रुग्णालयातील बेडवरून बोलताना, 40 वर्षीय रमेश यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की ते ब्रिटिश नागरिक असून भारतात कुटुंबाला भेटल्यानंतर भावासोबत ब्रिटनला जात होते.
“जेव्हा मी उठलो तेव्हा माझ्याभोवती मृतदेह होते. मी घाबरलो. मी उभा राहिलो आणि पळत सुटलो. माझ्याभोवती विमानाचे तुकडे होते. कोणीतरी मला धरले, रुग्णवाहिकेत बसवले आणि रुग्णालयात नेले,” असे विश्वकुमार यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले.
बोईंग 787–8 ड्रीमलाइनर विमान धडकण्यापूर्वी विश्वकुमार बाहेर उडी मारण्यात यशस्वी झाले होते का याबाबत अद्याप स्पष्टीकरण मिळालेले नाही.
भारतीय वृत्तवाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या सोशल मीडिया फुटेजमध्ये रक्ताने माखलेला पांढरा टी-शर्ट आणि काळी पँट घातलेला एक माणूस रस्त्यावर लंगडत असल्याचे आणि डॉक्टरांकडून मदत मिळत असल्याचे दिसून आले. या माणसाच्या चेहऱ्यावर जखमा होत्या आणि त्याला दाढीही होती. अपघातानंतर स्थानिक माध्यमांनी रुग्णालयात असलेल्या विश्वकुमार यांच्या प्रकाशित केलेल्या छायाचित्रांशी हे वर्णन जुळणारे होते.
रॉयटर्स या व्हिडिओचा खरेपणा त्वरित तपासू शकले नाही. या व्हिडिओमध्ये लोक त्या माणसाभोवती जमले होते आणि त्याला इतर प्रवासी कुठे आहेत असे विचारत होते, ज्यावर त्याने उत्तर दिले, “ते सर्व आत आहेत.”
सीट क्रमांक 11A
हिंदुस्तान टाईम्सने ऑनलाइन दाखवलेल्या विश्वकुमार यांच्या बोर्डिंग पासच्या फोटोनुसार ते गॅटविक विमानतळावर जाणाऱ्या विमानाच्या सीट क्रमांक 11A वर बसले असावेत.
त्यांनी वृत्तपत्राला सांगितले की आपला भाऊ अजय विमानात वेगळ्या रांगेत बसला होता आणि त्याला शोधण्यासाठी आपण मदतीची मागणी केली होती.
“तो आपत्कालीन एक्झिटजवळ होता आणि आपत्कालीन दरवाजातून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाला,” असे अहमदाबादमधील वरिष्ठ पोलिस अधिकारी विधि चौधरी यांनी विश्वकुमारबद्दल बोलताना सांगितले.
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या विश्वकुमार यांच्या कुटुंबातील एका सदस्याने नाव न सांगण्याची विनंती करत, रॉयटर्सला फोनवरून सांगितले की तो वाचला आहे आणि कुटुंब त्याच्या संपर्कात आहे. मात्र यापेक्षा अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
मध्य इंग्लंडमधील लेस्टरमध्ये राहणारे विश्वकुमार यांचे चुलत भाऊ अजय वाल्गी यांनी बीबीसीला सांगितले की, विश्वकुमार यांनी फोनवरून बोलून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. “त्याने फक्त सांगितले की तो ठीक आहे, बाकी काही नाही,” असे वाल्गी म्हणाले.
वाल्गी म्हणाले की, त्यांच्या दुसऱ्या भावाबद्दल आम्हाला अजून काहीही माहिती समजलेली नाही. “आमची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. आम्ही सर्वजण दु:खात आहोत.”
विश्वकुमार विवाहित असून त्यांना एक मुलगा आहे, असेही वाल्गी म्हणाले.
भीषण अपघात
उड्डाणानंतर लगेचच विमानतळाबाहेरील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर हे विमान कोसळले. ही गेल्या दशकातील जगातील सर्वात मोठी विमान वाहतूक दुर्घटना असल्याचे सांगितले जाते.
या अपघातात 240 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नागरी वस्तीतील काही नागरिकांचा समावेश आहे. याआधी जाहीर झालेला मृतांचा 294 हा आकडा चुकीचा असून काही मृतदेहांची दोनदा मोजणी झाल्यामुळे हा प्रकार घडला होता.
टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने एका निवेदनात, विमानातील 242 जणांपैकी 241 जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची पुष्टी केली असून एकच प्रवासी बचावल्याचे म्हटले आहे.
पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत विश्वकुमार हा एकमेव बचावलेला प्रवासी आहे, मात्र बचाव कार्य अजूनही सुरू असल्याने कदाचित ही संख्या बदलू शकते.
“रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींपैकी आणखी काहीजण वाचण्याची शक्यता आहे,” असेही चौधरी म्हणाले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)