अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सीबी अनंतकृष्णन यांचा विश्वास
दि. १५ एप्रिल: ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (एचएएल) या सार्वजनिक क्षेत्रातील विमान उत्पादन संस्थेने उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी आणि जागतिक स्तरावर एक निर्यातक्षम संस्था म्हणून स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्याचे दृश्य परिणाम लवकरच समोर येतील. या धोरणात्मक निर्णयामुळेच येत्या काळात ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’कडून (एचएएल) ‘तेजस’ या हलक्या लढाऊ विमानाची निर्यातही शक्य आहे, अशी माहिती ‘एचएएल’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सीबी अनंतकृष्णन यांनी दिली.
‘भारतशक्ती’चे मुख्य संपादक नितीन गोखले यांच्याशी ‘ऑन द शॉप फ्लोअर’ या विशेष मालिकेत बोलताना अनंतकृष्णन म्हणाले, की ‘एचएएल’कडे सध्या खूप महत्त्वाचे काम आहे. त्यात ८३ तेजस मार्क-१ ए ही हलक्या लढाऊ विमाने, ३४ अत्याधुनिक हलकी हेलिकॉप्टर्स, ७० प्रशिक्षण विमाने, तसेच मिग विमानांसाठी वापरण्यात येणाऱ्या आरडी-३३ या प्रकारच्या ८० इंजिनांचा समावेश आहे. त्याचबरोबर सुखोई ३०- एमकेआय या लढाऊ विमानांसाठी वापरण्यात येणाऱ्या २४० नव्या एएल-३१ एचपी इंजिनांचे उत्पादनही कंपनीकडून करण्यात येणार आहे. हे सर्व प्रकल्प येत्या तीन ते चार वर्षात पूर्ण करण्यात येतील असे, अनंतकृष्णन यांनी स्पष्ट केले. ‘एचएएल’च्या बेंगरूलूयेथील ‘तेजस’च्या उत्पादन प्रकल्पात ते गोखले यांच्याशी बोलत होते.
वाढती मागणी
तेजस विमानांची वाढती मागणी पाहता ‘एचएएल’ने आपली वार्षिक उत्पादन क्षमता आठ विमानांवरून सोळा विमाने इतकी केली आहे. बेंगलोर येथील प्रकल्पात या विमानांचे उत्पादन करण्यात येणार आहे. त्यासाठी खाजगी क्षेत्राबरोबरही भागीदारी करण्याचा निर्णय ‘एचएएल’ने घेतला आहे. विमानाचे मागील, पुढील, पंखे व सेन्ट्रल फ्युज अशा सर्व भागांचे सांगाडे खाजगी उत्पादकांकडून करून घेण्यात येतील, असेही तयंनी स्पष्ट केले. ही सोळा विमानाची ऑर्डर वेळेवर अथवा वेळेपूर्वी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यासाठी आम्ही नाशिक येथे नवी असेंब्ली लाईन सुरु केली आहे, असेही त्यांनी सांगितले. नाशिक येथील प्रकल्पात वर्षाला आठ विमानाचे उत्पादन करण्यात येणार असून, या सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान तेथे काम सुरु होईल आणि वर्षाखेरीस तो पूर्ण क्षमतेने सुरु होईल, असे ते म्हणाले. ऑर्डरनुसार आम्ही १६ विमाने उत्पादित करणे अपेक्षित आहे. त्यापैकी सुरुवातीला एक किंवा दोन विमाने नाशिक येथील प्रकल्पातून उत्पादित करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
तेजस मार्क-१ ए ही ८३ हलकी लढाऊ विमाने पुरविण्याची ऑर्डर ‘एचएएल’ला २०२८-२९ पर्यंत पूर्ण करायची आहे. मात्र, ती वेळेपूर्वीच पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. आमची वर्षाला २४ विमाने उत्पादित करण्याची क्षमता आहे. परंतु, मार्क-२ विमाने उत्पादित करण्यासाठी आंम्ही त्याचा वापर करणार आहोत. त्याचबरोबर ९७ अतिरिक्त मार्क-१ ए या विमानाची ऑर्डरही आम्हाला मिळाली आहे, या नव्या सुविधेमुळे ती आम्हाला वेळेत पूर्ण करता येईल, असे अनंतकृष्णन यांनी स्पष्ट केले.
निर्यातसंधी
‘एचएएल’च्या निर्यात धोरणाविषयी बोलताना अनंतकृष्णन म्हणाले, ‘आम्ही आता निर्यातसंधी हुडकण्याकडे जास्त लक्ष पुरवीत आहोत. ‘एचएएल’च्या तेजस या हलक्या लढाऊ विमानाला व सर्वच प्रकारच्या हेलिकॉप्टरना निर्यातीची मोठी संधी आहे. विविध देशांनी त्यांच्या खरेदीत रस दाखविला आहे. अर्जेन्टिना, फिलिपिन्स, इजिप्त, नायजेरिया यांच्यासह पाच ते सहा देशांनी ‘एचएएल’च्या विविध उत्पादनांच्या खरेदीबाबत विचारणा केली आहे. फिलिपिन्सबरोबरची आमची चर्चा बरीच पुढे गेली आहे. इजिप्तबरोबर चर्चा सुरु आहे आणि नायजेरियाबरोबरच्या चर्चेने वेग पकडला आहे. सरकार आणि ‘एचएएल’च्या प्रयत्नामुळे आम्हाला यात यश मिळेल अशी आशा आहे, असे ते म्हणाले. स्वतःचे औद्योगिक पेटंट, संरक्षण सामग्रीच्या उत्पादन क्षेत्रातील खासगी संस्थांबरोबर भागीदारी, भविष्यदर्शी तंत्रज्ञानाच्या संशोधन व विकास या माध्यमातून एक परिपूर्ण तंत्रज्ञान संस्था होण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकारच्या आत्मनिर्भरतेच्या धोरणाला पूरक ठरण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
टीम भारतशक्ती