Wednesday, March 4, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा हाहाकार; 600 ठार, 1500 जखमी

अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा हाहाकार; 600 ठार, 1500 जखमी

0

सोमवारी, अफगाणिस्तानमधील एका विनाशकारी आणि देशातील सर्वात प्राणघातक भूकंपात, 600 हून अधिक लोक ठार झाले असून, 1,500 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती, अधिकाऱ्यांनी दिली. ढिगाऱ्याखालून वाचवण्यात आलेल्या लोकांना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात नेण्यात आले.

अचानक आलेल्या या आपत्तीमुळे दक्षिण आशियाई राष्ट्राच्या संसाधनांवर आणखी ताण येणार आहे, कारण अफगाणिस्तानमध्ये आधीच मदत निधीत मोठी घट झाली असून, शेजारील देशांमधून अफगाणी नागरिकांना परत पाठवल्यामुळे मानवी संकट निर्माण झाले आहे.

तालिबान-प्रशासित अफगाण गृहमंत्रालयाने सांगितले की, “6 रिश्टर स्केलच्या या भूकंपात पूर्वेकडील कुनार आणि नांगरहार प्रांतांमध्ये किमान 622 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1,500 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत आणि अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.”

मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल मतीन कानी यांनी रॉयटर्सला सांगितले की, “आमच्या सर्व टीम्सना मदतकार्यासाठी तात्काळ एकत्रित केले गेले आहे, जेणेकरून सर्वसमावेशक आणि आवश्यक तेवढी मदत पुरवली जाऊ शकेल.” यामध्ये सुरक्षा, अन्न आणि आरोग्य क्षेत्रातील मदतीता समावेळ असल्याचे त्यांनी सांगितले.

राजधानी काबुलमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, “बचावकार्य सुरू असून, भूकंप व पुरांच्या इतिहास असलेल्या दुर्गम खेड्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

2022 नंतरचा सर्वात प्राणघातक भूकंप

जून 2022 नंतरचा, अफगाणिस्तानमधील हा सर्वात प्राणघातक भूकंप आहे. 2022 मध्ये आलेल्या 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपात किमान 1,000 लोक ठार झाले होते.

रॉयटर्स टेलिव्हिजनच्या प्रतिमांमध्ये, भूकंपग्रस्त लोकांना हेलिकॉप्टरने घेऊन जात असल्याचे दिसून आले, तर स्थानिक रहिवासी, सैनिक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जखमींना रुग्णवाहिकेपर्यंत पोहचवत असल्याचे दिसले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या भूकंपाने कुनारमधील तीन गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत आणि इतर अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. कुनारमध्ये किमान 610 लोक ठार झाले, तर नांगरहारमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला.”

बचावकर्ते, पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रदेशाला लागून असलेल्या भागात वाचलेल्या लोकांना शोधण्यासाठी धडपडत होते. मध्यरात्री आलेल्या आणि 10 किमी (6 मैल) अंतरावर पसरलेल्या या भूकंपामुळे, चिखल आणि दगडांनी बनलेली घरे पूर्णत: जमीनदोस्त झाली आहेत.

संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले की, “लष्करी बचाव पथके दोन्ही प्रांतांमध्ये पसरली आहेत. 40 उड्डाणांनी 420 जखमी आणि मृतांना बाहेर काढले.”

परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आतापर्यंत, कोणत्याही परदेशी सरकारने बचाव किंवा मदत कार्यासाठी सहकार्य देण्यास संपर्क साधलेला नाही.”

अफगाणिस्तानमध्ये- विशेषतः हिंदू कुश पर्वतरांगेत, जेथे भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्स (Indian and Eurasian tectonic plates) एकत्र येतात, तेथे प्राणघातक भूकंप होण्याची शक्यता जास्त असते.

गेल्यावर्षी त्याच्या पश्चिमेकडे आलेल्या भूकंपांच्या मालिकेत 1,000 हून अधिक लोक मारले गेले होते. त्यानंतर आलेल्या या भीषण भूकंपाच्या पार्श्वभूमीवर, जगातील सर्वात गरीब देशांपैकी एकाची नैसर्गिक आपत्तींप्रतिची असुरक्षितता दिसून आली.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleSCO Summit: टॅरिफ तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी–पुतिन यांच्यात चर्चा
Next articleIndia, U.S. Kick Off Largest-Ever Army Exercise in Alaska Amid Rising Tariff Tensions

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here