शनिवारी, Air India विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा 270 वर पोहोचला आहे. या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह नातेवाईकांना न मिळाल्याने, कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता आणि संताप वाढला आहे. अनेक मृतदेह ओळखू न येण्याइतपत जळून खाक झाले आहेत. 12 जून रोजी, ही दुर्घटना अहमदाबादमध्ये घडली.
बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानात एकूण 242 प्रवासी व कर्मचारी होते. गुरुवारी विमान उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच उंची गमावून खाली कोसळले आणि इमारतींवर आपटताच आगीने भस्मसात झाले. हे अपघाताचे दृश्य इतके भयंकर होते, की गेल्या दहा वर्षांतील सर्वात भीषण विमान अपघात म्हणून त्याची नोंद झाली आहे.
बी. जे. मेडिकल कॉलेजच्या कनिष्ठ डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष- धवल गमेटी यांनी सांगितले की, अपघातस्थळावरून 270 मृतदेह सापडले आहेत.
या दुर्घटनेत केवळ एकच प्रवासी वाचला, तर उर्वरित प्रवासी व कर्मचारी मृत्युमुखी पडले. विमान मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर आदळले, त्यामुळे अनेक जण त्या इमारतीतही मृत्युमुखी पडले.
एअर इंडियावर प्रश्नचिन्ह
ही दुर्घटना, एअर इंडियाच्या कामगिरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे. 2022 मध्ये टाटा समूहाने सरकारकडून एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर, कंपनीची प्रतिमा सुधारण्याचे आणि ताफा अद्ययावत करण्याचे प्रयत्न सुरू होते. पण या अपघाताने हवाई सुरक्षेबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत.
टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणाले की, “आम्हाला हे समजून घ्यायचे आहे की नेमके काय घडले, पण सध्या तरी आम्हाला माहिती नाही.”
भारत सरकार आणि Air India या अपघाताचा अनेक पैलूंवरून तपास करत आहेत – जसे की इंजिन थ्रस्ट, फ्लॅप्स, आणि उड्डाणानंतर लँडिंग गियर उघडे का राहिले याचा शोध घेतला जात आहे, असे रॉयटर्स या वृत्तसंस्थेने नमूद केले आहे.
अहमदाबादमधील हॉस्पिटलबाहेर डझनभर कुटुंबीय, आपल्या आप्तजनांचे मृतदेह मिळावेत म्हणून प्रतीक्षा करत आहेत. डॉक्टर डीएनए आणि दातांचे नमुने गोळा करून ओळख पटवण्याचे काम करत आहेत.
रफीक अब्दुल हफीज मेमन, ज्यांनी या अपघातात चार नातेवाईक गमावले ते म्हणाले की, “आम्हाला काहीच माहिती मिळत नाही आहे. आम्ही अतिशय त्रासात आहोत. आमची मुलं गेली. आम्हाला काहीच समजत नाही. कृपया आम्हाला माहिती द्या. मृतदेह कधी मिळणार, ते सांगा.”
हर्षद पटेल यांचे वडील देखील अस्वस्थ होते. “अधिकाऱ्यांनी सांगितलं की डीएनए प्रोफाइलिंगसाठी 72 तास लागतील. ते मदत करत आहेत, पण आमचे संयम सुटत चालले आहे,” असे ते म्हणाले.
बहुतांश मृतदेह पूर्णतः जळाल्यामुळे ओळख पटवणे कठीण जात आहे. त्यामुळे दात नमुन्यांवरून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
फॉरेन्सिक दंततज्ज्ञ जयशंकर पिल्लई यांनी सांगितले की, “आमच्याकडे 135 मृत व्यक्तींचे दंत नमुने आहेत. पूर्वीच्या दंत नोंदी, रेडिओग्राफ किंवा इतर वैद्यकीय दस्ताऐवजांशी तुलना करून ओळख पटवता येईल.”
(रॉयटर्सच्या माहितीनुसार)