच्या मध्यवर्ती जिल्ह्याच्या जिल्हा न्यायालयाने 16 मे 2023 रोजी त्याच्या प्रत्यार्पणास मान्यता दिल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली. राणाने या निर्णयाला अनेक वेळा आव्हान दिले-प्रथम नवव्या सर्किट कोर्ट ऑफ अपील्समध्ये आणि नंतर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात विविध याचिकांद्वारे – मात्र अखेरीस त्या सर्व फेटाळण्यात आल्या.
त्याचे अंतिम अपील, सर्वोच्च न्यायालयासमोर प्रमाणपत्र आणि आपत्कालीन अर्जाचे रिट, 4 एप्रिल 2025 रोजी फेटाळण्यात आले. अमेरिकेच्या राज्य सचिवांनी 11 फेब्रुवारी 2025 रोजी शरणागतीच्या वॉरंटवर स्वाक्षरी केली, ज्यामुळे हस्तांतरण प्रक्रिया पुढे जाऊ शकली.
खटला चालवणारे पथक तैनात
तहव्वुर राणाला आता भारतात खटल्याला सामोरे जावे लागेल. ज्येष्ठ वकील दयान कृष्णन हे फिर्यादीचे नेतृत्व करतील. कृष्णन यांनी यापूर्वी अमेरिकेच्या न्यायालयीन कामकाजात भारताचे प्रतिनिधित्व केले होते आणि शिकागोमध्ये डेव्हिड हेडलीची चौकशी करणाऱ्या एनआयएच्या चमूचाही ते भाग होते.
केंद्रीय गृह मंत्रालयाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील नरेंदर मान, संजीवी शेषाद्री आणि श्रीधर काळे हे त्यांच्यासोबत असतील. तर राणाची बाजू दिल्ली विधी सेवा प्राधिकरणाने नियुक्त केलेले वकील पियुष सचदेवा मांडतील.
तहव्वूर राणावरील आरोप
2008च्या हल्ल्यांच्या कटात डेव्हिड कोलमन हेडलीला सहकार्य केल्याचा आरोप तहव्वुर राणावर आहे. सध्या 35 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या अमेरिकी नागरिक असलेल्या हेडलीने राणाच्या पाठिंब्याने आणि संसाधनांसह हल्ल्यांपूर्वी मुंबईत अनेक हेरगिरी मोहिमा राबवल्या.
एनआयएच्या दाव्यानुसार, राणाच्या शिकागो स्थित इमिग्रेशन सर्व्हिसेस फर्मचा वापर लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) अतिरेक्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या कारवाया सुलभ करण्यासाठी केला जात होता.
सुमारे 60 तास चाललेल्या 26/11 च्या हल्ल्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणांना लक्ष्य केले आणि परिणामी 166 लोकांचा मृत्यू झाला, तर 238 जण जखमी झाले.
पाकिस्तानची भूमिका
प्रत्यार्पण प्रक्रियेदरम्यान पाकिस्तानने अधिकृतपणे राणापासून अंतर राखले. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की राणाने 20 वर्षांहून अधिक काळ कोणत्याही पाकिस्तानी कागदपत्रांचे नूतनीकरण केले नाही आणि तो कॅनडाचा नागरिक असण्यावर जोर दिला. पाकिस्तानने कॅनडासोबत दुहेरी नागरिकत्वाला परवानगी दिल्यानंतर हे घडले.
या प्रकरणाच्या संदर्भात पाकिस्तानला पाठवलेल्या विनंती पत्रावरील प्रतिसादाची भारत अजूनही वाट पाहत आहे.
पुढील हालचाली
राणाचे प्रकरण दिल्लीतील विशेष न्यायालयात पुढे जाईल या गोष्टीला एनआयएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला. एजन्सीने त्याच्यावर गुन्हेगारी कट, हत्या आणि भारताविरुद्ध युद्ध पुकारणे यासह अनेक गुन्ह्यांचा आरोप ठेवला आहे. त्याला भारतात आणल्याने 2008 च्या हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणीच्या पुढील तपासात मदत होईल अशी अपेक्षा आहे.
2011 मध्ये, अमेरिकेने अधिकारक्षेत्रातील मर्यादांमुळे राणाला हल्ल्यांमध्ये थेट सहभाग असल्याच्या आरोपातून मुक्त केले. परंतु भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हेडलीच्या मोहिमांना मदत करण्याच्या त्याच्या भूमिकेवर भारतीय कायद्यानुसार खटला चालवला जाऊ शकतो.
हुमा सिद्दीकी