काही मुद्द्यांवरून HAL आणि IAF मध्ये मतभेद; LAC Mk1A चे वितरण लांबले

0
HAL

IAF अर्थात भारतीय हवाई दलात लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस Mk1A च्या समावेशाला झालेल्या प्रदीर्घ विलंबानंतर आता पुन्हा एकदा नवीन अनिश्चितता निर्माण झाली आहे. लढाऊ विमानांची पहिली तुकडी खरोखरच वितरणासाठी तयार आहे की नाही, यावरून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि भारतीय हवाई दल यांच्यात तीव्र मतभेद असल्याचे समोर आले आहेत.

तेजस Mk1A विमानांचा पहिला संच मुळात मार्च 2024 मध्ये भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केला जाणार होता, परंतु आता दोन वर्षांहून अधिक काळ हे वितरण लांबले आहे. या आठवड्यात HAL ने पाच विमाने वितरणासाठी ‘पूर्णपणे तयार’ असल्याचा दावा केला असला तरी, हवाई दलाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, ही विमाने सेवेत दाखल होण्यापूर्वी करावी लागणारी अनेक महत्त्वपूर्ण पावले अद्याप अपूर्ण आहेत.

HAL ने गुरुवारी जारी केलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, पाच तेजस Mk1A लढाऊ विमानांची निर्मिती, करार नमूद केलेल्या प्रमुख क्षमतांसह करण्यात आली आहे आणि ती सामील होण्यासाठी तयार आहेत. तसेच, आणखी नऊ विमानांची तयारी झाली असून, अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिककडून इंजिन मिळाल्यानंतर ती तयार केली जातील. कंपनीने या विलंबाचे मुख्य कारण F404-IN20 इंजिनच्या पुरवठ्यातील व्यत्यय असल्याचे सांगितले, परंतु आता इंजिन पुरवठ्याबाबतचा दृष्टिकोन ‘सकारात्मक’ असून तो चालू आर्थिक वर्षासाठीच्या वितरण योजनांशी सुसंगत असल्याचा दावाही केला.

मात्र, IAFचे म्हणणे वेगळेच आहे.

हवाई दलाच्या सूत्रांनुसार, HAL ने अद्याप विमानांसाठी औपचारिक वितरण ऑफर दिलेली नाही, ही एक प्रक्रियात्मक पायरी आहे जी प्रमाणन आणि स्वीकृती चाचण्यांपूर्वी आवश्यक असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, IAF चा आग्रह आहे की लढाऊ विमाने एअर स्टाफ क्वालिटी रिक्वायरमेंट्स (ASQR) प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच ही विमाने सामील केली जातील. या प्रक्रियेत व्यापक चाचणी आणि प्रमाणन समाविष्ट आहे. त्यामुळे परिचालन मानकांशी तडजोड केल्याशिवाय ते एकत्रित केले जाऊ शकत नाही.

“अजूनही काही काम प्रलंबित आहे,” असे IAF च्या सूत्राने सांगितले. शस्त्रास्त्र चाचण्या पूर्ण झाल्या असतील आणि रडार एकात्मिक केले गेले असले, तरीही संपूर्ण सिस्टम-लेव्हल इंटिग्रेशन अपूर्ण राहिले आहे. “रडार इतर सर्व सिस्टीमशी समन्वित असले पाहिजे, ते केवळ शस्त्रे सोडण्यास सक्षम असून चालणार नाही,” असे सूत्राने सांगितले. एकात्मतेचे मूल्यांकन वैयक्तिक उपप्रणालींच्या चेकलिस्टऐवजी समग्र लढाऊ क्षमता म्हणून केले जाते, हे देखील त्याने अधोरेखित करून सांगितले.

भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी यावरही जोर दिला की, या विमानांना अद्याप ‘सेंटर फॉर मिलिट्री एअरवर्थिनेस अँड सर्टिफिकेशन’ (CEMILAC) कडून प्रमाणपत्र मिळालेले नाही, जी कोणत्याही लढाऊ विमानाला स्क्वाड्रन सेवेत सामील करण्यापूर्वी एक अनिवार्य अट आहे. CEMILAC च्या मंजुरीशिवाय, हवाई दल विमानांच्या समावेश किंवा स्वीकृती चाचण्या सुरू करू शकत नाही, ज्या पूर्ण होण्यासाठीच कित्येक महिन्यांचा कालावधी लागतो.

“HALने अद्याप भारतीय हवाई दलाला समावेश चाचणीबद्दल सूचित केलेले नाही,” असे एका सूत्राने सांगितले, आणि ASQR-संबंधित चाचण्या वेळखाऊ आणि अनिवार्य असतात याकडे लक्ष वेधले. “ASQR च्या मंजुरीशिवाय, हवाई दल ही विमाने चालवू शकत नाही.”

खरंतर या भूमिकांमधील मतभेद नवीन नाहीत.

फेब्रुवारी 2021 मध्ये 83 तेजस Mk1A विमानांसाठी 48 हजार कोटी रुपयांचा करार झाल्यापासून, HAL ने अनेक वेळा वितरणाच्या वेळा दिल्या आहेत, ज्या आजपर्यंत पाळल्या गेलेल्या नाहीत, आणि प्रत्येक वेळी विलंबाचे कारण जीई कंपनीकडून इंजिन पुरवठ्यातील उशीर असल्याचे सांगितले आहे.

HAL चा दावा आहे की डिझाइन आणि विकासाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात आले असले तरी, विमान शक्य तितक्या लवकर वितरित करण्यासाठी भारतीय हवाई दलासोबत त्यांची चर्चा सुरू आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की सध्या 15 विमाने तयार असून इंजिनचा पुरवठा स्थिर झाल्यावर वर्षाच्या अखेरीस सुमारे 20 विमाने उपलब्ध करून देण्याची योजना आहे.

लढाऊ स्क्वाड्रनच्या तीव्र कमतरतेचा सामना करत असलेल्या हवाई दलाला, तरीही अपूर्ण किंवा तात्पुरत्या स्वरूपातील विमाने स्वीकारायची नाहीत. संरक्षण सूत्रांनी सांगितले की, स्वीकृतीच्या वेळापत्रकावर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, भारतीय हवाई दल मे महिन्यात LCA Mk1A कार्यक्रमाचा सर्वसमावेशक आढावा घेण्याची योजना आखत आहे, यापूर्वी डिसेंबरमध्ये एक मूल्यांकन करण्यात आले होते. बहुतेक प्रमुख विमान कार्यक्रम एप्रिल 2026 पर्यंत महत्त्वाचे टप्पे गाठतील अशी अपेक्षा आहे आणि Mk1A चा आढावा त्या व्यापक संदर्भात घेतला जाईल.

“त्यानंतरच वितरणाची अंतिम मुदत निश्चित केली जाईल,” असे एका संरक्षण सूत्राने सांगितले.

दोन्ही बाजूंसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे.

IAF ने दोन टप्प्यांत 180 LCA Mk1A लढाऊ विमानांची ऑर्डर दिली आहे. ही विमाने जुन्या मिग-21 प्रकारच्या विमानांची जागा घेतील आणि स्क्वाड्रनच्या सामर्थ्यात होणारी सातत्यपूर्ण घट थांबवतील. Mk1A मध्ये अधिक स्वदेशी घटक आणि उत्तम एईएसए रडार, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि श्रेणीसुधारित एव्हियोनिक्स यांसारख्या प्रणालींचा समावेश आहे. जोपर्यंत LCA Mk2 आणि ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) सारखी अधिक प्रगत विमाने सेवेत येत नाहीत, तोपर्यंत हा एक महत्त्वाचा तात्काळ उपाय म्हणून पाहिला जात आहे, कारण ती विमाने सेवेत येण्यास अजून बराच वेळ आहे.

HAL साठी हा कार्यक्रम त्यांच्या लढाऊ विमानांच्या आराखड्याचा केंद्रबिंदू आहे. आता बंगळूरमधील दोन असेंब्ली लाईन्स आणि नाशिकमधील तिसऱ्या लाईनवर याचे उत्पादन सुरू आहे, जिथे गेल्या ऑक्टोबरमध्ये Mk1A प्रोटोटाइपचे पहिले उड्डाण झाले. ही कंपनी LCA Mk2,  कॅट्स वॉरियर लॉयल विंगमॅन कार्यक्रम आणि 2022 नंतरच्या अनेक हेलिकॉप्टर प्रकल्पांसारखे समांतर प्रकल्पही हाताळत आहे, त्याच वेळी AMCA कार्यक्रमातील त्यांची नेमकी काय भूमिका आहे याच्या स्पष्टतेची वाट पाहत आहे.

सध्याच्या परिस्थितीनुसार, तेजस Mk1A हे HALच्या सज्जतेच्या दाव्यामध्ये आणि IAF च्या संपूर्ण प्रमाणीकरण व कार्यान्वित मंजुरीच्या आग्रहामध्ये अडकले आहे.  या दोन्ही भूमिकांमधील फरकामुळे या विमानाचा आघाडीच्या सेवेसाठीचा बहुप्रतिक्षित प्रवेश लांबणीवर पडत चालला आहे.

रवी शंकर/ध्रुव 

+ posts
Previous articleIAF to Stage Major Air Power Exercise Along Pakistan Border on February 27

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here