लेबनॉनमध्ये सशस्त्र गट हिज्बुल्लाह वापरत असलेल्या वॉकीटॉकींचे बुधवारी दक्षिणेकडील भागात एकामागोमाग एक स्फोट झाले. याच्या आदल्याच दिवशी हिजबुल्ला वापरत असलेल्या पेजरचे अशाच प्रकारचे स्फोट झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होताच. सुमारे एक वर्षापूर्वी दहशतवादी आणि इस्रायल यांच्यात सीमेपलीकडील लढाई सुरू झाल्यापासून देशाच्या दृष्टीने कालचा दिवस सर्वात प्राणघातक ठरला.
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की बैरूतच्या उपनगरात आणि बेका खोऱ्यात बुधवारी 20 लोक ठार झाले तर 450हून अधिक जखमी झाले आहेत. त्याआधी मंगळवारी झालेल्या स्फोटांमधील मृतांचा आकडा 12 वर पोहोचला आहे, तर सुमारे 3 हजार जखमी झाले.
इस्रायली अधिकाऱ्यांनी या स्फोटांवर कोणतेही भाष्य केलेले नाही, मात्र इस्रायलची गुप्तहेर संस्था मोसाद याला जबाबदार असल्याचे सुरक्षा सूत्रांनी सांगितले. हिजबुल्लाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की ही घटना गटाच्या इतिहासातील सर्वात मोठा सुरक्षाविषयक नियमांचा भंग आहे.
हिजबुल्लाहला संपूर्णपणे गोंधळात टाकणारे हे ऑपरेशन, गाझामधील इस्रायलच्या 11 महिन्यांच्या युद्धासोबतच पार पाडले गेले. मात्र यानंतर इस्रायल लेबनॉनच्या सीमेवर तणाव आणि प्रादेशिक युद्धाचा धोका वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
“आम्ही युद्धात एक नवीन टप्पा सुरू करत आहोत. त्यासाठी आमच्याकडे धैर्य, दृढनिश्चय आणि चिकाटी आवश्यक आहे,” असे इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी हवाई दलाच्या तळावरून बोलताना सांगितले.
जॉर्डनचे परराष्ट्रमंत्री अयमान सफादी यांनी इस्रायलवर अनेक आघाड्यांवर धोकादायक युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून मध्य पूर्वेला प्रादेशिक युद्धाच्या उंबरठ्यावर ढकलल्याचा आरोप केला.
या स्फोटांमध्ये आपला कोणत्याही प्रकारचा सहभाग नव्हता असे सांगत अमेरिकेने, संघर्षातील वाढ टाळण्यासाठी आपण सखोल मुत्सद्देगिरी करत असल्याचे सांगितले आहे.
अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की इस्रायलने मंगळवारी वॉशिंग्टनला कळवले होते की ते लेबनॉनमध्ये काहीतरी कृती करणार आहे. परंतु इस्रायलने त्याबाबतचा कोणताही तपशील दिलेला नव्हता. त्यामुळे ही कारवाई अमेरिकेसाठी आश्चर्यकारक होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.
अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की इस्रायलने मंगळवारी वॉशिंग्टनला कळवले होते की ते लेबनॉनमध्ये काहीतरी कृती करणार आहे. परंतु इस्रायलने त्याबाबतचा कोणताही तपशील दिलेला नव्हता. त्यामुळे ही कारवाई अमेरिकेसाठी आश्चर्यकारक होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.
लेबनॉनमध्ये बुधवारी झालेल्या स्फोटांपैकी एक स्फोट इराण समर्थित हिजबुल्लाच्या आदल्या दिवशी पेजरस्फोटात ठार झालेल्यांच्या अंत्यविधीजवळ झाला. देशभरात एकामागोमाग एक हिजबुल्ला वापरत असलेल्या हजारो पेजरचा स्फोट झाला आणि त्यांचे अनेक सैनिक जखमी झाले.
रॉयटर्सच्या एका पत्रकाराने सांगितले की वॉकीटॉकींच्या स्फोटानंतर बैरूतच्या दक्षिणेकडील उपनगरातील हिजबुल्लाच्या सदस्यांना स्फोट न झालेल्या वॉकी-टॉकीजमधून बॅटऱ्या बाहेर काढून धातूच्या बॅरेलमध्ये त्या बॅटऱ्यांचे भाग फेकताना पाहिले. मोबाईल फोनवरील इस्रायली पाळत टाळण्याच्या प्रयत्नात हिजबुल्लाह पेजर आणि इतर फारशा प्रगत नसलेल्या संभाषण साधनांकडे वळले होते.
लेबनॉनच्या रेड क्रॉसने एक्सवर सांगितले की लेबनॉनच्या दक्षिणेस आणि बेका खोऱ्यासह विविध भागात झालेल्या अनेक स्फोटांनंतर त्यांच्या 30 रुग्णवाहिका वैद्यकीय पथकांसह घटनास्थळी दाखल झाल्या.
स्फोट झालेल्या वॉकी-टॉकींवर ‘आयसीओएम’ आणि ‘मेड इन जपान’ अशी लेबले होती. त्यांच्या वेबसाइटवरील माहितीनुसार आयसीओएम – जिने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही – ही जपानची रेडिओ कम्युनिकेशन्स आणि टेलिफोन कंपनी आहे.
कंपनीने म्हटले आहे की फोटोंमध्ये जे मॉडेल दिसत आहे ते आयसी-व्ही 82 गटातले उत्पादन असून 2014 मध्ये ते टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले. एका सुरक्षाविषयक स्रोताने सांगितले की, हिज्बुल्लाहने पाच महिन्यांपूर्वी, पेजरच्या खरेदीच्या जवळपासच, हातात पकडून ज्यावर बोलावे लागते अशा वॉकीटॉकी विकत घेतल्या होत्या.
मंगळवारी झालेल्या स्फोटांबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले की, इस्रायली हेरांनी देशात प्रवेश करण्यापूर्वी हिजबुल्लाच्या 5 हजार पेजरवर आदेशानुसार लावलेल्या स्फोटकांचा दूरून स्फोट घडवून आणला.
अरब देशांनी केलेल्या विनंतीनंतर पेजर स्फोटांविषयी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची शुक्रवारी बैठक होणार आहे.
मंगळवारी झालेल्या स्फोटांमध्ये तेहरानचा लेबनॉनमधील राजदूत किरकोळ जखमी झाला, असे इराणच्या फार्स वृत्तसंस्थेने सांगितले. मात्र इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डच्या दोन सदस्यांचा हवाला देत न्यूयॉर्क टाइम्सने बुधवारी सांगितले की, राजदूत घेऊन जात असलेल्या पेजरचा स्फोट झाल्याने त्याने एक डोळा गमावला असून दुसऱ्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. संयुक्त राष्ट्रातील इराणच्या दूताने बुधवारी एका पत्रात म्हटले आहे की, हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आवश्यक मानल्या जाणाऱ्या उपाययोजना करण्याचे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्याने आपले अधिकार राखून ठेवले आहेत.
हिजबुल्लाकडून रॉकेट हल्ले
इस्रायलला प्रत्युत्तर देण्याचे वचन दिलेल्या हिजबुल्लाने बुधवारी सांगितले की, त्यांनी इस्रायली तोफखान्याच्या ठिकाणांवर रॉकेटने हल्ला केला. मंगळवारच्या स्फोटांनंतर इस्रायलवर झालेला हा पहिलाच हल्ला आहे. इस्रायली सैन्याच्या मते या हल्ल्यात कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
बैरूतमधील कार्नेगी मिडल ईस्ट सेंटरमधील संशोधन उपसंचालक मोहनाद हेग अली म्हणाले, “हिजबुल्लाहलाचा कल संपूर्ण युद्ध टाळण्याकडे आहे.” पण हल्ल्यानंतर हिजबुल्लावर अधिक जोमाने प्रत्युत्तर देण्यासाठी दबाव असेल.”
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)
(रॉयटर्स)