यंत्र इंडिया लिमिटेडला ‘मिनीरत्न’ श्रेणी-I दर्जा देण्यास संरक्षणमंत्र्यांची मंजुरी

0
मिनीरत्न
 यंत्र इंडिया लिमिटेडला (YIL)  मिनीरत्न श्रेणीचा दर्जा मिळाला आहे 

सरकारने यंत्र इंडिया लिमिटेड (YIL) या कंपनीला मिनीरत्न श्रेणी-I चा दर्जा दिला आहे. स्थापनेपासून अवघ्या चार वर्षांच्या कालावधीत सरकारी संस्था ते नफा कमावणारी कंपनी अशी वाटचाल करणाऱ्या  संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील या उपक्रमाचे (DPSU) उन्नयन झाले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या निर्णयाला मंजुरी दिली, आणि YIL च्या नफा कमावणाऱ्या तसेच कामगिरीवर आधारित कंपनीमध्ये झालेल्या जलद परिवर्तनाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, हा निर्णय कंपनीच्या व्यवस्थापनावरील आणि मिनीरत्न दर्जासाठी आवश्यक असलेले आर्थिक तसेच कार्यात्मक निकष पूर्ण करण्याच्या तिच्या क्षमतेवरील विश्वास दर्शवतो.

सिंह यांनी नमूद केले की, YIL ची प्रगती भारताचा संरक्षण उत्पादन आधार आधुनिक बनवणे, स्वदेशीकरणाला चालना देणे आणि देशांतर्गत उत्पादन वाढवणे या सरकारच्या प्रयत्नांशी सुसंगत आहे.

स्थापनेपासूनच यंत्र इंडियाने व्यवसायात जोरदार वाढ नोंदवली आहे. 2021-22 च्या उत्तरार्धात 956.32 कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 3 हजार 108.79 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. कंपनीने निर्यातीच्या क्षेत्रातही स्पष्टपणे प्रवेश केला आहे. 2021-22 च्या उत्तरार्धात शून्य परदेशी विक्रीवरून, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये निर्यात 321.77 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

यंत्र इंडिया लिमिटेडच्या प्रमुख उत्पादनांमध्ये कार्बन फायबर कंपोझिट्स, मध्यम आणि मोठ्या कॅलिबर दारूगोळ्यासाठी असेंब्ली उत्पादने, आर्मर्ड वाहनांसाठी असेंब्ली उत्पादने, तोफखाना आणि मुख्य युद्ध रणगाडे (MBTs) साठी असेंब्ली उत्पादने, ग्लास कंपोझिट्स, ऍल्युमिनिअम मिश्र धातू इत्यादींचा समावेश आहे.

मिनीरत्न (श्रेणी-I) दर्जा मिळाल्यामुळे यंत्र इंडिया लिमिटेडच्या मंडळाला सरकारी मंजुरीशिवाय नवीन प्रकल्प, आधुनिकीकरण, उपकरणे खरेदी, इत्यादींवर 500 कोटी रुपयांपर्यंत भांडवली खर्च करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. यामुळे कंपनीला वेगवान विकास आणि संरक्षण उत्पादन तसेच निर्यातीत नवीन उंची गाठण्यास अधिक मदत होईल.

संरक्षण उत्पादन क्षेत्रात कार्यात्मक स्वायत्तता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि नवोन्मेष व विकासाला चालना देण्यासाठी सरकारने 1, ऑक्टोबर 2021 रोजी पूर्वीच्या आयुध कारखाना मंडळाचे (ओएफबी) सात नवीन डीपीएसयूमध्ये  कॉर्पोरेटायझेशन केले होते. यंत्र इंडिया लिमिटेड ही संरक्षण उत्पादन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या नव्याने तयार केलेल्या अनुसूची ‘अ’ डीपीएसयूपैकी एक आहे.

मे  2025 मध्ये, संरक्षण मंत्र्यांनी सात डीपीएसयूपैकी तीन – म्युनिशन्स इंडिया लिमिटेड, आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड आणि इंडिया ऑप्टेल लिमिटेड यांना मिनीरत्न–I दर्जा देण्यास मान्यता दिली होती.

हा निर्णय आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाप्रति  सरकारची निरंतर  वचनबद्धता अधोरेखित करतो, ज्यामध्ये संरक्षण उत्पादन, संशोधन आणि धोरणात्मक तंत्रज्ञानात स्वदेशी क्षमता निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. हे व्यापक संरक्षण सुधारणांच्या अनुरूप असून आयात अवलंबित्व कमी करणे, देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन देणे, भारतीय उद्योगाच्या सहभागाला प्रोत्साहन देणे आणि भारताला जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून स्थान देणे हा उद्देश आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleCDS जनरल अनिल चौहान यांची आर्मेनियाला भेट
Next articleसिंगापूर एअर शो 2026: IAF कडून सारंग हेलिकॉप्टर टीम सहभागी होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here